13 October, 2026

कोठारी येथे चारा साक्षरता अभियान सोयाबीनच्या कुटारावर युरिया प्रक्रिया करून सकस चारा तयार करण्याचे प्रात्यक्षिक


        हिंगोली, दि. १३ (जिमाका) : दुष्काळी परिस्थितीत जनावरांसाठी चाऱ्याचे योग्य नियोजन करण्यासह निकृष्ट चारा सकस करून जनावरांना खाऊ घालण्याबाबत पशुपालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी वसमत तालुक्यातील मौजे कोठारी येथे चारा साक्षरता अभियानांतर्गत मार्गदर्शन व प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. या उपक्रमात गावातील ४५ पशुपालकांनी सहभाग घेतला.

        या वेळी सोयाबीनच्या कुटारावर युरिया प्रक्रिया करून तो अधिक पौष्टिक व सकस बनविण्याची पद्धत प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगण्यात आली. दुष्काळी परिस्थितीत उपलब्ध चाऱ्याचा योग्य वापर करून जनावरांना पोषक आहार उपलब्ध करून देण्याबाबत पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात आले.

        मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, हिंगोली तसेच तालुका पशुसंवर्धन अधिकारी, वसमत यांच्या सूचनेनुसार तालुक्यातील प्रत्येक गावात चारा साक्षरता अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पशुपालकांना चारा व्यवस्थापन, निकृष्ट चाऱ्याचे सकस चाऱ्यात रूपांतर आणि दुष्काळी परिस्थितीत जनावरांची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.

        या वेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सिद्धार्थ इंगोले यांनी पशुपालकांना मार्गदर्शन केले.

सर्व शासकीय सेवा 100 टक्के ऑनलाइन करण्यावर भर द्या - राज्य सेवा हक्क आयुक्त डॉ. किरण जाधव लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करून विहित कालावधीत सेवा देण्याचे आवाहन

 

        हिंगोली, दि. १३ (जिमाका) : नागरिकांना दर्जेदार, पारदर्शक आणि गतिमान प्रशासनाचा अनुभव देण्यासाठी सर्व शासकीय कार्यालयांनी १०० टक्के शासकीय सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करून नागरिकांना विहित कालावधीत सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश राज्य सेवा हक्क आयुक्त डॉ. किरण जाधव यांनी दिले.

        महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित सेवांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी डॉ. किरण जाधव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अपर जिल्हाधिकारी महेंद्र कांबळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

        जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या पुढाकाराने विकसित करण्यात आलेल्या सेवादूत आणि तक्रार निरीक्षण प्रणालीअंतर्गत स्मार्ट हिंगोली चॅटबॉट, सेवादूत हिंगोली आणि हिंगोली कलेक्टर या डिजिटल सुविधांची माहिती यावेळी सादरीकरणाद्वारे देण्यात आली. नागरिक या सुविधांचा वापर करून विविध शासकीय सेवांचा लाभ कसा घेऊ शकतात, याची माहितीही देण्यात आली. तसेच महसूल विभागासह विविध विभागांच्या लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत कामकाजाचा आणि विभागनिहाय आरटीएस डॅशबोर्ड अहवालाचा आढावा घेण्यात आला. ग्रामपंचायत स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्रांमधून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सेवांची सद्यस्थिती, केंद्रांचे एकसमान नामफलक व पायाभूत सुविधांबाबतचे मानके आणि केंद्रांच्या तपासणी प्रक्रियेची माहिती सादर करण्यात आली. शून्य व्यवहार असलेल्या केंद्रचालकांना केंद्रे कार्यान्वित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

        माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व इतर आवश्यक प्रमाणपत्रे शाळास्तरावरच उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने प्रयत्न करावेत. कृषी विभागाच्या योजनांचाही सेवादूत प्रणालीच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्यावर भर द्यावा, जेणेकरून शेतकऱ्यांना घरबसल्या शासकीय सेवांचा लाभ घेता येईल. शासकीय कामानिमित्त कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना सन्मानपूर्वक वागणूक द्यावी आणि त्यांच्या बसण्याची योग्य व्यवस्था करावी. तसेच सर्व कार्यालयप्रमुखांनी आरटीएस डॅशबोर्ड नियमितपणे अद्ययावत ठेवून त्याचा प्रभावी वापर करावा, अशा सूचना आयुक्त डॉ. किरण जाधव यांनी दिल्या.

        यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे लवकरच आदर्श आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली. या केंद्रामुळे नागरिकांना विविध शासकीय सेवांसाठी तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता भासणार नाही. सर्व तालुक्यांमध्ये उपलब्ध असलेल्या सेवा एकाच ठिकाणी मिळण्याची सुविधा या केंद्रामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच आरटीएस डॅशबोर्डचा अधिकाधिक वापर करून प्रशासकीय कामकाजात गतिमानता व पारदर्शकता आणण्यावर भर देण्यात येईल.  तसेच यासंदर्भात नियमित आढावा घेण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी गुप्ता यांनी सांगितले.

        सदरील बैठकीचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नायब तहसीलदार अश्विन माने यांनी तर बैठकीचे सादरीकरण गंगाधर लोंढे, उमाकांत मोकरे व शेख मुदसर यांनी केले.

                                                                          ***    

12 October, 2026

पाणीटंचाईचे आराखडे १५ ऑक्टोबरपूर्वी सादर करा - मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड

▶️ चारा टंचाई टाळण्यासाठी आतापासूनच उपाययोजनांचे नियोजन करण्याच्या सूचना 
हिंगोली, दि. १२ (जिमाका) : जिल्ह्यातील पाचही तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई निवारणाचे आराखडे १५ ऑक्टोबरपूर्वी सादर करावेत. तसेच, आगामी काळात पशुधनासाठी चाऱ्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी आतापासूनच नियोजन करून उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिले.

जिल्हा परिषदेच्या सभागृहात श्री. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक झाली. या बैठकीत पाणीटंचाई, दुष्काळी परिस्थिती, चारा व्यवस्थापन आणि प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेण्यात आला.

 *पाणीटंचाई निवारणासाठी नियोजन करा* 

जिल्ह्यातील कोल्हापुरी बंधारे, पाझर तलाव आणि गाव तलावांमधील पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात आला. पाझर तलावांमधून पाण्याचा उपसा होत असल्यास तो तातडीने बंद करावा. जिल्हाधिकाऱ्यांनी पाणी उपशाबाबत दिलेल्या आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या.

गावातील प्रत्येक पाणीस्रोताची नोंद घेऊन त्याची माहिती सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजनांचे आराखडे तयार करावेत आणि ते १५ ऑक्टोबरपूर्वी सादर करावेत, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.

 *चारा टंचाई टाळण्यासाठी आतापासूनच उपाययोजना* 

दुष्काळाच्या परिस्थितीत पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध राहावा, यासाठी पशुसंवर्धन विभागाने आतापासूनच नियोजन करावे. चारा टंचाई निर्माण होण्यापूर्वी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश गायकवाड यांनी दिले.

सध्या हार्वेस्टरच्या साहाय्याने ऊसतोडणी होत असल्याने ऊसाचे वाढे शेतातच राहतात. त्यांचा जनावरांसाठी चारा म्हणून उपयोग व्हावा, यासाठी जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांना ऊसतोडणीच्या पद्धतीत आवश्यक बदल करण्याबाबत कळवावे, अशा सूचना देण्यात आल्या.

तसेच, शेतकऱ्यांशी समन्वय साधून ज्वारी, मका आणि बाजरी यांसारख्या वैरण पिकांची लागवड करण्यास प्रोत्साहन द्यावे. उपलब्ध साधनसंपत्तीचा योग्य वापर करून पशुधनासाठी चाऱ्याचे नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.

 *प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढा* 

बैठकीत प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे, ई-ऑफिस, आपले सरकार पोर्टल, तारांकित व अर्धशासकीय पत्रे तसेच शासनस्तरावरील प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. प्रलंबित प्रकरणांचा निपटारा वेळेत करून प्रशासकीय कामकाजाला गती द्यावी, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिले.

बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) समृद्धी दिवाने, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) विजय बोराटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, शिक्षणाधिकारी मंजुश्री कल्लेवाड, विपुल भागवत, संदीप सोनटक्के, कृषी अधिकारी अतुल वायसे, कार्यकारी अभियंता राजू नरवाडे आणि पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी बुचाले उपस्थित होते. सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.

हिंगोलीत दिव्यांग क्रिकेट स्पर्धेचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते उद्घाटनबोधडी विद्यालयाच्या अंध क्रिकेट संघासह व्हीलचेअर क्रिकेट संघ ‘बी’चे प्रथम पारितोषिकावर नाव


हिंगोली, दि. १२ (जिमाका): सार्वजनिक दसरा महोत्सव समिती आणि पत्रकार क्रिकेट संघ, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने दसरा महोत्सवानिमित्त आयोजित दिव्यांग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते आज १२ ऑक्टोबर संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर करण्यात आले.

या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेत व्हीलचेअर क्रिकेटचा सामना हिंगोलीच्या दिव्यांग व्हीलचेअर क्रिकेट संघाच्या ‘ए’ आणि ‘बी’ या संघांमध्ये झाला. या सामन्यात ‘बी’ संघाने विजय मिळवून प्रथम पारितोषिक पटकावले. विजेत्या संघाला पाच हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

दुसऱ्या सामन्यात बोधडी येथील अंध विद्यालयाचा क्रिकेट संघ आणि लातूर येथील अंध क्रिकेट संघ यांच्यात सामना झाला. या सामन्यात बोधडी येथील अंध विद्यालयाच्या संघाने प्रथम पारितोषिक मिळविले. विजेत्या संघाला पाच हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी सुमित चौधरी, नफीज पैलवान, विलास गोरे,  रजनीश पुरोहित, अंध विद्यालयाचे मुख्याध्यापक आशिष पिंगळकर, गोपाल भोस आदी उपस्थित होते.

स्पर्धेच्या यशस्वितेसाठी पत्रकार क्रिकेट संघाचे कर्णधार विजय गुंडेकर, गजानन मगर, राकेश भट्ट, सुनील पाठक, सुधीर गोगटे, सुमित कान्हेड, दिलीप हळदे, संतोष आठवले, सुनील नागरे, बाबा ढोकणे, गणेश घ्यार, बाळू जाधव, विकास जाधव, सचिन कावडे, सुधाकर वाढवे, राजेंद्र हलवाई, प्रशांत गुप्ता, गोपाल सरनायक, श्याम सोळंके, नामदेव कापसे, कपिल सावळे, निलेश गरवारे, अनिस अहमद, अरुण दिपके, शेख मजर, मदन शेळके आदींनी परिश्रम घेतले.

चारा टंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाययोजनाऊसाचे वाढे, गाळपेरा जमिनीवरील वैरण आणि मुरघास निर्मितीवर भर

हिंगोली, दि. १२ (जिमाका) : जिल्ह्यातील पाचही तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्याने पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पशुसंवर्धन विभागाने विविध उपाययोजना सुचविल्या आहेत. ऊसाचे वाढे, पाटबंधारे प्रकल्पांच्या गाळपेरा जमिनीवरील वैरण, वनक्षेत्रातील गवत आणि मुरघासाचा वापर करून चारा टंचाईवर मात करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. एस. टी. बुचाले यांनी दिली.

सध्या हार्वेस्टरद्वारे ऊसतोडणी होत असल्याने ऊसाचे वाढे शेतातच पडून राहतात. त्यांचा जनावरांसाठी चारा म्हणून वापर व्हावा, यासाठी जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांना ऊसतोडणीच्या पद्धतीत आवश्यक बदल करण्याबाबत कळविण्यात आले आहे. ऊसतोडणी मजुरांमार्फत केल्यास हे वाढे पशुधनासाठी उपलब्ध होऊ शकतात. पूरक खाद्यासोबत त्यांचा वापर केल्यास दुष्काळात चारा उपलब्धतेस मदत होईल.

जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील मोठ्या, मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयांतील पाणी कमी झाल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या गाळपेरा जमिनीवर ज्वारी, मका आणि बाजरी यांसारख्या वैरण पिकांची लागवड करण्याचे नियोजन आहे. शासनाच्या नियमानुसार या जमिनी शेतकरी, पशुपालक आणि स्वयंसेवी संस्थांना उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित विभागांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. तसेच वनक्षेत्रातील उपलब्ध गवताचा नियमानुसार पशुधनासाठी वापर करण्याच्या दृष्टीने वन विभागालाही उपाययोजना करण्यास सांगण्यात आले आहे.

हिरव्या चाऱ्याची साठवणूक करून तो टंचाईच्या काळात वापरता यावा, यासाठी मुरघास निर्मितीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. चारा उत्पादक शेतकरी उत्पादक संघ आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना हिरवा चारा उपलब्ध करून देण्यासाठी तालुकास्तरावर तातडीने लिलाव प्रक्रिया राबविण्याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना निर्देश देण्याची विनंती करण्यात आली आहे. या उपाययोजनांमुळे उपलब्ध चाऱ्याचे योग्य व्यवस्थापन होऊन दुष्काळाच्या काळात पशुधनासाठी सकस चारा उपलब्ध ठेवण्यास मदत होईल, असे डॉ. बुचाले यांनी सांगितले.

माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करावा


शासकीय, निमशासकीय कार्यालयांसह विविध संस्थांना उपक्रम राबविण्याचे निर्देश

हिंगोली, दि. १२ (जिमाका) : माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन १५ ऑक्टोबर हा दिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शासकीय संस्था, मंडळे तसेच सार्वजनिक उपक्रमांच्या कार्यालयांनी विविध उपक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शासनाच्या ८ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या परिपत्रकानुसार, वाचन प्रेरणा दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
त्यानुसार, शासन परिपत्रकातील सूचनांनुसार १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन साजरा करून वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणारे विविध उपक्रम राबवावेत, असे परिपत्रक उपजिल्हाधिकारी (महसूल), हिंगोली यांनी निर्गमित केले आहे.

10 October, 2026

जिल्हा रुग्णालय, हिंगोली येथे जागतिक हॉस्पिस व पॅलिएटिव्ह केअर दिन साजरा


हिंगोली, दि.१० ऑक्टो (जिमाका): शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आज  जिल्हा रुग्णालय हिंगोली येथे जागतिक हॉस्पिस व पॅलिएटिव्ह केअर दिन जिल्हा रुग्णालय, हिंगोली येथे साजरा करण्यात आला.
“वेदना व्यवस्थापन “वेदना कमी करूया, जिवनमान सुधारूया, रुग्णांना सन्मानाने जगण्याचा आधार देऊया. ही या वर्षीची थीम आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अति. जिल्हा शल्यचिकित्स्क डॉ. दिपक मोरे, डॉ. उद्धव पोघे ( मानसोपचार तज्ञ) बाळासाहेब चिंचकर उपस्थित होते.
 कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करून करण्यात आली डॉ. दिपक मोरे यांच्या हस्ते करण्यात आली. पॅलिएटिव्ह केअर कार्यक्रमची माहिती, जनजागृती व समुपदेशन याविषयी माहिती डॉ.उद्धव पोघे यांनी दिली. तसेच या दिनाचे औचित्य साधून रुग्णांची शुगर, बी. पी. तपासणी करण्यात आली व पॅलिएटिव्ह केअर रुग्णांची कशी काळजी घ्यावी या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. 
प्रस्तावना  केशव होळंबे यांनी केली व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दिलीप गडदे यांनी केले. या कार्यक्रमास शासकीय नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी आदींची उपस्थिती होती.