23 November, 2023

 

विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेअंतर्गत योजनांची प्रसिद्धी करणाऱ्या फिरत्या एलईडी वाहनांना

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी हिरवी झेंडी दाखवून केली रवाना

 

  • विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावात होणार शासकीय योजनांचा जागर
  • योजनांची होणार पाच फिरत्या एलईडी वाहनाद्वारे प्रसिद्धी

 

 


 हिंगोली (जिमाका), दि. 23 : केंद्र सरकारच्या लोक कल्याणकारी योजना व त्यांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी तसेच अधिकाअधिक नागरिकांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून विकसीत भारत संकल्प यात्रा मोहिम राबविण्यात येत आहे. या संकल्प यात्रेमध्ये भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लक्ष निर्धारित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी व विकसित भारताचा संकल्प साध्य करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे व्यापक मोहिम हाती घेतली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात जाऊन केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची प्रसिद्धी करणाऱ्या फिरत्या एलईडी वाहनांना आज जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले.

            यावेळी उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ, क्रांती डोंबे, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए. एल. बोंद्रे, तहसीलदार सुरेखा नांदे, तहसीलदार विठ्ठल परळीकर, विस्तार अधिकारी विष्णू भोजे, आकाशवाणीचे एस. व्ही. पांडे उपस्थित होते.

वंचित घटकाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या विविध योजना पोहोचविण्यावर या प्रसिद्धी मोहिमेत भर दिला जाणार आहे. सर्व सामान्यांच्या विकासासाठी विविध विकास योजना प्रभावीपणे पोहोचविण्याची गरज आहे. या यात्रेतून दुर्गम भागातील प्रत्येक गावात ज्या व्यक्तींना आजवर कोणत्या योजना मिळाल्या नाहीत अशा लाभार्थ्यांची निवड करुन त्यांना त्या-त्या योजनांचा लाभ देण्याचे नियोजन या मोहिमेत करण्यात आले आहे. या मोहिमेत पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देणे, योजनांबद्दल जागरुकता निर्माण करणे, संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी करणे आदी कार्यवाही केली जाणार आहे. वंचित समुदायासाठी असलेल्या योजनांच्या जनजागृतीचे ध्येय या विकसित भारत संकल्प यात्रेतून साध्य केले जाणार आहे. यात्रेमध्ये योजनाची माहिती, प्रचार व प्रसिद्धीसाठी शासनाकडून पाच सुसज्ज एलईडी व्हॅन उपलब्ध झाल्या आहेत. या पाच फिरत्या वाहनाद्वारे जिल्ह्यातील प्रत्येक गावात जाऊन जनजागृती करण्यात येणार आहे. या यात्रेदरम्यान केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री विश्वकर्मा, उज्ज्वला, मुद्रा, किसान सन्मान, जनधन योजनेसह वनहक्क महसूल विभागाची स्वामित्व योजना, एकलव्य योजना, आयुष्यमान कार्ड तसेच अन्य योजनांची माहिती देण्यात येणार आहे.

या यात्रेत भारत सरकारच्या फ्लॅगशीप योजनांचे लाभ लक्षीत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आणि विकसित भारत संकल्प यात्रेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

*****

No comments: