31 May, 2022

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी साधला लाभार्थ्यांशी संवाद





 

            हिंगोली (जिमाका), दि. 31 : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सिमला (हिमाचल प्रदेश) येथून गरीब कल्याण संमलेन कार्यक्रमात केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला.

जिल्ह्यातील नागरिकासाठी व योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांसाठी या संवाद कार्यक्रमाचे येथील जिल्हा परिषदेच्या डीआरडीए सभागृहातून दूरदृष्य प्रणालीद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रविणकुमार धरमकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, डॉ.विशाल राठोड, अनंत कुंभार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या संवाद कार्यक्रमानिमित्त जिल्ह्यातील विविध विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनाची माहिती नागरिकांना व लाभार्थ्यांना देण्यात आली. यामध्ये जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे यांनी प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेची, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रविणकुमार धरमकर यांनी वन नेशन व रेशन कार्ड, पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना, उज्वला योजनेची माहिती दिली. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर यांनी प्रधान मंत्री मातृ वंदना योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी केंद्राची माहिती दिली. प्रधान मंत्री आवास योजना शहरी व ग्रामीण योजनेची माहिती अभियान व्यवस्थाप जयराम मोडके यांनी दिली.  पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गौरव चक्के यांनी जलजीवन मिशन योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्वच 663 गावांमध्ये हर घर जल से नल उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती दिली. जिल्हा ॲग्रणी बँकेचे व्यवस्थापक शशीकांत सावंत यांनी प्रधानमंत्री स्वनिधी योजना व मुद्रा योजनेची माहिती दिली. अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या जननी सुरक्षा योजनेची तसेच डायल 112 ची माहिती दिली.

कार्यक्रमाच्या शेवटी  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची जिल्ह्यात चांगल्या प्रकारे अंमलबजावणी सुरु आहे. उर्वरित कामे पुढील वर्षापर्यंत पूर्ण करण्यात येतील. स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत, असे सांगून उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, नागरिक, लाभार्थी यांचे आभार मानले.

यावेळी कार्यक्रमात विविध योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात आयुष्यमान भारत योजनेच्या कार्डचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व इतर मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित स्वातंत्र्य सैनिकांचा जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

******

No comments: