27 November, 2026

महात्मा फुले महामंडळाच्या लाभार्थ्यांचे होणार सर्वेक्षण; हिंगोलीतील लाभार्थ्यांना सहकार्याचे आवाहन

 योजनांच्या परिणामकारकतेचे मूल्यांकन

हिंगोली, दि. २७ (जिमाका) : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजनांचा लाभ घेतलेल्या हिंगोली जिल्ह्यातील लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या माध्यमातून लाभार्थ्यांच्या व्यवसायाची सद्यस्थिती, उत्पन्न व रोजगारातील वाढ, कर्जाचा विनियोग आणि योजनांचा सामाजिक व आर्थिक स्थितीवर झालेला परिणाम यांचे मूल्यांकन केले जाणार आहे. या सर्वेक्षणासाठी नियुक्त प्रतिनिधींना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे.

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, मुंबई या महामंडळाची स्थापना १० जुलै १९७८ रोजी झाली आहे. मागासवर्गीय समाजातील घटकांचे सामाजिक व आर्थिक उत्थान करणे, स्वयंरोजगार व व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे आणि त्यांचे जीवनमान उंचावणे हे महामंडळाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या उद्देशाने महामंडळामार्फत विविध कर्ज व आर्थिक सहाय्य योजना राबविण्यात येतात.

महामंडळाच्या कर्ज योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांचे सर्वेक्षण आणि योजनांचे परिणाम मूल्यांकन (इम्पॅक्ट असेसमेंट) करण्याचा विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या १३ मार्च २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार 'एम/एस प्रीमूव्ह इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कन्सल्टंट्स प्रा. लि.' या संस्थेची तांत्रिक सहाय्य संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या संस्थेमार्फत राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणे हिंगोली जिल्ह्यातील लाभार्थ्यांचीही माहिती संकलित केली जाणार आहे.

या सर्वेक्षणात लाभार्थ्यांनी घेतलेल्या कर्जाचा वापर कोणत्या व्यवसायासाठी केला, सध्या व्यवसायाची स्थिती काय आहे, रोजगार व उत्पन्नात किती वाढ झाली, कर्जाची परतफेड कशी सुरू आहे, याची माहिती घेतली जाणार आहे. तसेच कर्ज वितरणानंतर व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी, व्यवसायाची प्रगती आणि योजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटींचाही अभ्यास केला जाणार आहे.

सर्वेक्षणातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे महामंडळाच्या योजनांची परिणामकारकता वाढविणे, भविष्यातील योजनांचे अधिक प्रभावी नियोजन करणे आणि लाभार्थ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील महामंडळाच्या कर्ज योजनांच्या सर्व लाभार्थ्यांनी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या नियुक्त प्रतिनिधींना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे.

No comments: