अंमली पदार्थाच्या वापरावर आळा घालण्यासाठी
जिल्ह्यातील सर्व औषधी दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत
- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश
हिंगोली, (जिमाका) दि. 21 : अंमली पदार्थाच्या वापरावर आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील सर्व औषधी (मेडिकल)
दुकानात 15 दिवसाच्या आत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आढावा बैठकीत
दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी
जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी
कार्यकारी समितीची बैठक आज घेण्यात आली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील,
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजू
एडके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे, राज्य उत्पादन शुल्क
विभागाचे अधीक्षक ए.जी. पैठणे, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी डॉ.
सुवर्णा महाले, पोस्ट ऑफिसचे एस. एस. संघई, अन्न व औषध प्रशासन विभागाचे मनोज
पैठणे, जिल्हा माहिती कार्याललयाचे चंद्रकांत कारभारी उपस्थित होते.
अन्न व औषध प्रशासन
विभागांनी औषधी दुकानाची तपासणी करुन सी.सी.टी.व्ही. लावले आहे किंवा कसे याबाबत
अहवाल सादर करावा, तसेच अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यावर लक्ष
ठेवावे. तसेच त्यांचे आवक जावक तपासावेत. बाहेर राज्यातून औषधी खरेदी केल्याची माहिती
औषधी दुकानदारांनी अपलोड केली किंवा नाही यांची माहिती घ्यावी, अशा सूचना दिल्या.
जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, खाजगी शिकवणी
परिसरात अंमली पदार्थ व तंबाखू जन्य पदार्थ बाळगणाऱ्यावर कारवाई करावी. पोलीस
प्रशासनाने हिंगोली जिल्हयातील एम.आय.डी.सी. परिसर तसेच बंद कारखाने, मोठे
गोडाऊनमध्ये अंमली पदार्थाची निर्मित्ती होते का याची तपासणी करुन अहवाल सादर
करावा.
हिंगोली जिल्ह्यात
गोपनीय बातमीदार तयार होण्यासाठी गांजा बाबत माहिती देणारी चित्रफीत तयार करावी.
त्यामध्ये माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल व त्यांना बक्षीस देण्यात
येईल असे नमूद करावेत आणि ही तयार करण्यात आलेली चित्रफीत एन.आय.सी., फेसबुक, युट्यूब,
ट्वीटरद्वारे जनजागृती करावी.
हिंगोली जिल्हा
केंद्रीय एनडीपीएस कोठारामध्ये जमा असलेल्या गांजा बाबत मा. न्यायालयाकडून माहिती
हस्तगत करुन पुढील बैठकीच्या आगोदर सदरचा मुद्देमाल नष्ट करण्यात यावा.
आरोग्य विभागाने अंमली पदार्थाच्या आहारी
गेलेल्या लोकांवर उपचार करुन त्यांना समुपदेशन करावे. तसेच कोणत्या ठिकाणी अंमली
पदार्थाचे सेवन करणारे लोक आहेत याची माहिती पोलीस प्रशासनाला द्यावी. जिल्हा
डाकघर कार्यालयात संशयास्पद वाटणारे पार्सल तपासणी करावी. जिल्ह्यातील एनडीपीएस
संबंधाने जास्तीत जास्त कार्यवाही करण्याची विशेष मोहिम पोलीस विभागाने राबवावी, अशा
सूचनाही श्री. पापळकर यावेळी दिल्या.
हिंगोली जिल्हा पोलीस दलातर्फे सन 2023 या
वर्षात अंमली पदार्थ विरोधी 12 प्रकरणावर कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती
यावेळी देण्यात आली.
*****
No comments:
Post a Comment