21 June, 2023

 

हिंगोली येथे नववा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

शरीर आणि मन तंदुरुस्त राहण्यासाठी योग प्रत्येक घरापर्यंत पोहोचला पाहिजे

                                     -जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर



 

हिंगोली (जिमाका), दि.21 : राष्ट्राची सेवा करण्यासाठी आपले शरीर आणि मन तंदुरुस्त राहण्यासाठी  योग हा प्रत्येक घरापर्यंत पोहोचला पाहिजे. योगाचे महत्व कळावे या साठीच आज सर्व जगात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात साजरा करण्यात येत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर जिल्हा प्रशासन, क्रीडा विभाग, योग विद्याधाम, पतंजली योग समिती, जिल्हा योगा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री. पापळकर बोलत होते. यावेळी  आमदार तानाजी मुटकुळे, माजी खासदार शिवाजीराव माने, माजी आमदार रामराव वडकुते, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, शिक्षणाधिकारी  माधव सलगर, जिल्हा क्रीडा अधिकारी  जयकुमार टेंभरे, तहसीलदार नवनाथ वगवाड, नगर परिषदेचे मुख्याधिकारी  अरविंद मुंढे, योग शिक्षक दत्तात्रय लेकुळे, रत्नाकर महाजन, विठ्ठल सोळंके, क्रीडा अधिकारी नानकसिंग बस्सी, आत्माराम बोथीकर, सुधाकर बहादुरे, पप्पू चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर पुढे म्हणाले की, आज दि. 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. माणसाला निरोगी राहण्यासाठी योग हा प्रत्येक घराघरापर्यंत, प्रत्येकाच्या मनात पोहोचला पाहिजे. योगामुळे आपले शरीर आणि मन तंदुरुस्त राहते, असे सांगून सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

आज संपूर्ण जगभर दि. 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. याचे सर्व श्रेय भारत देशाला, देशाच्या प्रधानमंत्र्याना आहे. आज अमेरिकेत प्रधानमंत्री मोदी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षासोबत योग दिन साजरा करत आहेत, असे सांगून आमदार तानाजी मुटकुळे यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.  

योग गुरु रत्नाकर महाजन व विठ्ठल सोळंके यांनी योग दिनामध्ये सहभाग झालेल्या प्रत्येकाने आपले मित्र व कुटुंबीयांना योगाचे महत्त्व समजावून सांगावे. तसेच योगाचा प्रसार करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे असे आवाहन केले. तसेच योग दिनानिमित्त त्यांनी उपस्थितांकडून योगविद्येची विविध आसने करुन घेतली. योग दिनाचा शेवट वसुंधरा, योगाची शपथ तसेच प्रार्थना आणि संकल्प करत, शांती पठनाने झाला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमदार तानाजी मुटकुळे,  माजी खासदार शिवाजीराव माने, माजी आमदार रामराव वडकुते, जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन योग शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. या शिबिरास विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

****  

No comments: