30 November, 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिखली, भिरडा, शेगाव खोडके, खांडेगाव येथील नागरिकांशी साधला दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद

 




हिंगोली (जिमाका), दि. 30 :  'विकसित भारत संकल्प यात्रा' आज कळमनुरी तालुक्यातील चिखली, हिंगोली तालुक्यातील भिरडा, सेनगाव तालुक्यातील शेगाव खोडके, वसमत तालुक्यातील खांडेगाव येथे पोहचली, यावेळी येथे आरोग्य विभागाकडून रक्तदाब, मधुमेह याची प्राथमिक तपासणी आणि आयुष्यमान कार्ड संदर्भातील माहिती देण्यात आली. 'आपला संकल्प, विकसित भारत' या एलईडी रथाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनाही सांगण्यात आल्या. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे देशभरातील गावागावात फिरणाऱ्या संकल्प यात्रेद्वारे नागरिकाशी संवाद साधला. चिखली, भिरडा, शेगाव खोडके, खांडेगाव येथील नागरिकांशीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वज्ञरे संवाद साधला.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए. एल. बोंद्रे, गटविकास अधिकारी गणेश बोथीकर यांच्यासह यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

*****

 

पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचा सुधारित हिंगोली जिल्हा दौरा

 

                   

                हिंगोली (जिमाका), दि. 30 :  राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ, पणन मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार हे दि. 01 डिसेंबर, 2023 या हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार, दि. 01 डिसेंबर, 2023 रोजी  सकाळी 9.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथून मौ. हिवरा जाटू ता. औंढा नागनाथ कडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता मौ. हिवरा जाटू ता. औंढा नागनाथ येथे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी . 10.45 वाजता मौजे गोजेगाव ता. ओंढा नागनाथ येथील वीज पडून मयत झालेल्या राजू शंकर जायभाये यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट. 11.00 वाजता मौजे. गोजेगाव येथून हिंगोलीकडे प्रयाण. दुपारी 12.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबतच्या बैठकीस उपस्थिती. 12.45 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे राखीव व त्यानंतर मौ. बिरडा ता. हिंगोली येथे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी. दुपारी 1.00 वाजता मौ. कानरखेडा (बु.) ता.हिंगोली येथे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी. दुपारी 1.30 वाजता वाशिम मार्गे सिल्लोडकडे प्रयाण .

******

 

नैतिकता  नितीमत्तेमुळे एड्स आजाराला आळा..

                                   

 

     दरवर्षी  1  डिसेंबर ते  7  डिसेंबर हा कालावधी एड्स सप्ताह म्हणून पाळण्यांत येत असून यावर्षी  ‘समाजाचा पुढाकार-एचआयव्ही/एड्सचा समूळ नाश' हे घोषवाक्य युनायटेड नेशनने घोषित केले आहे. एड्स आजाराच्या दृष्ट चक्राने आपला वेग वाढविला असून त्यांचे गंभीर परिणाम पूढे येत आहे. या गंभीर आजाराबाबत दृष्टीक्षेपात माहिती देत आहे.

 

            नैतिकता व नितीमत्ता हे मानवाचे महत्वाचे आभूषण समजले जातात. समाजामध्ये या बाबीला अनन्यसाधारण महत्व आहे. नितीमत्ता व नैतिकता पाळणे हे सामाजिक बंधनातील श्रृंखला म्हटले तरी वावगे ठरु नये. समाजातील अधपत:त व सामाजिक प्रतिष्ठा या दोन बाबीवरच आज अवलंबूनआहे.

            परंतु दिवसें-दिवस होत असलेल्या सैराचारामुळे तसेच दिवसागणिक बदलत जाणारी सामाजिक परंपरा व सामाजिक मुल्य तसेच देशातील संस्कृतीवर परदेशातून होणारे आक्रमण आदीच्या प्रकारामुळे नैतिक मूल्याचा ऱ्हास होत आहे. हे थांबविण्यासाठी  समाजातील तरुण वर्गाला या दुष्परिणामाची वेळीच जाणीव करुन दिल्यास गैरकृत्यापासून त्यांना सावध करता येऊ शकते. अशा गैरकृत्याच्या विळख्यात एड्स हा महाभयंकर आजार समाजाला डोकेदुखी ठरत असून असंख्य कुटूंबियावर याचा आघात होत आहे.

            एच.आय.व्ही./एडस् या आजाराचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने सामाजिक वातावरण गंभीर स्वरुपाचे बनले आहे. अनेक पुरुषांनी आपला पुरुषार्थ दाखविण्यासाठी सैराचाराचा मार्ग अवलंबल्यामुळे तसेच त्यांच्या बेफिकीर वृत्तीमुळे हा धोकादायक आजार आपले स्थान घट्ट रोवत आहे. यामुळे अनेक निष्पाप नागरिक देखील त्यांची काही चूक नसताना या आजाराने ग्रासल्याने सामाजिक आरोग्य ढवळून निघत आहे.

            समाजात मुलाला अधिक महत्व असल्यामुळे मुलीकडे कायमचे दुर्लक्ष होतांना दिसून येते. मुलाच्या लालसेपोटी पुरुष नेहमी कल्पना क्षेत्रात वावरतो तर कधी कधी त्याला एकाकीपणा वाटतो, कामाच्या गुंतागुंतीमुळे परगावी जावे लागत असल्यामुळे त्यांचे तेथील मानसिक ताण, दडपण व एकाकीपण दूर करण्यासाठी मद्यार्काच्या तसेच इतर मादक सेवनाच्या आहारी जातो. या वाढीव सेवनामुळे अनेक वेळा त्यांचे वेश्यागमन होते परिणामी या गंभीर आजाराचा त्याच्या आयुष्यामध्ये प्रवेश होतो.                                     

किशोरवयीन मुलामुलींना समवयस्कांच्या आकर्षणामुळे कुतूहलापोटी अनेक नवनवीन गोष्टीचा अनुभव घेण्याच्या प्रयत्नातून होणारा सैराचार व लैंगिकतेमुळे एड्स हा आजार निर्माण होण्यास कारणीभूत ठरत आहे. एड्स झालेल्या व्यक्तींच्या रक्त प्रवाहातून दुसऱ्या व्यक्तीला हा आजार होण्याची दाट शक्यता असते. अलिकडे या आजाराचे वाहक समाजातील अनेक घटक आहेत त्यांना पूरेशी माहिती असल्यास त्यावर प्रतिबंध करण्यासाठी देखील मोठे योगदान ठरु शकतात.      

एचआयव्ही संसर्गित व्यक्तीने नियमित औषधोपचार, सकस आहार, योगा, व्यायाम तसेच कोणतेही व्यसन न केल्यास आपले आयुष्यमान सामान्य होऊ शकते. परंतु त्यापेक्षा जास्त महत्वाचे म्हणजे रुग्णांसोबत कोणताही भेदभाव न करता त्याला प्रेमाने वागवल्यास त्याची मानसिक स्थिती चांगली राहते. एचआयव्ही संसर्गित व्यक्तीसोबत असुरक्षित लैंगिक संबंध आल्याने, एचआयव्ही संसर्गित व्यक्तीचे रक्त घेतल्याने, एचआयव्ही संसर्गित सुई/इंजेक्शनचा वापर केल्याने, एचआयव्ही संसर्गित आई वडिलांकडून होणाऱ्या बाळाला एचआयव्ही संसर्ग होऊ शकतो.

प्रत्येक गरोदर मातेने पहिल्या तिमाहीत आपली एचआयव्ही तपासणी करुन घेणे गरजेचे आहे. तसेच आपली प्रसूती ही शासकीय रुग्णालयात करावी. जेणेकरुन वेळेत मिळणाऱ्या योग्य औषधोपचारामुळे आई-वडिलापासून बाळाला होणारा एचआयव्ही संसर्ग टाळता येऊ शकतो.

हिंगोली जिल्ह्यात महाराष्ट्रातील एकमेव व भारतातील दुसरी अशी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष व एआरटी ची अद्यावत स्वतंत्र इमारत उभारण्यात आली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एचआयव्ही तपासणी सामान्य गट- 4 लाख 30 हजार 192 व गरोदर माता- 4 लाख 18 हजार 861 करण्यात आली आहे. या एआरटी केंद्रामध्ये 3453 रुग्णांची नोंदणी झालेली असून सध्या 1929 रुग्णावर उपचार सुरु आहेत.

            मागील पाच वर्षापासून एचआयव्ही ग्रास्त मातांपासून जन्मलेल्या एकूण 85 बालकांपैकी एकही बालक एचआयव्ही संसर्गबाधित रुग्ण आढळून आलेला नाही हे या कार्यक्रमाचे मोठे यश आहे.  हिंगोली जिल्ह्यात शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी व त्यांची टीम उत्कृष्ट कार्य करत आहे,

            या असाध्य आजारामुळे कुटूंबावर कुटाराघात तर होतोच त्याचप्रमाणे समाजाची फार मोठी हानी होते. एडस्‌मुळे होणारी समाजातील बदनामी सामाजिक दर्जा खालवण्याला कारणीभूत ठरते. यासाठी तारुण्यातील सैराचाराला आळा घालावा लागेल. त्याचबरोबर आरोग्य शिक्षण देतांना लैंगिकतेमुळे समाजाची होणारी हानी दूर करण्यासाठी जागरुकता निर्माण करावी लागेल. या कार्याला अत्यल्प प्रतिसाद जरी मिळणार असला तरी कालानुरुप समाज जीवनमानातील सकारात्मक बदल निश्चितपणे दिसून येईल. एड्सच्या या आजाराच्या महापाशातून प्रत्येकाने दूर राहिल्यास सदृढ समाजाची दिशा निश्चितपणे प्रशस्त होऊ शकेल. त्यामुळे समाजाच्या पुढाकारातून एचआयव्ही/एड्सचा समूळ नाश करुया !

                                                                   

-          जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

 

******

 

पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचा हिंगोली जिल्हा दौरा

 

                   

                हिंगोली (जिमाका), दि. 30 :  राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ, पणन मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार हे दि. 30 नोव्हेंबर व 01 डिसेंबर, 2023 या दोन दिवशीय हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार, दि. 30 नोव्हेंबर, 2023 रोजी सायंकाळी 6.00 वाजता जंगला तांडा ता. सोयगाव येथून हिंगोलीकडे प्रयाण करुन रात्री 9.00 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन, राखीव व मुक्काम.

शुक्रवार, दि. 01 डिसेंबर, 2023 रोजी  सकाळी 9.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथून मौ. हिवरा जाटू ता. औंढा नागनाथ येथे नुकसाग्रस्त शेतीची पाहणीसाठी प्रयाण. सकाळी 10.30 वाजता मौ. हिवरा जाटू ता. औंढा नागनाथ येथे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी . 10.45 वाजता मौजे गोजेगाव ता. ओंढा नागनाथ येथील वीज पडून मयत झालेल्या राजू शंकर जायभाये यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट. 11.00 वाजता मौजे. गोजेगाव येथून हिंगोलीकडे प्रयाण. दुपारी 12.00 वाजता सर्व संबंधित अधिकाऱ्यांची डीपीसी हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे आढावा बैठक . 12.45 वाजता विश्रामगृह हिंगोली येथे राखीव व नंतर मौ. बिरडा ता. हिंगोली येथे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी. 13.00 वाजता मौ.बिरडा ता. हिंगोली येथून मौ. कानरखेडा (बु.) ता.हिंगोली येथे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी. 13.30 वाजता वाशिम मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण .

******

 

शासकीय ग्रंथालयात दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन

 


                   

                हिंगोली (जिमाका), दि. 30 :  येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात आयोजित दिवाळी अंक प्रदर्शनाचे आज उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले.

यावेळी मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष खंडेराव सरनाईक, मराठवाडा साहित्य परिषदेचे अशोक अर्धापूरकर, आदर्श महाविद्यालयाचे प्रा. रमेश दळवी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, मिलिंद सोनकांबळे, शंभूनाथ दुभळकर, ग्रंथालय पदाधिकारी व विद्यार्थी यांची प्रमुख उपस्थिती होती.

या उद्घाटन कार्यक्रमानंतर जिल्हा ग्रंथ निवड समितीची बैठकीत सन 2023-24 या वर्षासाठी जिल्हा ग्रंथालयासाठी सर्व समावेशक व दर्जेदार ग्रंथ/पुस्तके खरेदीसाठी चर्चा करण्यात आली.

हिंगोली जिल्हयातील सर्व ग्रंथप्रेमी, वाचकांनी मोठ्या प्रमाणात सभासद होऊन सहभाग नोंदवावा व वाचनाचा आनंद घ्यावा. यासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नेहरु नगर, रिसाला नाका, हिंगोली (सपंर्क क्र. 9403067267)  येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.       

हे ग्रंथ प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नेहरु नगर, रिसाला नाका, हिंगोली येथे येऊन लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.

******

29 November, 2023

 

जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे

                         

  हिंगोली (जिमाका), दि. 29 : दर दोन वर्षानी आयोजित केली जाणारी जागतिक कौशल्य स्पर्धा सन 2024 मध्ये फ्रान्स (ल्योन) येथे होणार आहे. ही जगातील सर्वात मोठी व्यवसायिक आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून जगभरातील 23 वर्षाखालील तरुणांसाठी त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची स्पर्धा ही ऑलिम्पीक खेळासारखीच आहे. त्यानुषंगाने या स्पधे्रच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने 52 क्षेत्राशी संबंधित जिल्हा व राज्यस्तरावर व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालय, सेक्टर स्कील कौन्सिल, विविध औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने कौशल्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार या स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवरुन प्रतिभासंपन्न, कुशल उमेदवारांचे मानांकन करण्याच्या द्ष्टीने आयोजित स्पर्धेसाठी सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रनिकेतन महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये तसेच इतर महाविद्यालये यासह महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अधिनस्त सर्व व्यवसाय प्रशिक्षण संस्था यांना या स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार आहे.

या स्पर्धेसाठी वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आलेला आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचा जन्म 1 जानेवारी 2002 किंवा त्यानंतर असणे अनिवार्य आहे. तसेच ॲडक्टीव्ह मन्युफक्चरींग, क्लाऊड कॉम्युंटींग, सायबर सेक्युरिटी, डिजिटल कन्स्ट्रक्शन, इंडस्ट्रियल डिझाईन टेक्नॉलाजी, इंडस्ट्री 4.0 , इन्फॉर्मेशन, इन्फॉर्मेशन नेटवर्क केबलींग, रोबोट सिस्टीम इंटीग्रेशन ॲन्ड वाटर टेक्नॉलाजी या क्षेत्रासाठी उमेदवारांचा जन्म दि. 1 जानेवारी 1999 किंवा त्यानंतरचा असणे अनिवार्य आहे.

या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी इच्छूक पात्र उमेदवारांनी https://kaushalya.mahaswayam.gov.in या लिंकवर भेट देऊन आपली नोंदणी करावी. दि. 30 नोव्हेंबर, 2023 ही नोंदणीची शेवटचा दिनांक असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय तंत्रनिकेतन आणि इतर प्रशिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांनी तसेच कौशल्य धारण केलेल्या युवक-युवतींनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन डॉ. रा. म. कोल्हे, सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, हिंगोली यांनी केले आहे.

*******

 

जागतिक एड्स दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

                                                                       

                                     

  हिंगोली (जिमाका), दि. 29 : राज्य एड्स नियंत्रण संस्था, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष,  जिल्हा रुग्णालय, हिंगोली यांच्यामार्फत दि. 1 डिसेंबर 2023 जागतिक एड्स दिनानिमित्त दि. 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर, 2023 या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. 1 डिसेंबर, 2023 रोजी जिल्हा व तालुकास्तरावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात येणार आहे. दि. 6 डिसेंबर, 2023 रोजी आठवी ते 11 वी च्या विद्यार्थ्यांसाठी डापकू कार्यालयातर्फे प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. दि. 8 डिसेंबर रोजी डापकू सभागृहात सीएलएचआयव्ही रांगोळी स्पर्धा, निबंध स्पधा व पारितोषिक वितरण कार्यक्रम तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास प्रमाणपत्राचे वाटप कार्यक्रम घेण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील प्रमुख बसस्थानक येथे एचआयव्ही तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 9 डिसेंबर, 2023 रोजी हिंगोली व वसमत रेल्वे स्थानकावर एचआयव्ही तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच दि. 1 ते 31 डिसेंबर, 2023 या कालावधीत जिल्हाभरात रक्तदान शिबिराचे आयोजन करुन पोस्टर प्रदर्शन, माहिती शिक्षण संवाद पत्रके वाटप कार्यक्रम, जिल्ह्यातील विविध महाविद्यालयात एचआयव्ही/एड्स वर तज्ञांमार्फत व्याख्यान, आरआरसी (रेड रिबन क्लब) मार्फत रेल्वे स्टेशन, बसस्थानक, चौक, बाजार इत्यादी गर्दीच्या ठिकाणी फ्लॅश मोबचे आयोजन, पथनाट्य, रिल मेकींग व इतर स्पर्धा घेण्यात येणार आहेत. एचआयव्ही/एड्स विषयी लेख, आकाशवाणीवर मुलाखत कार्यक्रम तसेच देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी एनजीओच्या मदतीने मेळावा आयोजित करणे, जिल्ह्यातील विविध कार्यालयामध्ये एचआयव्ही/एड्स जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, हिंगोली यांनी दिली आहे.

********

 

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ व बार्टीच्या संयुक्त विद्यमाने

मातंग व तत्सम जातीतील समाज बांधवांना योजनांची माहिती देण्यासाठी मेळावा उत्साहात संपन्न

 

हिंगोली (जिमाका), दि. 29 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मार्फत मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी व मादिगा या जातीतील समाज बांधवासाठी विविध योजना राबविण्यात येतात. महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ तळागाळापर्यंत व शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी  नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील मातंग व तत्सम जातीतील समाज बांधवासाठी दि. 24 नोव्हेंबर, 2023 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह, ग्यानमाता शाळेसमोर, नांदेड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला .

मेळावा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनिष सांगळे हे होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महामंडळाचे महाव्यवस्थापक अनिल रा. म्हस्के, प्रादेशिक व्यवस्थापक आर. जी. दरबस्तेवार उपस्थित होते.

प्रस्ताविकात नांदेड येथील महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक टी. आर. शिंदे यांनी महामंडळाच्या योजनांची माहिती दिली. तदनंतर सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रपती पुरष्कार प्राप्त शिक्षक डॉ. शिवा कांबळे, प्रा.अमरजित आईलवाड, सामाजिक कार्यकर्ते लालबाजी घाटे, प्रकाश मुराळकर, स्थायी समिती सदस्य नामदेव कांबळे, वसमत येथील नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते रविकिरण वाघमारे तसेच अण्णाभाऊ साठे पुरष्कार प्राप्त हरीबाई कांबळे, रमेश गायकवाड यांनी मार्गदर्शनपर मनोगत करताना महामंडळातोल योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी काही सुचना/विनती करण्यात आली.  तसेच मनोगतामध्ये प्रामुख्याने जामीनदारांची अट शिथिल करण्याबाबत विनंती करण्यात आलेली आहे. तसेच महामंडळाचे लाभार्थी यशस्वी उद्योजक रमेश गायकवाड यांची त्यांच्या यशाबद्दल व महामंडळाच्या योजनेबद्दल मनोगत व्यक्त केले.

महामंडळाचे महाव्यवस्थापक अनिल रा. म्हस्के यांनी आपल्या भाषणामध्ये महामंडळाच्या सुरु असलेल्या योजना, प्रस्तावित योजना, नव्याने सुरु करावयाच्या योजना याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच या सर्व योजना मातंग समाज व तत्सम जातीतील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी या प्रचार व प्रसिध्दी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगून महामंडळमार्फत पूर्वी राबविण्यात येत असलेलया साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेमध्ये बदल करुन देण्यात येणान्या प्रोत्साहनपर रक्कमेत देखील मोठया प्रमाणात वाढ करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच एनएसएफडीसी योजना व त्यासाठी आवश्यक असलेली खंडहमी मिळण्यासाठी व सर्व सुरु असलेल्या योजना व प्रस्तावित योजना प्रभावीपणे सुरु राहण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरु असल्याबाबत माहिती दिली. तसेच महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ मोठ्या प्रमाणात घेण्याचे आवाहन केले.

अध्यक्षीय भाषणात महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनिष सांगळे यांनी महामंडळाचा पदभार स्वीकारल्यापासून केलेल्या कामाजाचा आढावा सादर केला, तसेच लाभार्थीनी योजनांचा लाभ घेण्यासाठी व्यवसाय निवड करताना, नवीन व नाविन्यपूर्ण व्यवसाय निवडीबाबत मार्गदर्शन केले, तसेच महामंडळाच्या योजना व प्रस्तावित योजना याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच शासनाने धाराशीव जिल्ह्यातील तुळजापूर येथे महामंडळास उपलब्ध करुन दिलेल्या जागेवर सुरु करण्यात येणाऱ्या युपीएससी / एमपीएससी सेंटर व बहुउपयोगी प्रशिक्षण केंद्राबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रकल्प अधिकारी समतादूत बार्टी सुजाता पोहरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु. विशाखा बंडेवार, विनोद पाचंगे यांनी केले. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. या मेळाव्यासाठी नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील समाजबांधव, सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

********

 

आंतरराष्ट्रीय दत्तक महिनानिमित्त जवळा,असोला व गोरेगाव येथे जनजागृती

                                                                           


        

                         

  हिंगोली (जिमाका), दि. 29 : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. आर. मगर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार आंतरराष्ट्रीय दत्तक महिना निमित्ताने हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र जवळा बाजार आशा वर्कर्स, जवळा बाजार पोलीस चौकी, मौजे असोला येथे व सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र इत्यादी ठिकाणी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले.

यावेळी गोरेगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र हुंडेकर, जवळा पोलीस चौकी पोलीस उपनिरीक्षक पी. सी. जाधव, जवळा बाजार येथील आशा गट प्रवर्तक मैना देवकत्ते व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमात जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडून बालकासंदर्भात आणि बालकांशी निगडीत विविध विषयावर कार्यक्रम घेण्यात येत आहेत. कोणतेही बालक परस्पर दत्तक घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. यासाठी कायदेशीर प्रक्रिया www.cara.wcd.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन इच्छूक पालक बालकाला दत्तक घेण्यात यावेत. जेणेकरुन दत्तक घेणाऱ्या पालकांचे व दत्तक घेतलेल्या बालकांचे अधिकार अबाधित राहतील. याविषयीची माहिती तसेच बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006, लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण 2012, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना, बाल कामगार प्रतिबंध कायदा 1986, बाल हक्क संहिता इत्यादी विषयाची सविस्तर माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या कायदा तथा परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित, सामाजिक कार्यकर्त्या रेश्मा पठाण, रामप्रसाद मुडे यांनी दिली. बालकांसाठी चाईल्ड हेल्पलाईन 1098 बाबतची माहिती हिंगोलीचे केस वर्कर तथागत इंगळे यांनी दिली. तसेच यावेळी अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे भेट देण्याचे आवाहन करण्यात आले.   

*****      

28 November, 2023

 

आंतरराष्ट्रीय दत्तक महिनानिमित्त कुरुंदा येथे जनजागृती

                                                                                   

                         


  हिंगोली (जिमाका), दि. 28 : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. आर. मगर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार आंतरराष्ट्रीय दत्तक महिना निमित्ताने हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील पोलीस स्टेशन येथे दि. 23 नोव्हेंबर, 2023 रोजी माहिती पत्रक लावून जनजागृती करण्यात आली.

यावेळी कुरुंदा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मोरे, पोलीस निरीक्षक गवळी इत्यादी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

नोव्हेंबर हा महिना आंतरराष्ट्रीय दत्तक महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडून बालकासंदर्भात आणि बालकांशी निगडीत विविध विषयावर कार्यक्रम घेण्यात येत आहेत. कोणतेही बालक परस्पर दत्तक घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. यासाठी कायदेशीर प्रक्रिया www.cara.wcd.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन इच्छूक पालक बालकाला दत्तक घेऊ शकतो, अशी माहिती बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी दिली. बालकांसाठी चाईल्ड हेल्पलाईन 1098 बाबतची माहिती संदीप कोल्हे यांनी दिली. बालकांसाठी असलेल्या बाल संगोपन योजनेविषयीची माहिती राजरत्न पाईकराव यांनी दिली. तसेच यावेळी अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे भेट देण्याचे आवाहन करण्यात आले.   

*****      

27 November, 2023

 

सामाजिक न्याय विभागातर्फे संविधान दिन मोठया उत्साहात साजरा

 



                हिंगोली (जिमाका). दि. 27 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभांगाच्या वतीने हिंगोली जिल्ह्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, हिंगोली येथे दिनांक 26 नोव्हेंबर, 2023 रोजी संविधान दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

                भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा येथे  सकाळी 7.00 वाजता पुष्पहार अर्पण करुन संविधानाचे वाचन करण्यात आले. तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा, संविधान कॉर्नर, महात्मा गांधी पुतळा, इंदिरा गांधी पुतळा, अग्रेसन पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथेही राजू एडके, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

                तद्नंतर संविधान दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,हिंगोली येथे सकाळी 10.00 वाजता मुख्य कार्यक्रमाचे अध्यक्ष समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजू एडके हे होते. तर प्रमुख पाहुणे संविधानाचे देणे या मराठी चित्रपटातील कलाकार सुर्यकांत माळगे, किशन खिल्लारे, बाळू खिल्लारे, विस्तार अधिकारी मधुकर राऊत, आत्माराम वागतकर, अशोक इंगोले, नामदेव रवणे, गुलाबराव सापनर आदी उपस्थित होते.

                प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महामानव क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहु महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

                या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजू एडके यांनी केले तर सूत्रसंचालन बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी सिध्दार्थ गोवंदे तर आभार प्रदर्शन नवीन मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहाच्या गृहपाल सुलोचना ढोणे यांनी केले.

                यावेळी "संविधानच देणं " हा मराठी चित्रपट दाखऊन संविधानाचे महत्व पटवून देण्यात आले. हा चित्रपट पाहण्यासाठी 300 ते 350 जनसमुदाय उपस्थित होता.

                तसेच हिंगोली जिल्हयातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत 08 शासकीय वसतिगृह, 01 शासकीय निवासीशाळा व 20-विजाभज आश्रमशाळा, 17 दिव्यांग शाळा येथे मोठया उत्साहात संविधान दिन साजरा करण्यात आला.

                या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सर्व कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.

*******

 

जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन


 

 

            हिंगोली (जिमाका). दि. 27 : भारतीय संविधान दिनानिमित्त दि. 26 नोव्हेंबर, 2023 रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

            यावेळी  उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, नायब तहसीलदार डी. एस. जोशी यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची  उपस्थिती होती.

*****

25 November, 2023

 अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा हिंगोली दौरा

 

हिंगोली (जिमाका), दि. 25 :  राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे रविवार, दि. 26 नोव्हेंबर, 2023 रोजी हिंगोली दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

रविवार, दि. 26 नोव्हेंबर, 2023 रोजी सकाळी 9.45 वाजता श्री गुरुगोविंदसिंगजी विमानतळ नांदेड येथून मोटारीने हिंगोलीकडे प्रयाण. सकाळी 11.00 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे आगमन व राखीव. नंतर रामलीला मैदान हिंगोली येथे आगमन व ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभेस उपस्थिती. दुपारी 2.30 वाजता हिंगोली येथून कळमनुरीकडे प्रयाण. 2.45 वाजता कळमनुरी जि. हिंगोली येथे आगमन व राखीव. 3.15 वाजता मोटारीने नांदेडकडे प्रयाण .

******

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा हिंगोली दौरा

 

हिंगोली (जिमाका), दि. 25 :  महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार रविवार, दि. 26 नोव्हेंबर, 2023 रोजी हिंगोली दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

रविवार, दि. 25 नोव्हेंबर, 2023 रोजी सकाळी 6.30 वाजता कमलाई निवास नागपूर येथून हिंगोलीकडे प्रयाण करुन सकाळी 10.20 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे आगमन व राखीव. सकाळी 11.00 वाजता सकल ओबीसी समाज हिंगोली, यवतमाळ, नांदेड जिल्हाद्वारा आयोजित ओबीसी एल्गार महामेळावा कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2.00 वाजता हिंगोली येथून उमरेड जि. नागपूरकडे प्रयाण .

******           


24 November, 2023

 ओबीसी एल्गार महामेळाव्यानिमित्त जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी

 विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती 


हिंगोली (जिमाका), दि. 24 :  जिल्ह्यात दि. 26 नोव्हेंबर, 2023 हिंगोली शहरातील रामलीला मैदानावर ओबीसी एल्गार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून आयोजित महामेळाव्यास जिल्ह्यातून व इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात जनसमुदाय येण्याची शक्यता आहे. तसेच महामेळाच्या ठिकाणी येणारा जनसमुदाय हा जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीतून वाहनाने मेळाव्याच्या ठिकाणी येणार आहे व मेळावा संपल्यानंतर वाहनाने परत जाणार आहे . सध्या जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षण संबंधाने प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीत साखळी उपोषण व गाव बंदी चे पोस्टर लावण्यात आलेले असून त्यावरून काही वाद निर्माण होऊन  अचानक उद्भवलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीस तोंड देण्यासाठी बंदोबस्तातील अधिकाऱ्यांसोबत विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची आवश्यकता असते. त्यामुळे वरील परिस्थिती लक्षात घेऊन संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात दि. 25 नोव्हेंबर, 2023 ते 26 नोव्हेंबर,2023 या कालावधीत उद्भवणारा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यासाठी जिल्ह्यातील 13 पोलीस स्टेशनसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे 13 विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यानी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 अन्वये नियुक्ती केली आहे.  

हिंगोली शहर पोलीस स्टेशनसाठी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारधी, हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनसाठी हिंगोली उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार पी. एन. रुषी,  नरसी नामदेव पोलीस स्टेशनसाठी हिंगोली तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी नवनाथ वगवाड, बासंबा पोलीस स्टेशनसाठी हिंगोली महसूल विभागाचे नायब तहसीलदार नकुल पोळेकर, वसमत शहर पोलीस स्टेशनसाठी वसमतचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी डॉ.सचिन खल्लाळ यांची, वसमत ग्रामीण पोलीस स्टेशनसाठी वसमत उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे नायब तहसीलदार अशोक भोजने, हट्टा पोलीस स्टेशनसाठी वसमतचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी शारदा दळवी, कुरुंदा पोलीस स्टेशनसाठी वसमतचे महसूल विभागाचे नायब तहसीलदार विलास तेलंग, कळमनुरी पोलीस स्टेशनसाठी कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी क्रांती डोंबे, बाळापूर पोलीस स्टेशनसाठी कळमनुरीच्या तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी सुरेखा नांदे यांची, औंढा नागनाथ पोलीस स्टेशनसाठी तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी विठ्ठल परळीकर यांची, सेनगाव पोलीस स्टेशनसाठी तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी सखाराम मांडवगडे यांची, गोरेगाव पोलीस स्टेशनसाठी सेनगाव येथील महसूल विभागाचे नायब तहसीलदार डी. के. गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

वरील नियुक्ती केलेल्या दंडाधिकाऱ्यांनी त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या कार्यक्षेत्राच्या हद्दीत दि. 26 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर,2023 या कालावधीत विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. तसेच उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांनी नेमून दिलेल्या पोलीस स्टेशनशिवाय त्यांच्या उपविभागावर दंडाधिकारी म्हणून नियंत्रण ठेवावे. तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांनी त्यांना नेमून दिलेल्या पोलीस स्टेशनशिवाय त्यांच्या तालुक्यात कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियंत्रण ठेवावेत, असे आदेश दिले आहेत.  

*****

 

जिल्ह्यात कलम 37 (1)(3) चे आदेश लागू

 

                हिंगोली (जिमाका), दि. 24 :  जिल्ह्यात मराठा आरक्षण  मागणी संदर्भाने सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आमरण उपोषणे, उपोषणे, साखळी उपोषणे व विविध प्रकारचे आंदोलने चालू असून दि. 26 नोव्हेंबर, 2023 रोजी ओबीसी एल्गार महामेळावा, दि. 27 नोव्हेंबर, 2023 रोजी गुरुनानक जयंती कार्यक्रम केले जाणार आहेत. तसेच सध्या घडणाऱ्या राजकीय घडामोडी, नागरिकांच्या वतीने, विविध संघटना, पक्ष यांच्यातर्फे हिंगोली जिल्ह्यात त्यांच्या मागणी संदर्भात मोर्चे, धरणे आंदोलने, रास्ता रोको, उपोषणे करीत असतात. अशा विविध घटनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विविध प्रश्न हाताळण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था आबाधित  राखण्यासाठी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात  दिनांक 19  नोव्हेंबर, 2023 रोजीचे 23.59 वाजल्यापासून ते दिनांक 04 डिसेंबर, 2023 रोजीचे 23.59 वाजेपावेतो मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) चे आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.

            त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तु जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करुन ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणुन बुजुन दुखावतील या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तीं रस्त्यावर जमण्यास  सक्त मनाई करण्यात आले आहे. हा आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी दिलीप कच्छवे  यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.     

**** 

 

परभणी पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या

गोळीबार सरावासाठी मौजे वगरवाडी येथील क्षेत्र उपलब्ध

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 24 : महाराष्ट्र जमीन  महसूल  अधिनियम 1966 चे कलम 22 अन्वये व मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील  कलम 33 (1) (ख) व (प)  नुसार मौजे  वगरवाडी  ता. औंढा, जि. हिंगोली  येथील फायरींग रेंज सर्वे नं. 25 व 29 या परिसरात  दि. 29 ऑक्टोबर, 2023 रोजी परभणी पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना दि. 20 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर, 2023 या कालावधीत गोळीबार सराव घेण्यासाठी  परवानगी  देण्यात येत आहे.

            या कालावधीत पुढील अटीवर गोळीबार  सरावासाठी  मैदान उपलब्ध  करुन देण्यात येत आहे. हे ठिकाण  धोकादायक  क्षेत्र म्हणून  घोषित करण्यात आले आहे. परिसरात  गुरांना न सोडणे व कोणत्याही व्यक्तीने त्या क्षेत्रात प्रवेश करु नये, अशा सूचना  पोलीस अधिकारी यांनी  दवंडीद्वारे  व ध्वनीक्षेपकाद्वारे  संबंधित  गावी सर्व संबंधितांना  द्याव्यात. तसेच तहसीलदार औंढा नागनाथ व पोलीस  स्टेशन हट्टा यांनी मौ. वगरवाडी  फायरींग बट परिसरात  दवंडीद्वारे व ध्वनीक्षेपकाद्वारे  या आदेशाची  प्रसिध्दी  करावी, असे जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

****