06 November, 2023

 

आंतरराष्ट्रीय दत्तक महिनानिमित्त जनजागृती

                                                                                                         


    

  हिंगोली (जिमाका), दि. 06 : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. आर. मगर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार आंतरराष्ट्रीय दत्तक महिना निमित्ताने हिंगोली जिल्ह्यात दि. 01 नोव्हेंबर, 2023 रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची भेट घेऊन आंतरराष्ट्रीय दत्तक महिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय दत्तक महिना संदर्भातील माहिती पत्रक आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या माहिती पुस्तिकेचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय, रेल्वे स्टेशन, हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशन व जिल्ह्यातील शाळेमध्ये माहिती पत्रक लावून जनजागृती करण्यात येत आहे. यावेळी हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आम्ले, पोलीस उपनिरीक्षक मुपडे, हिंगोली रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर अलोक शर्मा, आरपीएफ पीएसआय चव्हाण, जमादार कांबळे, हिंगोली जिल्हा रुग्णालयात एनआयएमच्या कर्मचारी परिचारिका ॲड. सुकेशनी ढवळे, वर्षा धुळे, शितल सुनके, संध्या मस्के, जिजा गिरी, भाग्यश्री राऊत, आश्विनी धुळे इत्यादी उपस्थित होते.

नोव्हेंबर हा महिना आंतरराष्ट्रीय दत्तक महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडून बालकासंदर्भात आणि बालकांशी निगडीत विविध विषयावर कार्यक्रम घेण्यात येत आहेत. कोणतेही बालक परस्पर दत्तक घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. यासाठी कायदेशीर प्रक्रिया www.cara.wcd.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन इच्छूक पालक बालकाला दत्तक घेऊ शकतो, अशी माहिती जिल्हा बाल सरंक्षण कक्षाचे अधिकारी, कर्मचारी गणेश मोरे, जरीबखॉन पठाण यांनी दिली. बालकांच्या कायद्याविषयीची माहिती रामप्रसाद मुडे यांनी दिली. बालकांसाठी चाईल्ड हेल्पलाईन 1098 बाबतची माहिती संदीप कोल्हे, अंकूर पाटोडे यांनी दिली. बालकांसाठी असलेल्या बाल संगोपन योजनेविषयीची माहिती राजरत्न पाईकराव, सुरज इंगळे, तथागत इंगळे यांनी दिली. तसेच यावेळी अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे भेट देण्याचे आवाहन करण्यात आले.    

*****    

No comments: