10 May, 2022

 

शिकाऊ अनुज्ञप्ती काढताना गैरमार्गाचा अवलंब केल्यास

कठोर कारवाई करण्यात येईल : उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी

 

हिंगोली (जिमाका), दि. 10 :  परिवहन विभागात शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी ऑनलाईन पध्दतीने जारी करण्याबाबतची प्रणाली दि. 14 जून, 2021 पासुन सुरु करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने शासनाने सुरु केलेल्या अनुज्ञप्ती व वाहन चालक अनुज्ञप्तीच्या चाचणीकरिता तात्काळ सेवा उपलब्ध केलेल्या धोरणाचा गैरफायदा सायबर कॅफे घेत असून तशी जाहिरात प्रसिध्द करुन गैर व्यवहार सुरु असल्याचे परिवहन आयुक्तांच्या निदर्शनास आले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सर्व जनतेस यासंदर्भात माहिती होणे आवश्यक आहे. यामागचा प्रमुख उद्देश संबंधित अर्जदारास वाहतूक नियमांचे , चिन्हांचे व वाहनचालकाच्या जबाबदाऱ्यांचे महत्व व जाणीव असणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे वाहन चालकांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण होते. यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करतेवेळी पालकांनी त्यांच्या पाल्यास या परिक्षेचे महत्व पटवून देणे आवश्यक ठरते. तसेच उक्त प्रणालीचा गैरवापर होणार नाही याची जाणीव देखील करुन देणे आवश्यक आहे.

शिकाऊ अनुज्ञप्ती काढतांना गैर मार्गाचा अवलंब केल्यास संबंधितावर कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी सर्व अर्जदारांना केले आहे.

*****

No comments: