09 May, 2025
इयत्ता 11 वीची प्रवेश प्रक्रिया यावर्षी केंद्रीय ऑनलाईन पध्दतीने होणार
हिंगोली (जिमाका), दि. 09 : मागील काही वर्षापासून राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर व अमरावती या महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता 11 वीचे प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन पध्दतीने चालू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने दिनांक 25 फेब्रुवारी व दि. 6 मे, 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांतील शहरी व ग्रामीण भागातील सर्व उच्च माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता 11 वीचे प्रवेश शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून केंद्रीय ऑनलाईन पध्दतीने चालू करण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार राज्यस्तरावरून ते जिल्हास्तरापर्यंत याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील उच्च माध्यमिक शाळांकडून विहित नमुन्यात माहिती घेण्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. त्यासाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत पालक, विद्यार्थी व शाळांना माहिती होणे गरजेचे आहे.
उच्च माध्यमिक विद्यालयांनी करावयाची कार्यवाही : केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पध्दतीनुसार सर्वप्रथम सर्व उच्च माध्यमिक विद्यालयांना त्यांच्या संस्थेची ऑनलाईन नोंदणी शासनाने दिलेल्या वेळापत्रकानुसार संकेतस्थळावर करावे लागणार आहे. त्यानंतरच त्यांचे उच्च माध्यमिक विद्यालयासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. नोंदणी करण्यापूर्वी सर्व उच्च माध्यमिक विद्यालयांनी काही अभिलेख्यांची पूर्वतयारी शाळास्तरावर करुन ठेवणे गरजेचे आहे.
यासाठी आपल्या महाविद्यालयात इंटरनेटची सुविधा असणे अत्यंत गरजेचे आहे. विद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांना सुलभतेने प्रवेश घेता यावेत तसेच विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान करण्यासाठी पूर्णवेळ यंत्रणा कार्यान्वित करावी. माहिती पुस्तिका प्रत्येक विद्यार्थ्यांना पाहता येईल यासाठी शाळास्तरावरच नियोजन करावे. यामध्ये माध्यमिक शाळांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. शक्यतोवर माध्यमिक शाळांमधूनच विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश भरण्यासाठी सोय उपलब्ध करुन देण्यात यावी. उच्च माध्यमिक विद्यालयांनी शासन मान्यता आदेश, मान्यता प्राप्त विषयांचे मंडळ मान्यता आदेश, शाखा अतिरिक्त तुकडी आदेश, अल्पसंख्यांक प्रमाणपत्र, बँक डिटेल्स इत्यादी बाबींची पूर्वीच तयारी करुन ठेवावी. शैक्षणिक शुल्काबाबतची आवश्यक कागदपत्रे मान्य असणे आवश्यक आहे. प्राचार्यांनी त्यांच्या कॉलेजची माहिती वेबपोर्टलवर भरताना योग्य ती दक्षता घ्यावी. कोणतीही माहिती अंदाजित अथवा चूकीची भरू नये. यामुळे भविष्यात उदभवणाऱ्या परिणामास संबंधित प्राचार्य, व्यवस्थापन जबाबदार राहील.
यावर्षी इयत्ता 11 वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पध्दतीनेच होणार आहेत. त्यामुळे यावर्षी ऑनलाईन प्रक्रियेशिवाय इतर कोणत्याही मार्गाने दिलेले प्रवेश हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. तसेच ऑफलाईन झालेले प्रवेश हे इयत्ता 12 वी परीक्षेसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत, असे शिक्षणाधिकारी (मा.), जिल्हा परिषद, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
******
राष्ट्रीय लोकअदालतीचे आज आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. 09 : येथील जिल्हा न्यायालयात व त्या अंतर्गत येणाऱ्या विविध न्यायालयात तालुका विधी सेवा समिती व वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने उद्या शनिवार, दिनांक 10 मे, 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हा न्यायालय परिसरात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या लोकअदालतीमध्ये भूसंपादन व मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, तडजोड युक्त फौजदारी प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, वैवाहिक/ कौटुंबिक वाद प्रकरणे, पराक्रम्य अभिलेख अधिनियमचे कलम 138 खालील प्रकरणे, नगर परिषद, विद्युत महावितरण कंपनी, बँक व पतसंस्थांचे वाद दाखल पूर्व प्रकरणे इत्यादी खटले तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत. ही सर्व प्रकरणे आपआपसातील तडजोडीद्वारे निकाली काढता यावीत. यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीचा जास्तीत जास्त पक्षकार मंडळींनी उपस्थित राहून फायदा घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश टी. एस. अकाली, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. एस. आर. भुक्तर यांनी केले आहे.
******
शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्या - खासदार नागेश पाटील आष्टीकर
• दिशा समितीच्या बैठकीत केंद्र शासनाच्या विविध योजनांचा घेतला आढावा
हिंगोली (जिमाका), दि. 09: केंद्र शासनाच्या निधीतून जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार आरोग्य, शैक्षणिक, वीज, पाणीपुरवठा, कृषी विषयक व दळणवळण यासह पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आज येथे दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात झालेल्या जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची (दिशा) आढावा बैठक खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, अपर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, समितीचे अशासकीय सदस्य सर्वश्री. संदीप ससे, दयानंद पतंगे, अविनाश मुळे, सुंदरराव पाटील, भास्कर खोडके, सतीश पाचपुते, गोपू पाटील, श्रीमती शशिकला भंवर, शारदा पोपळघट, आश्विनी इंगोले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
ग्रामीण भागामध्ये चांगल्या आरोग्य सुविधा, शैक्षणिक सुविधा मिळण्यासाठी संबंधित विभागांनी प्रयत्न करावेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये चांगल्या दर्जाचे शिक्षण, मध्यान्ह भोजन उपलब्ध होण्यासाठी वेळोवेळी आढावा घेण्यात यावा, असे खासदार नागेश पाटील आष्टीकर म्हणाले. तसेच जिल्ह्यात केंद्रीय निधीतून सुरु असलेल्या सर्व रस्त्यांची कामे दर्जेदार होतील, याची खबरदारी घ्यावी. सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना द्यावा, सिंचन सुविधांचे बळकटीकरण करावे. माळसेलू व चोंडी रेल्वे स्टेशनची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, असे त्यांनी सांगितले.
आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते उपलब्ध होतील, यासाठी कृषी विभागाने दक्ष राहावे. तसेच बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. फळबाग लागवड हा शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न देणारा पर्याय आहे. त्यामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात जास्तीत जास्त क्षेत्रावर फळबाग लागवडीसाठी प्रयत्न करावेत. गावोगावी होणाऱ्या शेती शाळांमध्ये याबाबत माहिती देऊन नागरिकांमध्ये जनजागृती करावी, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सर्व गरीब गरजवंत व सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाचा लाभ मिळवून द्यावा. यामध्ये कुठलाही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी. घरकुलाचे काम प्राधान्याने पूर्ण करुन गरजवंताना लाभ मिळवून द्यावा. घरकुलासाठी तलाठ्यामार्फत अर्ज घेऊन लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करुन द्यावी. सर्व निराधार योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम यासह विविध योजनांचे लाभ गावात शिबीरे घेऊन लाभार्थ्यांना वेळेत मिळवून द्यावेत. जिल्ह्यात सतत वीज खंडित होणे, वीज जोडणी, ट्रान्सफर, वीज उपकेंद्र निर्मिती ही सर्व कामे वेळेत झाली पाहिजेत. पाणंद रस्त्याच्या कामाच्या तक्रारी आहेत. चालू असलेले व पूर्ण झालेल्या कामाची चौकशी करावी. राष्ट्रीय महामार्गावरील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावेत. जलजीवन मिशनचे काम तातडीने पूर्ण करुन जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये पाणी पुरवठा सुरु करावा. सर्व अभियंत्याची बैठक घेऊन प्रत्येक गावात आहे त्या परिस्थितीत पाणी पुरवठा सुरु करण्याबाबत कार्यवाही करावी. ज्या गावात जलजीवन मिशनच्या कामाची तक्रारी आहेत. तसेच पूर्ण झालेल्या गावातील कामाची चौकशी करावी. जल जीवन मिशनच्या कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कार्यवाही करून ही कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. शासनाच्या निधीचा योग्य वापर होण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी नियोजनबद्ध काम करावे, असे त्यांनी सांगितले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी यंत्रसामुग्रीसाठी लागणारा निधी जिल्हा वार्षिक योजनेतून द्यावा. तसेच जिल्ह्यात कर्करोगावरील उपचारासाठी आवश्यक सुविधा निर्माण करावी. यासाठी लागणारे मनुष्यबळ व आवश्यक साधनसामुग्रीसाठी प्रस्ताव द्यावा. त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
खासदार पाटील यांनी यावेळी प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, पंडीत दीनदयाल उपाध्याय वीज सवलत योजना, राष्ट्रीय कृषि विकास योजना, फळबाग लागवड योजना, कांदा चाळ योजना, मृद व स्वास्थ्य कार्ड योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, ई-नाम योजना, जलजीवन मिशन, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, स्वच्छ भारत मिशन, समग्र शिक्षा अभियान यासह विविध योजनांचा आढावा घेतला.
यावेळी समिती सदस्यांनी जिल्ह्यातील विविध प्रश्न व अडचणी मांडल्या. यावर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्न, अडचणी, तक्रारी व कामाचे तातडीने निराकरण करुन तात्काळ मार्गी लावावेत, अशा सूचना सर्व यंत्रणेला दिल्या.
जिल्ह्यातील महिलांचे कर्करोगाची लक्षणे जाणून घेण्यासाठी जिल्ह्यात संजीवनी अभियान राबविण्यात आले आहे. या अभियानात संशयित आढळून आले आहेत. यावर त्यांच्यावर पुढील तपासणी व उपचाराची कार्यवाही सुरु आहे. जल जीवन मिशनच्या कामांचा आढावा घेऊन त्यांना कामे लवकर पूर्ण करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत. जिल्ह्यातील वीज, पाणी, आरोग्य यासह विविध यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता म्हणाले.
प्रारंभी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांनी सादरीकरणाद्वारे केंद्र शासनाच्या विविध योजनेच्या सद्यस्थितीची माहिती दिली. तसेच त्यांनी शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
******
08 May, 2025
जिल्ह्यात कृषी निविष्ठा विक्रेत्यांची खरीप हंगामपूर्व कार्यशाळा संपन्न
हिंगोली(जिमाका),दि.०८ : खरीप हंगामाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कार्यशाळेत कृषी आयुक्तालयाचे प्रतिनिधी शेषराव डोळे, कृषी विकास अधिकारी अतुल वायसे, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक नितीन घुगे, जिल्हा कृषी अधिकारी संग्राम जाधव, तालुका कृषी (सेनगाव) अधिकारी संदीप वळकुंडे, गोविंद काळे (औंढा नागनाथ), शिवसंदीप रणखांब (हिंगोली) यांच्यासह जिल्ह्यातील कृषी अधिकारी, पंचायत समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शेषराव डोळे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर कृषी विकास अधिकारी अतुल वायसे यांनी विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर सादरीकरण केले. यामध्ये साथी पोर्टलचा वापर, बीज प्रक्रिया, बियाणे उगवण क्षमता तपासणीचे महत्त्व, कीटकनाशके फवारणी करताना घ्यावयाची आवश्यक काळजी आणि कापूस तसेच इतर पिकांच्या तक्रारींसाठी असलेल्या तक्रार निवारण समितीच्या कार्याची माहिती देण्यात आली.
यावेळी विक्रेते असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष आनंद निलावार यांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यशाळेत जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी सक्रीय सहभाग घेतला आणि उपयुक्त माहिती जाणून घेतली.
जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या या कार्यशाळेमुळे खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला अधिक बळ मिळणार असून, शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठा वेळेवर उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
********
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केली मृद व जलसंधारण कामांची पाहणी
हिंगोली (जिमाका), दि. 08 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी कळमुनरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे कृषी विभागामार्फत चालू असलेल्या विविध मृद व जलसंधारण कामांची पाहणी केली.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी कंपोझिट गॅबियन स्ट्रक्चर या कामासंदर्भात काम करणारे कॉन्ट्रॅक्टर व कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कामांची गुणवत्ता राखण्याच्या सूचना केल्या. तसेच जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी इसापूर बंधाऱ्याला भेट देऊन पाहणी केली.
यावेळी उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते, तहसीलदार जिवककुमार कांबळे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, तालुका कृषी अधिकारी नितीन घुगे, मंडळ कृषी अधिकारी व कृषी सहायक उपस्थित होते.
******
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले ॲग्रीस्टॅकबाबत मार्गदर्शन
हिंगोली (जिमाका), दि. 08 : कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येडोबा येथे आयोजित ॲग्रीस्टॅक शिबिराला जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी गावातील नागरिकासोबत ग्रामस्तरावरच्या विविध योजनाबद्दल मार्गदर्शन केले व गावकऱ्यांकडून गावामध्ये असलेल्या समस्या जाणून घेतल्या. तसेच संबंधित विभागाला नागरिकांच्या समस्या सोडविण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी गावात बँक नसल्यामुळे शेतकऱ्यांना सात किलोमीटर लांब बँकेत जावे लागते. यासाठी गावच्या लोकसंख्यानुसार बँक द्यावी, अशी मागणी केली. यावर जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी बँक शाखा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन त्यांना दिले.
यावेळी उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते, तहसीलदार जीवक कांबळे यांच्यासह मंडळ अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, उपसरपंच, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****
जिल्हा वार्षिक योजनेची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावीत - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
हिंगोली (जिमाका), दि. 08 : जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांनी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गतची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा नियोजन अधिकारी ग. गो. चितळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, केशव गड्डापोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सन 2023-24 मधील दायित्वाची कामे वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. दायित्वाची रक्कम खर्च केलेल्या कामाची माहिती सर्व विभागांनी सोमवारपर्यंत सादर करावी. वेळेत काम पूर्ण न करणा-या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे. दायित्वाची रक्कम खर्च न केलेल्या विभाग प्रमुखावर शिस्तभंगाची कार्यवाही करावी. तसेच सन 2025-26 पर्यंत संपणाऱ्या कामाची सद्यस्थितीची माहिती देऊनच निधीची मागणी करावी. जिल्ह्यातील सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासाठी कोल्हापुरी पध्दतीचे बंधारे (केटीवेअर) ची कामे घ्यावीत. पटसंख्या जास्त व मोठे मैदान उपलब्ध असलेल्या जिल्हा परिषद शाळेसाठी क्रीडा साहित्य उपलब्ध करुन देण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
तसेच सर्व कार्यालय प्रमुखांनी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन 2024-2025 साठी वितरीत केलेल्या निधीतील प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करोवत. तसेच केलेल्या कामाचा ताळमेळ तात्काळ पूर्ण करुन उपयोगिता प्रमाणपत्रासह अहवाल सादर करावा. एकमेकांशी समन्वय ठेवून निधी खर्च करण्याबाबत कार्यवाही करावी व त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. तसेच सन 2025-26 या वर्षात जिल्हा विकास आराखड्यावर जिल्हा वार्षिक योजनेचा 25 टक्के निधी खर्च करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार सर्व यंत्रणांनी जिल्हा विकास आराखड्यातील कामाचे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करावेत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी दिल्या.
या बैठकीस आरोग्य विभाग, महावितरण विभाग, शालेय शिक्षण विभाग, जलसंधारण, पाणीपुरवठा, कृषी, बांधकाम, पशुसवंर्धन, महिला व बालविकास यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
*****
Subscribe to:
Posts (Atom)





