13 October, 2026

सर्व शासकीय सेवा ऑनलाईन देण्याचे आयुक्त डॉ. किरण जाधव यांचे निर्देश;१७ ऑक्टोबर रोजी 'बुक डोनेशन कॅम्प'चे आयोजन

हिंगोली जिल्हा परिषदेत राज्य सेवा हक्क आयोगाची आढावा बैठक
​हिंगोली, (दि. १३):-येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात आज छत्रपती संभाजीनगरचे राज्य सेवा हक्क आयोगाचे  विभागीय आयुक्त डॉ. किरण जाधव यांच्या अध्यक्षतेखाली विशेष आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा परिषदेअंतर्गत नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या विविध सेवांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नागरिकांना सर्व शासकीय सेवा दर्जेदार, पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने मिळण्यासाठी १०० टक्के सेवा ऑनलाईन देण्याच्या सूचना आयुक्त डॉ. किरण जाधव यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या.

​ *डिजिटल उपक्रमांचे कौतुक* 
​मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या संकल्पनेतून व पुढाकाराने विकसित करण्यात आलेल्या 'व्हॉट्सॲप चॅटबॉट' आणि 'इंटर डिपार्टमेंटल ॲप' या नाविन्यपूर्ण डिजिटल सुविधांची माहिती बैठकीत देण्यात आली. नागरिकांना या तंत्रज्ञानाचा वापर करून सहजरित्या शासकीय योजना व सेवांचा लाभ कसा घेता येतो, याचे प्रात्यक्षिक व माहिती सादर करण्यात आली.

​ *राज्यस्तरीय पुरस्कारांमुळे जिल्हा परिषदेचे अभिनंदन* 
​हिंगोली जिल्हा परिषदेला यापूर्वी १५० सेवा कर्मी कार्यक्रम, आय-गॉट (iGOT) कर्मयोगी, पोषण टँकर अभियान आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या चार महत्त्वाच्या राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आयुक्त डॉ. किरण जाधव यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड व संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

*​बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे व जिल्हा परिषदेची कामगिरी:*
​शिक्षण विभागांतर्गत जिल्हा परिषदेच्या १७० शिक्षकांना पदोन्नती देऊन केंद्रप्रमुख म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.
​आरोग्य विभागातील जिल्ह्यातील २४ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी १२ आणि १३९ आरोग्य उपकेंद्रांपैकी ५० आरोग्य संस्थांची राष्ट्रीय गुणांकन मानांकनासाठी पहिल्या टप्प्यात निवड करण्यात आली आहे. डीसीपीएस अंतर्गत १ हजार शिक्षकांपैकी ९०० शिक्षकांचे एनपीएस मध्ये यशस्वीरीत्या ट्रान्सफर करण्यात आले आहे.
​ई-ऑफिस व प्रलंबित प्रकरणे: जिल्ह्यात ई-ऑफिसचा प्राधान्याने वापर केला जात असून, दर आठवड्याला बैठका घेऊन प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढली जात आहेत.

​ *बचत गटांची लंडनपर्यंत धडक*
 महिला बचत गटांमार्फत ऑनलाईन माध्यमातून २२ प्रकारची हळदीचे उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या उत्पादनांना लंडनसारख्या परदेशातून मागणी येत आहे. जिल्ह्यात बचत गटांना पॅकेजिंग मशीनचे वाटप करण्यात आले असून, हिंगोली जिल्ह्यातील 'यलो गोल्ड' चे काम अत्यंत प्रशंसनीय आणि अभिनंदनास पात्र असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.
​जिल्ह्यातील ३१ हजार एकल महिलांना शासनाच्या विविध सामाजिक व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व इतर आवश्यक प्रमाणपत्रे शाळास्तरावरच उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घ्यावा, असे निर्देश आयुक्तांनी दिले.

​ *१७ ऑक्टोबर रोजी 'बुक डोनेशन कॅम्प'चे आयोजन*
​मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या संकल्पनेतून येत्या १७ ऑक्टोबर रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी 'बुक डोनेशन कॅम्प' चे आयोजन करण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या जवळील वाचून झालेली पुस्तके या कॅम्पमध्ये जमा करायची असून, त्याचा प्रत्यक्ष फायदा गरजू विद्यार्थ्यांना होणार आहे.
​या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) समृद्धी दिवाणे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) केशव गडापोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) विजय बोराटे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र पुरी, शिक्षणाधिकारी मंजुश्री कल्लेवाड, विपुल भागवत, संदीप सोनटक्के, कृषी अधिकारी अतुल वायसे, कार्यकारी अभियंता राजू नरवाडे आणि पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी बुचाले यांची प्रमुख उपस्थिती होती.
​बैठकीचे आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गडापोड यांनी मानले.
*******

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते जागर आदिशक्तीचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन; दुर्गेश काळे व संचाच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध

हिंगोली दि.१३ (जिमाका): सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या वतीने शहरातील शिवाजीराव देशमुख सभागृह येथे आयोजित ‘नवरतन जागर आदिशक्तीचा’ या सांस्कृतिक गीतांच्या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, मधुकर खंडागळे, सुरेश अप्पा सराफ, नीरज देशमुख, मिलिंद उबाळे, विशाल इंगोले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात आदिशक्तीच्या आराधनेवर आधारित विविध भक्तिगीतांचे सादरीकरण करण्यात आले. गायक दुर्गेश काळे आणि त्यांच्या संचाने आपल्या भारदस्त आवाजाने तसेच सुरेल सादरीकरणाने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. भक्तिमय वातावरणात रंगलेल्या या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

एचआयव्ही बाधितांबाबतचा दृष्टिकोन बदलण्याची गरज जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी यांचे आवाहन

 


        हिंगोली, दि. १३ (जिमाका) : एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्याबाबतचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे. त्यांच्याविषयी समाजातील  भेदभाव दूर करण्यासाठी  प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी यांनी केले.

        जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय, हिंगोली यांच्या वतीने पोलिस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी नुकतीच संवेदीकरण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या व्यक्ती आणि देहविक्री करणाऱ्या महिलांच्या सामाजिक समावेशनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

        यावेळी चौधरी यांनी एचआयव्ही प्रतिबंध, जनजागृती आणि बाधित व्यक्ती तसेच देहविक्री करणाऱ्या महिलांना विविध शासकीय सेवा व सुविधांचा लाभ मिळवून देण्याबाबत माहिती दिली. या घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध विभागांचा समन्वय आणि सामूहिक सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. एचआयव्हीबाबतची भीती, गैरसमज आणि भेदभाव दूर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी आवाहन केले.

        कार्यशाळेस पोलिस निरीक्षक संदीप मोदे, पोलिस निरीक्षक दत्ता केंद्रे यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार पोलिस निरीक्षक संदीप मोदे यांनी मानले.

सेवा संकल्प अभियानातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्याचा उपक्रम ग्लोबल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हा ग्रंथालयाला शैक्षणिक भेट

 

      


  हिंगोली, दि. १३ (जिमाका) : शासनाच्या सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने विशेष उपक्रम राबविण्यात आला. याअंतर्गत शिव शाहू प्रतिष्ठान संचलित व ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ पुरस्कारप्राप्त ग्लोबल पब्लिक स्कूल, पिंपळखुटा येथील विद्यार्थ्यांनी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाला शैक्षणिक भेट दिली. हिंगोली जिल्हा ग्रंथालयाला भेट देणारी ही पहिलीच शाळा ठरली आहे.

        या भेटीदरम्यान जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचे कामकाज, ग्रंथालय व्यवस्था आणि उपलब्ध संदर्भसाहित्याची माहिती दिली. तसेच अभ्यासासोबत अवांतर वाचनाचे महत्त्व, आवडीनुसार पुस्तकांची निवड आणि नियमित वाचनामुळे व्यक्तिमत्त्व विकासासह भाषिक कौशल्ये वृद्धिंगत होण्याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील विविध विभागांची उत्सुकतेने पाहणी करून ग्रंथालयाच्या कार्यपद्धतीची माहिती घेतली.

        या वेळी ग्लोबल पब्लिक स्कूलचे प्राचार्य प्रा. ज्ञानदत्त जऊळकर, उपप्राचार्या सुरेखा जगताप, समन्वयक कमलाजी जऊळकर, मयूर आवटे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

        सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकांविषयी आवड निर्माण करणे, वाचनाची सवय विकसित करणे आणि प्रशासकीय व शैक्षणिक संस्थांमधील समन्वय वाढविण्याचा उद्देश साध्य झाला.








राज्य सेवा हक्क अधिनियमांतर्गत क्रीडा विभागाच्या सेवांचा आयुक्त डॉ. किरण जाधव यांनी घेतला आढावा


        


    हिंगोली, दि. १३ (जिमाका) : राज्य सेवा हक्क आयोग, छत्रपती संभाजीनगर विभागाचे आयुक्त डॉ. किरण जाधव यांनी आज, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे भेट देऊन महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला. 

        या भेटीदरम्यान महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत क्रीडा विभागामार्फत नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सेवांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये खेळाडूंना देण्यात येणारी क्रीडागुण सवलत, खेळांची राज्य व राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन प्रमाणपत्रे तसेच खेळाडूंसाठी असलेल्या पाच टक्के आरक्षणासंदर्भातील माहितीचा आढावा घेण्यात आला.

        जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या सेवा व कार्यालयीन कामकाजाबाबत आयुक्त डॉ. किरण जाधव यांनी समाधान व्यक्त केले, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर यांनी दिली.

        यावेळी क्रीडा अधिकारी प्रविण कोडेंकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक निळकंठ श्रावण, वशिम शेक्ष, अर्जून पवार हे उपस्थित होते.

                                                                                  ***

ईआर-१ विवरणपत्राशिवाय वेतन देयके स्वीकारली जाणार नाहीत शासकीय, निमशासकीय कार्यालयांना सूचना


        हिंगोली, दि. १३ (जिमाका) : जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांनी सप्टेंबर २०२६ अखेरचे ईआर-१ (ER-1) त्रैमासिक विवरणपत्र ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ऑनलाईन सादर करावे. ऑक्टोबर २०२६ महिन्याचे वेतन देयक सादर करताना ईआर-१ विवरणपत्र भरल्याचे ऑनलाईन प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. प्रमाणपत्र जोडल्याशिवाय संबंधित आस्थापनांची मासिक वेतन देयके स्वीकारली जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.

        संबंधित आस्थापनांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरून सप्टेंबर २०२६ अखेरचे ईआर-१ त्रैमासिक विवरणपत्र ऑनलाईन भरून त्याचे प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांना या कार्यालयामार्फत यापूर्वीच युजर आयडी व पासवर्ड उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

        तसेच सर्व कार्यालये व आस्थापनांनी आपला ई-मेल आयडी, दूरध्वनी क्रमांक, पत्ता, टॅन क्रमांक आणि पॅन क्रमांक यांची नोंद करून महास्वयंम पोर्टलवरील आपली प्रोफाईल अद्ययावत करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

                                                                                ***

हिंगोलीत विजाभज आश्रमशाळांतील शिक्षकांची ‘STEM READY’ कार्यशाळा उत्साहात संपन्न विज्ञान-गणिताची भीती दूर करून कृतीआधारित शिक्षणाला चालना; हिंगोली जिल्ह्यातील ५८ आश्रमशाळा शिक्षकांचा सहभाग

 


        हिंगोली, दि. 13 ऑक्टोबर (जिमाका) : विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि गणित विषयांविषयी आवड निर्माण व्हावी, पाठांतराऐवजी प्रयोग, निरीक्षण आणि प्रत्यक्ष कृतीतून शिक्षणाची गोडी वाढावी. तसेच आश्रमशाळांनी शैक्षणिक गुणवत्तेची अधिकाधिक उंची गाठावी, या उद्देशाने इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत चालवल्या जाणाऱ्या विजाभज आश्रमशाळांमधील विज्ञान व गणित विषयांच्या शिक्षकांसाठी विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेली तीन दिवसीय ‘STEM READY’ कृतीयुक्त कार्यशाळा हिंगोली येथे उत्साहात संपन्न झाली. दिनांक ७ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत झालेल्या या कार्यशाळेत हिंगोली जिल्ह्यातील विजाभज आश्रमशाळांमधील एकूण ५८ विज्ञान व गणित शिक्षकांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण, रंजक आणि अनुभवाधारित शिक्षण मिळावे, या व्यापक शैक्षणिक दृष्टिकोनातून या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय स्तरावरील नामांकित संशोधन संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) पुणे यांच्या ‘STEM Ready’ संकल्पनेवर आधारित या कार्यशाळेतून शिक्षकांना विज्ञान व गणित अध्ययन - अध्यापनाच्या आधुनिक आणि प्रयोगशील पद्धतींची ओळख करून देण्यात आली.

गोडी अभ्यासाची विज्ञान-गणिताची भीती घालवण्याची

 विज्ञान आणि गणित हे विषय केवळ पाठ्यपुस्तकांतील सूत्रे, व्याख्या आणि संकल्पनांपुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाशी जोडले गेले पाहिजेत. हा या कार्यशाळेचा प्रमुख विचार होता. अनेकदा विज्ञानातील क्लिष्ट संकल्पना किंवा गणितातील सूत्रे विद्यार्थ्यांना अवघड वाटतात. ही भीती दूर करून विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, प्रश्न विचारण्याची वृत्ती आणि स्वतः प्रयोग करून पाहण्याचा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी कृतीयुक्त अध्ययन - अध्यापनावर विशेष भर देण्यात आला.

कार्यशाळेदरम्यान शिक्षकांना विविध प्रयोग, प्रत्यक्ष प्रात्यक्षिके, निरीक्षणे, गटकार्य आणि उपलब्ध साधनसामग्रीच्या मदतीने वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट करण्याच्या पद्धती शिकता आल्या. कमी खर्चातील आणि सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्याचा वापर करून विज्ञान व गणितातील अवघड संकल्पना विद्यार्थ्यांना सोप्या, रंजक आणि सहज समाजातील अशा पद्धतीने कशा शिकविता येतील, याचा प्रत्यक्ष अनुभव शिक्षकांनी घेतला.

STEM शिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाची रुजवण

STEM म्हणजे विज्ञान (Science), तंत्रज्ञान (Technology), अभियांत्रिकी (Engineering) आणि गणित (Mathematics). या चारही क्षेत्रांतील संकल्पनांचा परस्परसंबंध स्पष्ट करून विद्यार्थ्यांना केवळ माहिती देण्याऐवजी विचार करणे, प्रयोग करणे, निरीक्षणातून निष्कर्ष काढणे आणि समस्यांवर उपाय शोधणे यासाठी सक्षम बनविणे, हे STEM शिक्षणाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. या दृष्टिकोनातून शिक्षकांनी वर्गामध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढविणे, त्यांना स्वतः प्रयोग करण्याची संधी देणे, प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि पुराव्यांच्या आधारे निष्कर्ष काढण्याची सवय लावणे आवश्यक असल्याचे प्रशिक्षणातून अधोरेखित करण्यात आले.

‘कृतीतून शिक्षण, अनुभवातून आकलन आणि जिज्ञासेतून संशोधन’ या विचाराला केंद्रस्थानी ठेवून राबविण्यात आलेली ही कार्यशाळा आश्रमशाळांतील अध्ययन - अध्यापन अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली.

आश्रमशाळांतील शैक्षणिक गुणवत्तावाढ व संवर्धनासाठी महत्त्वाचे पाऊल

आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विज्ञान आणि गणित विषयांचा प्रत्यक्ष अनुभव मिळणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना प्रयोग करण्याची संधी मिळाल्यास त्यांची निरीक्षणक्षमता, तर्कशक्ती, सृजनशीलता, चिकित्सक विचारशक्ती आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित होण्यास मदत होते. त्याचबरोबर स्वतः कृती करून शिकल्यामुळे संकल्पनांचे आकलन अधिक चांगल्या प्रकारे होते आणि शिकलेले ज्ञान कायम लक्षात राहते.

या कार्यशाळेनंतर शिक्षकांनी कार्यशाळेत शिकलेल्या पद्धतींचा वापर आपल्या शाळांमध्ये प्रभावीपणे करू, विद्यार्थ्यांना गटा - गटांमध्ये प्रयोग करण्यास प्रेरित करू आणि विज्ञान - गणित विषयांना दैनंदिन जीवनातील उदाहरणांशी जोडू, अशी ग्वाही दिली.  या उपक्रमामुळे आश्रमशाळांमधील अध्ययन - अध्यापन अधिकाधिक विद्यार्थी – केंद्रित, अनुभवाधारित आणि प्रयोगशील होण्यास चालना मिळणार आहे. ग्रामीण तसेच सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने ही कार्यशाळा महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

शिक्षकांना STEM साहित्याची किट प्रदान

कार्यशाळेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रशिक्षणात सहभागी झालेल्या प्रत्येक शिक्षकाला शालेय अध्यापनात उपयोगी पडणारे STEM साहित्य असलेली किट प्रदान करण्यात आली. या साहित्याच्या मदतीने शिक्षकांना कार्यशाळेत शिकलेल्या प्रयोगांची आणि कृतींची आपल्या शाळांमध्ये अंमलबजावणी करता येणार आहे.

कार्यशाळा केवळ तीन दिवसांपुरती मर्यादित न राहता तिचा प्रत्यक्ष लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, विज्ञान व गणिताच्या अध्ययन - अध्यापनात नावीन्यपूर्ण प्रयोगांचा समावेश व्हावा आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याच्या अधिकाधिक संधी मिळाव्यात, या दृष्टीने ही किट उपयुक्त ठरणार आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि प्रशासकीय सहकार्य

इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पुढाकारातून शिक्षकांच्या क्षमता विकासासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे विशेष कार्यकारी अधिकारी (OSD) नानासाहेब कदम, सचिव आप्पासो धुळाज, संचालक श्रीमती सोनाली मुळे, लातूर प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक उपसंचालक डॉ. तेजस माळवदकर  आणि हिंगोली जिल्ह्याचे सहाय्यक संचालक प्रदीप धर्माधिकारी यांचे विशेष सहकार्य व मोलाचे मार्गदर्शन लाभले.

IISER पुणे च्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन व प्रशिक्षक टीमचे मोलाचे योगदान

या तीन दिवसीय कार्यशाळेसाठी IISER पुणे येथील तज्ज्ञांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यामध्ये प्रा. अर्नब मुखर्जी (Dean, International Relations and Outreach), प्रा. देवप्रिया चट्टोपाध्याय (Associate Dean, International Relations and Outreach), श्री. अशोक रुपनर (Senior Technical Officer), अंकिश तिरपुडे (Technical Officer) आणि डॉ. चैतन्य मुंगी (STEM Ready Project Coordinator) यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या समन्वयाची जबाबदारी अमोल देशमुख (Administrative Assistant) यांनी सांभाळली. 

तसेच प्रशिक्षक टीममधील  सर्वेश गोरीवले (Teaching Associate), सुश्री प्रांजली सोहनी (Teaching Assistant), आदिनाथ सोळुंके (Lab Technician), भरत ठोंबरे (Teaching Fellow) आणि शुभांगी गोरे-वाघ (Teaching Fellow) यांनी विविध प्रयोग, प्रात्यक्षिके आणि कृतीआधारित अध्यापनाच्या माध्यमातून शिक्षकांना मार्गदर्शन दिले. 

तज्ज्ञांचे मार्गदर्शन,  प्रशिक्षकांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग यांमुळे कार्यशाळा अनुभवसमृद्ध व परिणामकारक ठरली. कार्यशाळा अधिक प्रभावी होण्यासाठी संपूर्ण टीमने विशेष परिश्रम घेतले.

गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दिशेने आश्वासक वाटचाल

हिंगोली जिल्ह्यातील ५८ विज्ञान व गणित शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग हा आश्रमशाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याच्या प्रयत्नांना बळ देणारा ठरला. शिक्षकांनी प्रशिक्षणातून आत्मसात केलेले ज्ञान, कौशल्ये आणि अध्यापनाच्या नव्या पद्धती वर्गखोल्यांपर्यंत पोहोचविल्यास विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व गणित विषयांविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत होईल. शिक्षकांच्या हातातील प्रयोगशीलता ही विद्यार्थ्यांच्या मनातील जिज्ञासा जागवते आणि जिज्ञासेतूनच वैज्ञानिक दृष्टिकोनाची निर्मिती होते. या विचाराला प्रत्यक्ष कृतीची जोड देणारी ‘STEM READY’ कार्यशाळा आश्रमशाळांतील शिक्षण अत्यधिक कृतियुक्त, आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण बनविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली आहे.

कोठारी येथे चारा साक्षरता अभियान सोयाबीनच्या कुटारावर युरिया प्रक्रिया करून सकस चारा तयार करण्याचे प्रात्यक्षिक


        हिंगोली, दि. १३ (जिमाका) : दुष्काळी परिस्थितीत जनावरांसाठी चाऱ्याचे योग्य नियोजन करण्यासह निकृष्ट चारा सकस करून जनावरांना खाऊ घालण्याबाबत पशुपालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी वसमत तालुक्यातील मौजे कोठारी येथे चारा साक्षरता अभियानांतर्गत मार्गदर्शन व प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. या उपक्रमात गावातील ४५ पशुपालकांनी सहभाग घेतला.

        या वेळी सोयाबीनच्या कुटारावर युरिया प्रक्रिया करून तो अधिक पौष्टिक व सकस बनविण्याची पद्धत प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगण्यात आली. दुष्काळी परिस्थितीत उपलब्ध चाऱ्याचा योग्य वापर करून जनावरांना पोषक आहार उपलब्ध करून देण्याबाबत पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात आले.

        मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, हिंगोली तसेच तालुका पशुसंवर्धन अधिकारी, वसमत यांच्या सूचनेनुसार तालुक्यातील प्रत्येक गावात चारा साक्षरता अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पशुपालकांना चारा व्यवस्थापन, निकृष्ट चाऱ्याचे सकस चाऱ्यात रूपांतर आणि दुष्काळी परिस्थितीत जनावरांची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.

        या वेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सिद्धार्थ इंगोले यांनी पशुपालकांना मार्गदर्शन केले.

सर्व शासकीय सेवा 100 टक्के ऑनलाइन करण्यावर भर द्या - राज्य सेवा हक्क आयुक्त डॉ. किरण जाधव लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करून विहित कालावधीत सेवा देण्याचे आवाहन

 

        हिंगोली, दि. १३ (जिमाका) : नागरिकांना दर्जेदार, पारदर्शक आणि गतिमान प्रशासनाचा अनुभव देण्यासाठी सर्व शासकीय कार्यालयांनी १०० टक्के शासकीय सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करून नागरिकांना विहित कालावधीत सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश राज्य सेवा हक्क आयुक्त डॉ. किरण जाधव यांनी दिले.

        महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित सेवांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी डॉ. किरण जाधव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अपर जिल्हाधिकारी महेंद्र कांबळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

        जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या पुढाकाराने विकसित करण्यात आलेल्या सेवादूत आणि तक्रार निरीक्षण प्रणालीअंतर्गत स्मार्ट हिंगोली चॅटबॉट, सेवादूत हिंगोली आणि हिंगोली कलेक्टर या डिजिटल सुविधांची माहिती यावेळी सादरीकरणाद्वारे देण्यात आली. नागरिक या सुविधांचा वापर करून विविध शासकीय सेवांचा लाभ कसा घेऊ शकतात, याची माहितीही देण्यात आली. तसेच महसूल विभागासह विविध विभागांच्या लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत कामकाजाचा आणि विभागनिहाय आरटीएस डॅशबोर्ड अहवालाचा आढावा घेण्यात आला. ग्रामपंचायत स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्रांमधून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सेवांची सद्यस्थिती, केंद्रांचे एकसमान नामफलक व पायाभूत सुविधांबाबतचे मानके आणि केंद्रांच्या तपासणी प्रक्रियेची माहिती सादर करण्यात आली. शून्य व्यवहार असलेल्या केंद्रचालकांना केंद्रे कार्यान्वित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

        माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व इतर आवश्यक प्रमाणपत्रे शाळास्तरावरच उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने प्रयत्न करावेत. कृषी विभागाच्या योजनांचाही सेवादूत प्रणालीच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्यावर भर द्यावा, जेणेकरून शेतकऱ्यांना घरबसल्या शासकीय सेवांचा लाभ घेता येईल. शासकीय कामानिमित्त कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना सन्मानपूर्वक वागणूक द्यावी आणि त्यांच्या बसण्याची योग्य व्यवस्था करावी. तसेच सर्व कार्यालयप्रमुखांनी आरटीएस डॅशबोर्ड नियमितपणे अद्ययावत ठेवून त्याचा प्रभावी वापर करावा, अशा सूचना आयुक्त डॉ. किरण जाधव यांनी दिल्या.

        यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे लवकरच आदर्श आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली. या केंद्रामुळे नागरिकांना विविध शासकीय सेवांसाठी तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता भासणार नाही. सर्व तालुक्यांमध्ये उपलब्ध असलेल्या सेवा एकाच ठिकाणी मिळण्याची सुविधा या केंद्रामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच आरटीएस डॅशबोर्डचा अधिकाधिक वापर करून प्रशासकीय कामकाजात गतिमानता व पारदर्शकता आणण्यावर भर देण्यात येईल.  तसेच यासंदर्भात नियमित आढावा घेण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी गुप्ता यांनी सांगितले.

        सदरील बैठकीचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नायब तहसीलदार अश्विन माने यांनी तर बैठकीचे सादरीकरण गंगाधर लोंढे, उमाकांत मोकरे व शेख मुदसर यांनी केले.

                                                                          ***    

12 October, 2026

पाणीटंचाईचे आराखडे १५ ऑक्टोबरपूर्वी सादर करा - मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड

▶️ चारा टंचाई टाळण्यासाठी आतापासूनच उपाययोजनांचे नियोजन करण्याच्या सूचना 
हिंगोली, दि. १२ (जिमाका) : जिल्ह्यातील पाचही तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई निवारणाचे आराखडे १५ ऑक्टोबरपूर्वी सादर करावेत. तसेच, आगामी काळात पशुधनासाठी चाऱ्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी आतापासूनच नियोजन करून उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिले.

जिल्हा परिषदेच्या सभागृहात श्री. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक झाली. या बैठकीत पाणीटंचाई, दुष्काळी परिस्थिती, चारा व्यवस्थापन आणि प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेण्यात आला.

 *पाणीटंचाई निवारणासाठी नियोजन करा* 

जिल्ह्यातील कोल्हापुरी बंधारे, पाझर तलाव आणि गाव तलावांमधील पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात आला. पाझर तलावांमधून पाण्याचा उपसा होत असल्यास तो तातडीने बंद करावा. जिल्हाधिकाऱ्यांनी पाणी उपशाबाबत दिलेल्या आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या.

गावातील प्रत्येक पाणीस्रोताची नोंद घेऊन त्याची माहिती सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजनांचे आराखडे तयार करावेत आणि ते १५ ऑक्टोबरपूर्वी सादर करावेत, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.

 *चारा टंचाई टाळण्यासाठी आतापासूनच उपाययोजना* 

दुष्काळाच्या परिस्थितीत पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध राहावा, यासाठी पशुसंवर्धन विभागाने आतापासूनच नियोजन करावे. चारा टंचाई निर्माण होण्यापूर्वी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश गायकवाड यांनी दिले.

सध्या हार्वेस्टरच्या साहाय्याने ऊसतोडणी होत असल्याने ऊसाचे वाढे शेतातच राहतात. त्यांचा जनावरांसाठी चारा म्हणून उपयोग व्हावा, यासाठी जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांना ऊसतोडणीच्या पद्धतीत आवश्यक बदल करण्याबाबत कळवावे, अशा सूचना देण्यात आल्या.

तसेच, शेतकऱ्यांशी समन्वय साधून ज्वारी, मका आणि बाजरी यांसारख्या वैरण पिकांची लागवड करण्यास प्रोत्साहन द्यावे. उपलब्ध साधनसंपत्तीचा योग्य वापर करून पशुधनासाठी चाऱ्याचे नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.

 *प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढा* 

बैठकीत प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे, ई-ऑफिस, आपले सरकार पोर्टल, तारांकित व अर्धशासकीय पत्रे तसेच शासनस्तरावरील प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. प्रलंबित प्रकरणांचा निपटारा वेळेत करून प्रशासकीय कामकाजाला गती द्यावी, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिले.

बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) समृद्धी दिवाने, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) विजय बोराटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, शिक्षणाधिकारी मंजुश्री कल्लेवाड, विपुल भागवत, संदीप सोनटक्के, कृषी अधिकारी अतुल वायसे, कार्यकारी अभियंता राजू नरवाडे आणि पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी बुचाले उपस्थित होते. सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.

हिंगोलीत दिव्यांग क्रिकेट स्पर्धेचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते उद्घाटनबोधडी विद्यालयाच्या अंध क्रिकेट संघासह व्हीलचेअर क्रिकेट संघ ‘बी’चे प्रथम पारितोषिकावर नाव


हिंगोली, दि. १२ (जिमाका): सार्वजनिक दसरा महोत्सव समिती आणि पत्रकार क्रिकेट संघ, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने दसरा महोत्सवानिमित्त आयोजित दिव्यांग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते आज १२ ऑक्टोबर संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर करण्यात आले.

या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेत व्हीलचेअर क्रिकेटचा सामना हिंगोलीच्या दिव्यांग व्हीलचेअर क्रिकेट संघाच्या ‘ए’ आणि ‘बी’ या संघांमध्ये झाला. या सामन्यात ‘बी’ संघाने विजय मिळवून प्रथम पारितोषिक पटकावले. विजेत्या संघाला पाच हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

दुसऱ्या सामन्यात बोधडी येथील अंध विद्यालयाचा क्रिकेट संघ आणि लातूर येथील अंध क्रिकेट संघ यांच्यात सामना झाला. या सामन्यात बोधडी येथील अंध विद्यालयाच्या संघाने प्रथम पारितोषिक मिळविले. विजेत्या संघाला पाच हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी सुमित चौधरी, नफीज पैलवान, विलास गोरे,  रजनीश पुरोहित, अंध विद्यालयाचे मुख्याध्यापक आशिष पिंगळकर, गोपाल भोस आदी उपस्थित होते.

स्पर्धेच्या यशस्वितेसाठी पत्रकार क्रिकेट संघाचे कर्णधार विजय गुंडेकर, गजानन मगर, राकेश भट्ट, सुनील पाठक, सुधीर गोगटे, सुमित कान्हेड, दिलीप हळदे, संतोष आठवले, सुनील नागरे, बाबा ढोकणे, गणेश घ्यार, बाळू जाधव, विकास जाधव, सचिन कावडे, सुधाकर वाढवे, राजेंद्र हलवाई, प्रशांत गुप्ता, गोपाल सरनायक, श्याम सोळंके, नामदेव कापसे, कपिल सावळे, निलेश गरवारे, अनिस अहमद, अरुण दिपके, शेख मजर, मदन शेळके आदींनी परिश्रम घेतले.

चारा टंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाययोजनाऊसाचे वाढे, गाळपेरा जमिनीवरील वैरण आणि मुरघास निर्मितीवर भर

हिंगोली, दि. १२ (जिमाका) : जिल्ह्यातील पाचही तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्याने पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पशुसंवर्धन विभागाने विविध उपाययोजना सुचविल्या आहेत. ऊसाचे वाढे, पाटबंधारे प्रकल्पांच्या गाळपेरा जमिनीवरील वैरण, वनक्षेत्रातील गवत आणि मुरघासाचा वापर करून चारा टंचाईवर मात करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. एस. टी. बुचाले यांनी दिली.

सध्या हार्वेस्टरद्वारे ऊसतोडणी होत असल्याने ऊसाचे वाढे शेतातच पडून राहतात. त्यांचा जनावरांसाठी चारा म्हणून वापर व्हावा, यासाठी जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांना ऊसतोडणीच्या पद्धतीत आवश्यक बदल करण्याबाबत कळविण्यात आले आहे. ऊसतोडणी मजुरांमार्फत केल्यास हे वाढे पशुधनासाठी उपलब्ध होऊ शकतात. पूरक खाद्यासोबत त्यांचा वापर केल्यास दुष्काळात चारा उपलब्धतेस मदत होईल.

जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील मोठ्या, मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयांतील पाणी कमी झाल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या गाळपेरा जमिनीवर ज्वारी, मका आणि बाजरी यांसारख्या वैरण पिकांची लागवड करण्याचे नियोजन आहे. शासनाच्या नियमानुसार या जमिनी शेतकरी, पशुपालक आणि स्वयंसेवी संस्थांना उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित विभागांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. तसेच वनक्षेत्रातील उपलब्ध गवताचा नियमानुसार पशुधनासाठी वापर करण्याच्या दृष्टीने वन विभागालाही उपाययोजना करण्यास सांगण्यात आले आहे.

हिरव्या चाऱ्याची साठवणूक करून तो टंचाईच्या काळात वापरता यावा, यासाठी मुरघास निर्मितीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. चारा उत्पादक शेतकरी उत्पादक संघ आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना हिरवा चारा उपलब्ध करून देण्यासाठी तालुकास्तरावर तातडीने लिलाव प्रक्रिया राबविण्याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना निर्देश देण्याची विनंती करण्यात आली आहे. या उपाययोजनांमुळे उपलब्ध चाऱ्याचे योग्य व्यवस्थापन होऊन दुष्काळाच्या काळात पशुधनासाठी सकस चारा उपलब्ध ठेवण्यास मदत होईल, असे डॉ. बुचाले यांनी सांगितले.

माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करावा


शासकीय, निमशासकीय कार्यालयांसह विविध संस्थांना उपक्रम राबविण्याचे निर्देश

हिंगोली, दि. १२ (जिमाका) : माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन १५ ऑक्टोबर हा दिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शासकीय संस्था, मंडळे तसेच सार्वजनिक उपक्रमांच्या कार्यालयांनी विविध उपक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शासनाच्या ८ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या परिपत्रकानुसार, वाचन प्रेरणा दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
त्यानुसार, शासन परिपत्रकातील सूचनांनुसार १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन साजरा करून वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणारे विविध उपक्रम राबवावेत, असे परिपत्रक उपजिल्हाधिकारी (महसूल), हिंगोली यांनी निर्गमित केले आहे.

10 October, 2026

जिल्हा रुग्णालय, हिंगोली येथे जागतिक हॉस्पिस व पॅलिएटिव्ह केअर दिन साजरा


हिंगोली, दि.१० ऑक्टो (जिमाका): शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आज  जिल्हा रुग्णालय हिंगोली येथे जागतिक हॉस्पिस व पॅलिएटिव्ह केअर दिन जिल्हा रुग्णालय, हिंगोली येथे साजरा करण्यात आला.
“वेदना व्यवस्थापन “वेदना कमी करूया, जिवनमान सुधारूया, रुग्णांना सन्मानाने जगण्याचा आधार देऊया. ही या वर्षीची थीम आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अति. जिल्हा शल्यचिकित्स्क डॉ. दिपक मोरे, डॉ. उद्धव पोघे ( मानसोपचार तज्ञ) बाळासाहेब चिंचकर उपस्थित होते.
 कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करून करण्यात आली डॉ. दिपक मोरे यांच्या हस्ते करण्यात आली. पॅलिएटिव्ह केअर कार्यक्रमची माहिती, जनजागृती व समुपदेशन याविषयी माहिती डॉ.उद्धव पोघे यांनी दिली. तसेच या दिनाचे औचित्य साधून रुग्णांची शुगर, बी. पी. तपासणी करण्यात आली व पॅलिएटिव्ह केअर रुग्णांची कशी काळजी घ्यावी या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. 
प्रस्तावना  केशव होळंबे यांनी केली व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दिलीप गडदे यांनी केले. या कार्यक्रमास शासकीय नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी आदींची उपस्थिती होती.

चारा साक्षरता अभियानातून निकृष्ट चारा सकस करण्याचे प्रात्यक्षिक परजना व बोथी येथे पशुपालकांना मार्गदर्शन; सोयाबीनच्या कुटारावर युरिया प्रक्रिया करण्याचे प्रात्यक्षिक

हिंगोली, दि. १० (जिमाका) : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता वाढविण्यासह निकृष्ट चारा सकस करून जनावरांना खाऊ घालण्याबाबत पशुपालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात चारा साक्षरता व संवर्धन अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत वसमत तालुक्यातील परजना आणि कळमनुरी तालुक्यातील बोथी येथे निकृष्ट चारा सकस करण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.

परजना येथे २८ पशुपालकांचा सहभाग
पशुवैद्यकीय चिकित्सालय, गिरगाव यांच्या अंतर्गत परजना येथे आयोजित प्रात्यक्षिकादरम्यान सोयाबीनच्या कुटारावर युरिया प्रक्रिया करून तो अधिक पौष्टिक व सकस बनविण्याबाबत पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी गावातील २८ पशुपालक उपस्थित होते. तसेच पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांची माहिती देऊन जनावरांचा विमा उतरविण्याचे आवाहन करण्यात आले.

बोथी येथे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक
कळमनुरी तालुक्यातील बोथी येथेही चारा साक्षरता अभियानांतर्गत निकृष्ट चारा सकस करण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. तालुका पशुसंवर्धन व दुग्ध विकास अधिकारी डॉ. सुधाकर बंडेवार यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले आणि उपस्थित पशुपालकांना मार्गदर्शन केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा उपआयुक्त, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, हिंगोली यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील पशुपालकांना चारा व्यवस्थापनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि उपलब्ध चाऱ्याचा योग्य वापर करण्यासाठी प्रत्येक गावात हे अभियान राबविण्यात येत आहे.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुपालकांना चारा नियोजनाचे मार्गदर्शन


हिंगोली, दि. १० (जिमाका) : दुष्काळाच्या परिस्थितीत जनावरांसाठी चाऱ्याचे योग्य नियोजन करणे तसेच उपलब्ध निकृष्ट चारा सकस करून जनावरांना खाऊ घालणे शक्य व्हावे, यासाठी वसमत तालुक्यातील कुरुंदवाडी येथे चारा साक्षरता अभियानांतर्गत पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात आले. पशुवैद्यकीय चिकित्सालय, कुरुंदा यांच्या वतीने १० ऑक्टोबर रोजी आयोजित या प्रशिक्षणात गावातील २४ पशुपालक सहभागी झाले होते.
या प्रशिक्षणादरम्यान सोयाबीनच्या कुटारावर युरिया प्रक्रिया करून त्याची पौष्टिकता वाढविणे आणि तो जनावरांना सकस चारा म्हणून खाऊ घालण्याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली. दुष्काळाच्या काळात उपलब्ध चाऱ्याचा योग्य वापर करून जनावरांचे पोषण कसे करावे, याबाबतही पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा उपआयुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, हिंगोली यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील पशुपालकांमध्ये चारा व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावात चारा साक्षरता अभियान राबविण्यात येत आहे.

09 October, 2026

एचआयव्ही बाधितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व विभागांचा समन्वय आवश्यक


शासकीय सेवा-सुविधांचा लाभ मिळवून देण्यावर भर



    हिंगोली, दि. ९ (जिमाका) : एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांना विविध शासकीय सेवा व सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी यांनी केले.

        जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय, हिंगोली यांच्या वतीने आज विविध विभागांतील अधिकाऱ्यांची संवेदीकरण बैठक घेण्यात आली. यावेळी एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या व्यक्तींच्या सामाजिक समावेशनाबाबत चर्चा करण्यात आली.

    बैठकीत श्री.चौधरी यांनी एचआयव्ही प्रतिबंध, जनजागृती आणि संसर्गित व्यक्तींना विविध शासकीय सेवा व सुविधांचा लाभ मिळवून देण्याबाबत मार्गदर्शन केले. संबंधित व्यक्तींना आवश्यक सेवा-सुविधा मिळवून देताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. तसेच एचआयव्हीबाबतची भीती, भेदभाव दूर करण्यासाठी सर्व विभागांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

    या बैठकीस माविमचे बाळासाहेब झिंजाडे, संतोष ठाकूर, महिला व बालकल्याण विभागाचे जी. जी. कापसे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, समाजकल्याण विभागाचे हरिभाऊ पोपळघट, जिल्हा कौशल्य विकास विभागाचे श्रीराम मगर, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. श्रीधर घुगे, संजय गांधी योजनेचे संजय पाईकराव, वन स्टॉप सेंटरचे दिनेश पाटील, बाल कल्याण समितीचे सदस्य परसराम हेम्बाडे, जिल्हा दिव्यांग समन्वयक केंद्राचे विजय मारकड आणि विहान संस्थेच्या समन्वयक अलका रणवीर उपस्थित होते.

निवडणुकीच्या अनुषंगाने दिलेल्या जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडा- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 निवडणुकीच्या अनुषंगाने दिलेल्या जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडा- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता                                                                                                                                                                                           मतदान अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण संपन्न



हिंगोली, दि. ९ (जिमाका) : ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली आहे. निवडणुक विषयक कामे पार पाडण्यासाठी विविध 25 पथकांची स्थापना केली आहे. निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर सोपविलेल्या जबाबदाऱ्या समन्वयाने आणि काटेकोरपणे पार पाडाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

जिल्हा नियोजन सभागृहात आज पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. अपर जिल्हाधिकारी महेंद्र कांबळे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रगती चौंडेकर, तहसीलदार अश्विनकुमार माने यांच्यासह प्रशिक्षणार्थी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने ९, १६ आणि २२ ऑक्टोबर रोजी तीन प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापैकी पहिले प्रशिक्षण आज पार पडले. या प्रशिक्षणात अपर जिल्हाधिकारी महेंद्र कांबळे आणि तहसीलदार अश्विनकुमार माने यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणादरम्यान दिलेल्या सूचनांचे गांभीर्याने पालन करून निवडणुकीची कामे जबाबदारीने पार पाडावीत. मतदानाच्या दिवशी कोणतीही अडचण उद्भवू नये, यासाठी निवडणूक प्रक्रियेची संपूर्ण माहिती गांर्भीयाने करून घ्यावी, असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले. तसेच मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची माहितीही त्यांनी दिली.

निवडणुकीसाठी २५ विविध पथकांची स्थापना

निवडणूक प्रक्रिया प्रभावीपणे पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली २५ विविध पथकांची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये आदर्श आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था, मतदान कर्मचारी व्यवस्थापन, टपाली मतपत्रिका, उमेदवार व राजकीय पक्षांच्या निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवणे व त्याची नोंद घेणे, माध्यम व्यवस्थापन, निवडणूक साहित्य, वाहन व्यवस्था तसेच विविध परवानग्या देण्यासाठी एक खिडकी योजना आदी पथकांचा समावेश आहे.

मतपेटी सीलबंद करण्याचे प्रात्यक्षिक

प्रशिक्षणादरम्यान मतदानापूर्वी मतपेटी तयार करण्याची प्रक्रिया तसेच मतदान पूर्ण झाल्यानंतर मतपेटी योग्य पद्धतीने सीलबंद करण्याबाबत अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली. निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर विहित नियमांनुसार कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधांची व्यवस्था

मतदारांना मतदानासाठी कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, दिव्यांग मतदारांसाठी उतारमार्ग (रॅम्प), प्रकाशव्यवस्था आणि स्वच्छतागृहे यांसारख्या किमान भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

२३० अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-२०२६ साठी हिंगोली जिल्ह्यात १५ क्षेत्रीय अधिकारी, ४३ मतदान केंद्राध्यक्ष, १३० मतदान अधिकारी-कर्मचारी आणि ४२ सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आज प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

सर्व नियुक्त अधिकारी- कर्मचारी यांनी प्रशिक्षण गांर्भीयाने घ्यावे. प्रशिक्षणाला अनुपस्थित राहणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

निकृष्ट चाऱ्यावर प्रक्रिया करून सकस चारा तयार करण्याचे प्रात्यक्षिक मुरुंबा येथे चारा साक्षरता अभियान; ३४ पशुपालकांचा सहभाग

 निकृष्ट चाऱ्यावर प्रक्रिया करून सकस चारा तयार करण्याचे प्रात्यक्षिक

मुरुंबा येथे चारा साक्षरता अभियान; ३४ पशुपालकांचा सहभाग



हिंगोली, दि. ९ (जिमाका) : दुष्काळी परिस्थितीत जनावरांना पुरेसा व सकस चारा उपलब्ध व्हावा, यासाठी वसमत तालुक्यातील प्रत्येक गावात चारा साक्षरता अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पशुवैद्यकीय चिकित्सालय, पळसगाव यांच्या वतीने मुरुंबा येथे निकृष्ट चाऱ्यावर प्रक्रिया करून तो सकस बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या प्रशिक्षणात गावातील ३४ पशुपालक सहभागी झाले.

दिनांक ९ ऑक्टोबर रोजी आयोजित या प्रशिक्षणात सोयाबीनच्या कुटारावर युरिया प्रक्रिया करून त्याची पौष्टिकता वाढविणे आणि जनावरांना सकस चारा उपलब्ध करून देणे याबाबत पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात आले. दुष्काळी परिस्थितीत उपलब्ध चाऱ्याचा योग्य वापर करून जनावरांचे पोषण कसे टिकवून ठेवावे, याचे प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण देण्यात आले.

मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा उपआयुक्त, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, हिंगोली यांच्या सूचनेनुसार तालुक्यातील प्रत्येक गावात हे अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमामुळे पशुपालकांना उपलब्ध निकृष्ट चाऱ्यावर प्रक्रिया करून त्याचा जनावरांच्या आहारासाठी अधिक प्रभावी वापर करण्यास मदत होणार आहे.

वाचन संस्कृती घराघरांत पोहोचविणे काळाची गरज उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाणे; समूह वाचन व ग्रंथ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

 वाचन संस्कृती घराघरांत पोहोचविणे काळाची गरज

उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाणे; समूह वाचन व ग्रंथ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद



हिंगोली, (जिमाका) ९ ऑक्टोबर : पुस्तके माणसाच्या विचारांना प्रगल्भ करतात. डिजिटल युगात भावी पिढीच्या बौद्धिक विकासासाठी वाचन संस्कृती चळवळीच्या स्वरूपात घराघरांत पोहोचविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाणे यांनी केले.

अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, हिंगोली आणि स्थानिक वाचन कट्टा समूह यांच्या संयुक्त विद्यमाने महसूल कॉलनी येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात समूह वाचन व ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

वैविध्यपूर्ण ग्रंथांचे प्रदर्शन

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाणे यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनात अभिजात मराठी भाषेचा गौरव अधोरेखित करणारे दर्जेदार साहित्य, मराठी विश्वकोश, मराठी ग्रंथसूची तसेच विविध संदर्भग्रंथ मांडण्यात आले होते. यानंतर उपस्थित मान्यवर, अधिकारी, शिक्षक आणि वाचनप्रेमींनी सलग अर्धा तास एकाग्रतेने शांततापूर्ण समूह वाचन केले.

या उपक्रमातून वाचनाची आवड जोपासण्यासह सामूहिक वाचनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. उपस्थितांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

शाळांमध्ये ‘बाल वाचन कट्टा’ सुरू करण्यावर भर

कार्यक्रमाला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य बी. बी. पुटवाड, शिक्षणाधिकारी (योजना) संदीपकुमार सोनटक्के, महाराष्ट्र साहित्य परिषद, हिंगोली शाखेचे अध्यक्ष अशोक अर्धापूरकर, मराठवाडा विभाग ग्रंथालय संघ व जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक, ज्येष्ठ अधिव्याख्याते डॉ. उज्ज्वल करवंदे आणि डॉ. तुकाराम राजे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मान्यवरांनी अभिजात मराठी भाषेचा समृद्ध वारसा, ग्रंथालय चळवळीचे योगदान आणि समाजात वाचन संस्कृती रुजविण्याचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच अवांतर वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी शाळांमध्ये ‘बाल वाचन कट्टा’ सुरू करणे, स्थानिक साहित्यिक आणि ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्त्यांना एकत्र आणणे, तसेच नूतन ग्रंथालय अधिकारी कार्यालयाला विचारविनिमयाचे केंद्र बनविणे आवश्यक असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

या वेळी वाचन कट्टा समूहातील शिक्षक, साहित्यिक, व्यावसायिक आणि नागरिकांनीही वाचन चळवळ अधिक प्रभावी करण्यासाठी विविध संकल्पना व सूचना मांडल्या.

ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले. महसूल कॉलनी येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात आयोजित ग्रंथ प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून, हिंगोलीतील वाचनप्रेमी, नागरिक आणि विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा. तसेच शासकीय ग्रंथालयाचे सभासद व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक शिक्षक दीपक कोकरे यांनी केले, तर केंद्रप्रमुख विजय बांगर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. या उपक्रमाला शहरातील विविध क्षेत्रांतील वाचनप्रेमी नागरिक, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, व्यावसायिक आणि वाचन कट्टा समूहाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशा प्रकारचे वाचन कट्टा उपक्रम नियमितपणे राबविण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.