09 November, 2023

 

जिल्हा युवा महोत्सवात अधिकाधिक युवकांच्या सहभागासाठी

योग्य नियोजन करावे

- अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 09 : युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्याच्या उद्देशाने हिंगोली येथे आयोजित करण्यात येणाऱ्या युवा महोत्सवात अधिकाधिक युवकांच्या सहभागासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय ठेवून योग्य नियोजन करावे, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात युवा महोत्सवाच्या आयोजनाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, नेहरु युवा केंद्र, कृषि विज्ञान केंद्र, जिल्हा माहिती कार्यालयाचे प्रतिनिधी, कृषि विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी आदी उपस्थित होते.   

संयुक्त राष्ट्रसंघाने सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. यावर्षीच्या राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्र राज्यासाठी तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर, सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान या संकल्पना दिलेल्या आहेत. त्यानुसार यावर्षीच्या जिल्हा युवा महोत्सवात कृषि विभागाने दिलेल्या संकल्पनेनुसार युवा वर्गाला सहभागी करुन घेऊन विविध उपक्रमाचे आयोजन करण्यावर भर द्यावा, असे अपर जिल्हाधिकारी श्री. परदेशी यांनी सूचित केले.

या युवा महोत्सवामध्ये सांस्कृतिक, कौशल्य विकास, संकल्पनावर आधारित स्पर्धा, युवा कृती या बाबींचा समावेश असणार आहे. या बाबीमध्ये लोकनृत्य, लोकगीत, कथा लेखन, फोटोग्राफी, पोस्टर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा (इंग्रजी व हिंदी), अस्पर्धात्मक बाबींचे आयोजन इत्यादी उपक्रमाचा समावेश असणार आहे. युवा महोत्सवात 15 ते 29 वयोगटातील युवांना सहभागी होता येणार आहे.

****

No comments: