23 May, 2022

 

अमृत सरोवर निर्मितीची माहिती संबंधित विभागानी दोन दिवसात सादर करावी

- अपर जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर

 


            हिंगोली (जिमाका), दि. 23 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात किमान 75 अमृत सरोवर (नवीन तलाव) निर्मिती करावयाची आहेत. तसेच अस्तित्वात असलेल्या जलाशयांचे , तलावांचे पुनर्जीवन, तलावातील गाळ काढण्याची कामे करावयाची आहेत. याची माहिती संबंधित विभागाने दोन दिवसात सादर करावी, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर यांनी आज दिले आहेत.

            स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अपर जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रोहयो विभागाचे उपजिल्हाधिकारी कमलाकर फड, शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, सर्व तहसीलदार, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  

            यावेळी बोलताना श्री. बोरगावकर म्हणाले, स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त माननीय पंतप्रधान जिल्ह्यातील विविध योजनेच्या लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरंसद्वारे थेट संवाद साधणार आहेत. यासाठी संबंधित विभागानी लाभार्थ्यांची यादी तयार करावी व याचे योग्य नियोजन करावे. तसेच येत्या 15 ऑगस्टला प्रत्येक घरावर ‘हर घर झेंडा’ मोहिमेअंतर्गत ध्वज लावावयाचे आहेत. यासाठी जिल्ह्यातील घरांची यादी तयार करावी व झेंडे तयार करण्याचे नियोजन करावे. यासह विविध उपक्रमांचा आढावा घेऊन सूचना दिल्या.   

******

No comments: