09 November, 2023

 

बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाचे भव्य विक्री प्रदर्शनाचे

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते उद्घाटन

  • तीन दिवशीय प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन

 

 


          हिंगोली (जिमाका), दि. 09 : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत दिपावली निमित्त बचत गटातील उत्पादित केलेल्या मालाचे दि. 8 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर, 2023 या तीन दिवसीय भव्य विक्री प्रदर्शनाचे रामलीला मैदानाच्या बाजूला असलेल्या महावीर भवन येथे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि. 8 नोव्हेंबर, 2023 पासून सुरु झाले असून या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी विलास जगताप, स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी व्ही. बी. बंटेवाड, आयसीआयसीआय बँकेचे व्यवस्थापक अनिल इंगोले, नगर परिषदेचे पंडित मस्के, चव्हाण उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर यांनी  मार्गदर्शन करताना बचत गटातील महिलांनी आता व्यवसायात उतरले पाहिजे, असे सांगून महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे कौतुक करुन महिलांना उद्योग वाढीस प्रोत्साहन दिले.  तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाचे कौतूक करत हिंगोली शहरातील नागरिकांनी या प्रदर्शनीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

            या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समन्वय अधिकारी विलास जगताप यांनी केले.  या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आयसीआयसीआय बँकेच्या वतीने चार बचत गटाना 33 लाख रुपयांचे कर्ज मंजुरीचे पत्र गटांना वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. तसेच औंढा लोकसंचलित साधन केंद्राच्या सहयोगीनीने इतनी शक्ती हमे देना दाता हे प्रार्थना गीत सादर केले.

      या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन औंढा लोकसंचित साधन केंद्राचे व्यवस्थापक विलास पंडित यांनी केले. तर आभार प्रदर्शन लेखाधिकारी संकेत महाजन यांनी केले.

       या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गजानन इंगळे, संतोष ठाकूर, रफिक सय्यद सर्व लोकसंचलित साधन केंद्राच्या अध्यक्षा, सर्व व्यवस्थापक, लेखापाल, उपजीविका सल्लागार, सहयोगिनी व सीआरपी यांनी परिश्रम घेतले.

 

*****

 

No comments: