नैतिकता व नितीमत्तेमुळे
एड्स आजाराला आळा..
दरवर्षी 1 डिसेंबर ते 7 डिसेंबर हा कालावधी एड्स सप्ताह म्हणून पाळण्यांत येत असून
यावर्षी ‘समाजाचा
पुढाकार-एचआयव्ही/एड्सचा समूळ नाश' हे घोषवाक्य युनायटेड
नेशनने घोषित केले आहे. एड्स आजाराच्या दृष्ट चक्राने आपला वेग वाढविला असून त्यांचे
गंभीर परिणाम पूढे येत आहे. या गंभीर आजाराबाबत दृष्टीक्षेपात माहिती देत आहे. |
नैतिकता व नितीमत्ता हे मानवाचे महत्वाचे आभूषण समजले जातात. समाजामध्ये या बाबीला अनन्यसाधारण महत्व आहे. नितीमत्ता व नैतिकता पाळणे हे सामाजिक बंधनातील
श्रृंखला म्हटले तरी वावगे ठरु नये. समाजातील अधपत:त व सामाजिक प्रतिष्ठा या दोन बाबीवरच आज
अवलंबूनआहे.
परंतु दिवसें-दिवस होत असलेल्या सैराचारामुळे तसेच दिवसागणिक बदलत
जाणारी सामाजिक परंपरा व सामाजिक मुल्य तसेच देशातील संस्कृतीवर परदेशातून होणारे
आक्रमण आदीच्या प्रकारामुळे नैतिक मूल्याचा ऱ्हास होत आहे. हे थांबविण्यासाठी समाजातील तरुण वर्गाला या दुष्परिणामाची वेळीच
जाणीव करुन दिल्यास गैरकृत्यापासून त्यांना सावध करता येऊ शकते. अशा गैरकृत्याच्या विळख्यात एड्स हा महाभयंकर
आजार समाजाला डोकेदुखी ठरत असून असंख्य कुटूंबियावर याचा आघात होत आहे.
एच.आय.व्ही./एडस् या आजाराचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने
सामाजिक वातावरण गंभीर स्वरुपाचे बनले आहे. अनेक पुरुषांनी आपला पुरुषार्थ दाखविण्यासाठी सैराचाराचा मार्ग
अवलंबल्यामुळे तसेच त्यांच्या बेफिकीर वृत्तीमुळे हा धोकादायक आजार आपले स्थान
घट्ट रोवत आहे. यामुळे अनेक निष्पाप नागरिक देखील त्यांची काही चूक नसताना या आजाराने
ग्रासल्याने सामाजिक आरोग्य ढवळून निघत आहे.
समाजात मुलाला अधिक महत्व असल्यामुळे मुलीकडे कायमचे दुर्लक्ष
होतांना दिसून येते. मुलाच्या लालसेपोटी पुरुष नेहमी कल्पना क्षेत्रात वावरतो तर कधी
कधी त्याला एकाकीपणा वाटतो, कामाच्या गुंतागुंतीमुळे परगावी जावे लागत असल्यामुळे त्यांचे
तेथील मानसिक ताण, दडपण व एकाकीपण दूर करण्यासाठी मद्यार्काच्या तसेच इतर मादक
सेवनाच्या आहारी जातो. या वाढीव सेवनामुळे अनेक वेळा त्यांचे वेश्यागमन होते परिणामी या
गंभीर आजाराचा त्याच्या आयुष्यामध्ये प्रवेश होतो.
किशोरवयीन मुलामुलींना समवयस्कांच्या आकर्षणामुळे कुतूहलापोटी अनेक
नवनवीन गोष्टीचा अनुभव घेण्याच्या प्रयत्नातून होणारा सैराचार व लैंगिकतेमुळे एड्स
हा आजार निर्माण होण्यास कारणीभूत ठरत आहे. एड्स झालेल्या व्यक्तींच्या रक्त प्रवाहातून दुसऱ्या व्यक्तीला हा
आजार होण्याची दाट शक्यता असते. अलिकडे या आजाराचे वाहक समाजातील अनेक घटक आहेत त्यांना पूरेशी
माहिती असल्यास त्यावर प्रतिबंध करण्यासाठी देखील मोठे योगदान ठरु शकतात.
एचआयव्ही
संसर्गित व्यक्तीने नियमित औषधोपचार, सकस आहार, योगा, व्यायाम तसेच कोणतेही व्यसन
न केल्यास आपले आयुष्यमान सामान्य होऊ शकते. परंतु त्यापेक्षा जास्त महत्वाचे
म्हणजे रुग्णांसोबत कोणताही भेदभाव न करता त्याला प्रेमाने वागवल्यास त्याची
मानसिक स्थिती चांगली राहते. एचआयव्ही संसर्गित व्यक्तीसोबत असुरक्षित लैंगिक
संबंध आल्याने, एचआयव्ही संसर्गित व्यक्तीचे रक्त घेतल्याने, एचआयव्ही संसर्गित
सुई/इंजेक्शनचा वापर केल्याने, एचआयव्ही संसर्गित आई वडिलांकडून होणाऱ्या बाळाला
एचआयव्ही संसर्ग होऊ शकतो.
प्रत्येक
गरोदर मातेने पहिल्या तिमाहीत आपली एचआयव्ही तपासणी करुन घेणे गरजेचे आहे. तसेच
आपली प्रसूती ही शासकीय रुग्णालयात करावी. जेणेकरुन वेळेत मिळणाऱ्या योग्य
औषधोपचारामुळे आई-वडिलापासून बाळाला होणारा एचआयव्ही संसर्ग टाळता येऊ शकतो.
हिंगोली
जिल्ह्यात महाराष्ट्रातील एकमेव व भारतातील दुसरी अशी जिल्हा एड्स प्रतिबंध व
नियंत्रण कक्ष व एआरटी ची अद्यावत स्वतंत्र इमारत उभारण्यात आली आहे.
जिल्ह्यात
आतापर्यंत एचआयव्ही तपासणी सामान्य गट- 4 लाख 30 हजार 192 व गरोदर माता- 4 लाख 18
हजार 861 करण्यात आली आहे. या एआरटी केंद्रामध्ये 3453 रुग्णांची नोंदणी झालेली
असून सध्या 1929 रुग्णावर उपचार सुरु आहेत.
मागील पाच वर्षापासून एचआयव्ही
ग्रास्त मातांपासून जन्मलेल्या एकूण 85 बालकांपैकी एकही बालक एचआयव्ही संसर्गबाधित
रुग्ण आढळून आलेला नाही हे या कार्यक्रमाचे मोठे यश आहे. हिंगोली जिल्ह्यात शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस
यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी व त्यांची टीम
उत्कृष्ट कार्य करत आहे,
या असाध्य आजारामुळे कुटूंबावर कुटाराघात तर होतोच त्याचप्रमाणे
समाजाची फार मोठी हानी होते. एडस्मुळे होणारी समाजातील बदनामी सामाजिक दर्जा खालवण्याला
कारणीभूत ठरते. यासाठी तारुण्यातील सैराचाराला आळा घालावा लागेल. त्याचबरोबर आरोग्य शिक्षण देतांना लैंगिकतेमुळे
समाजाची होणारी हानी दूर करण्यासाठी जागरुकता निर्माण करावी लागेल. या कार्याला अत्यल्प प्रतिसाद जरी मिळणार असला
तरी कालानुरुप समाज जीवनमानातील सकारात्मक बदल निश्चितपणे दिसून येईल. एड्सच्या या आजाराच्या महापाशातून प्रत्येकाने
दूर राहिल्यास सदृढ समाजाची दिशा निश्चितपणे प्रशस्त होऊ शकेल. त्यामुळे समाजाच्या
पुढाकारातून एचआयव्ही/एड्सचा समूळ नाश करुया !
-
जिल्हा माहिती
कार्यालय, हिंगोली
******
No comments:
Post a Comment