26 May, 2022

 

आझादी का अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 मे रोजी साधणार लाभधारकांशी संवाद

संवाद कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी तयारी करावी

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर




हिंगोली (जिमाका), दि. 26 : विविध विकास योजनांच्या माध्यमातून शासनाने सर्वसामान्यांच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या आहेत. या योजनेत प्रामुख्याने प्रधानमंत्री आवास योजना, किसान सन्मान निधी, उज्जवला योजना, पोषण अभियान, मातृ वंदना योजना, स्वच्छ भारत मिशन, जलजीवन मिशन आणि अमृत, स्वनिधी योजना, वन नेशन वन रेशन कार्ड, गरीब कल्याण अन्न योजना, जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत, मुद्रा योजनांचा समावेश आहे. या योजनांचा लाभ दुर्गम भागातील लाभार्थ्यांपासून शहरातील लाभार्थ्यांपर्यंत देण्यात आला आहे. आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने या योजनांच्या लाभार्थ्यांशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 31 मे रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहेत. हा संवाद कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी तयारी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आढावा बैठकीत दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण धरमकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, अनंत कुंभार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी बारी सिद्दीकी यासह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हाती घेतलेल्या अमृत सरोवर योजना,  येत्या 15 ऑगस्टला प्रत्येक घरावर ‘हर घर झेंडा’ मोहिमेअंतर्गत ध्वज लावणे यासह  इतर योजनांचाही आढावा घेतला. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांना विविध लोकोपयोगी व पर्यावरण संतुलनाशी निगडीत असलेल्या योजनांमध्ये लोकांचाही सहभाग घ्यावा. यानिमित्त दररोज विविध योजनेची प्रसिध्दी करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी तयारी करावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

******

No comments: