रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यात महारेशीम
अभियान
·
इच्छूक शेतकऱ्यांनी
नोंदणी करण्याचे आवाहन
- तुती लागवडीसाठी 3 लाख 97 हजार अनुदान
हिंगोली (जिमाका), दि. 20 : जिल्ह्यात रेशीम शेती
फायद्याची आहे. या शेतीचे शेतकऱ्यांना महत्व पटवून देण्यासोबतच जास्तीत जास्त शेतकऱ्यांना
रेशीम शेतीकडे आकर्षित करण्यासाठी जिल्ह्यात 20 नोव्हेंबर ते दि. 20 डिसेंबर, 2023
या कालावधीत महारेशीम अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियान कालावधीत शेतकऱ्यांनी रेशीम शेतीसाठी नाव नोंदणी करावे, असे आवाहन
जिल्हा रेशीम विकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
रेशीम उद्योग हा कृषिवर आधारित रोजगाराची प्रचंड क्षमता
असलेला उद्योग आहे. जिल्ह्यातील हवामान या उद्योगास पोषक असल्यामुळे रेशीम उत्पादन
करण्यास भरपूर वाव तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर व जीवनमान उंचावण्यास
मदत करणारा हा उद्योग आहे. शेतकऱ्यांना या उद्योगाची परिपूर्ण माहिती नसल्यामुळे जिल्ह्यातील
शेतकरी मोठ्या संख्येने या उद्योगाकडे वळलेले नाहीत. त्यामुळे व्यापक प्रमाणात जनजागृती
आणि तुती लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांची नोंदणी करणे या दुहेरी उद्देशाने हे महारेशीम
अभियान दि. 20 नोव्हेंबर ते दि. 20 डिसेंबर, 2023 या कालावधीत जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात
राबविले जात आहे.
जिल्ह्यात रेशीम लाभार्थ्यांची वाढ होण्यासाठी अभियानाच्या
माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाणार आहे. जिल्ह्याला रेशीम हब बनविण्याच्या
दृष्टीने रेशीम विभागाचे प्रयत्न आहे. सन 2017 पासून राबविल्या जाणाऱ्या महारेशीम अभियानाला
शेतकऱ्यांचा उत्सर्फूत प्रतिसाद मिळत आहे. रेशीम उद्योग लोकाभिमुख होण्यासाठी यावर्षी
सुध्दा अभियान आयोजित करण्यात आले आहे. अभियानात प्रशासकीय यंत्रणेसोबतच कृषि क्षेत्रात
कार्यरत संस्था, रेशीम लागवडीतून अधिकाधिक उत्पन्न मिळवणाऱ्या शेतकऱ्यांची मदत घेतली
जात आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण
रोजगार हमी योजनेंतर्गत रेशीम उद्योग विकास योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत
केवळ मजुरीसाठी 2 लाख 44 हजार रुपयाचे अनुदान, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार
हमी योजनेंतर्गत तुती लागवड, जोपासना, संवर्धन व किटक संगोपन करण्यासाठी 682 मनुष्य
दिवस, तसेच किटक संगोपनगृह बांधकामासाठी 213 मनुष्य दिवस मजुरी दर 273 रुपये, अकुशलसाठी
2 लाख 44 हजार 335 रुपये तर कुशलसाठी 32 हजार रुपये तसेच साहित्य व शेड बांधकामासाठी
01 लाख 21 हजार मिळणार आहेत.
रेशीम समग्र-2 योजना
:
रेशीम संचालनालयाच्या वतीने केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र-2
ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून तुती लागवड, किटक संगोपन गृह बांधकाम, किटक
संगोपन साहित्य, तुती लागवड फळबागा, बाल किटक संगोपन केंद्र, रेशीम कोषापासून धागा
तयार करण्यासाठी मल्टीएंड रिलींग मशीनसाठी सर्वसाधारण वर्गासाठी 75 टक्के अनुदान आणि
अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी 90 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.
या अभियानांतर्गत रेशीम शेती म्हणजे काय, या शेतीचे महत्व,
बाजारपेठेची उपलब्धता , रेशीम उद्योगासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात
येणार आहे. रेशीम उद्योग करण्यास इच्छुक लाभार्थ्यांची नाव नोंदणी केली जाणार आहे.
यासाठी शेतकऱ्यांनी नाव नोंदणीसाठी जिल्हा रेशीम कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन
करण्यात आले आहे.
तुती लागवडीसाठी 01 लाख 68 हजार 186 रुपये तर किटक संगोपनगृह
बांधकामासाठी 01 लाख 79 हजार तसेच साहित्यासाठी 32 हजार रुपये असे तीन वर्षासाठी एकूण
3 लाख 97 हजार 335 रुपये अनुदान दिले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी,
हिंगोली यांनी दिली आहे.
*******
No comments:
Post a Comment