20 November, 2023

 

शासकीय जिल्हा रुग्णालयात बालक दिन साजरा

 

हिंगोली, (जिमाका) दि. 20  :  जागतिक बालदिनानिमित्त शासकीय जिल्हा रुग्णालयात बालकांना खाऊ वाटप करुन बालदिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपक मोरे यांनी रुग्णालयांमधील बालकांच्या सोयीसुविधांची माहिती दिली. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी नोव्हेंबर महिना हा आंतरराष्ट्रीय दत्तक महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडून बालकासंदर्भात आणि बालकाशी निगडीत विविध विषयावर कार्यक्रम घेण्यात येत आहेत. कोणतेही बालक परस्पर दत्तक घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. यासाठी कायदेशीर प्रक्रिया www.cara.wcd.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन इच्छूक पालक बालकाला दत्तक घेऊ शकतो, अशी माहिती दिली. बालकांसाठी चाईल्ड हेल्पलाईन 1098 बाबतची माहिती चाईल्ड हेल्पलाईनचे संदीप कोल्हे यांनी दिली. बालकांसाठी असलेल्या बालसंगोपन योजनेविषयीची माहिती रामप्रसाद मुडे यांनी दिली. बालकांच्या हक्काबाबतची माहिती राजरत्न पाईकराव यांनी दिली. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे भेट देण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी सरस्वती मुलींचे निरीक्षण गृहातील शिक्षक शंकर घ्यार, जिल्हा परिचर्या प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य कुलदीप कांबळे, चाईल्ड हेल्पलाईनचे अंकूर पतोडे, केस वर्कर तथागत इंगळे, सविता पाईकराव, बोइनवाड सिस्टर, अधिकारी व इतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच हिंगोली तालुक्यातील मौजे सावा येथे ग्रामस्थांसोबत चाईल्ड हेल्पलाईनचे विकास लोणकर व श्रीकांत वाघमारे यांनी बालदिन साजरा केला.

*******

No comments: