11 May, 2022

 


संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात

दाटेगाव ग्रामपंचायतला विभागस्तरावर प्रथम तर बोल्डावाडी गावास विशेष पुरस्कार जाहीर

 

            हिंगोली (जिमाका), दि. 11 : केंद्र व राज्य शासनाच्या स्वच्छ भारत मिशन या महत्वकांक्षी प्रकल्पांतर्गत ग्रामीण भागामध्ये स्वच्छतेचा मुळ उद्देश ठेऊन तसेच स्वच्छतेच्या सवयी अंगीकारुन ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्यमान व जीवनस्तर उंचावण्यासाठी ग्रामस्थांच्या सक्रीय सातत्यपूर्ण सहभागाच्या माध्यमातून शासन दि 23 जुलै 2019 अन्वये सन 2000-2001 या वर्षापासून राज्यामध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचे दरवर्षी आयोजन करण्यात येत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या तपासणी समितीने तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय तपासणीत हिंगोली तालुक्यातील दाटेगावला प्रथम तर कळमनुरी तालुक्यातील बोल्डावाडी या गावास व्दितीय क्रमांक दिला होता.

जिल्हास्तरीय तपासणी समितीने निवड केलेल्या गांवाची विभागस्तरीय समितीने तपासणी करुन तपासणी अंती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत विभागस्तरावरील प्रथम  पुरस्कार हिंगोली तालुक्यातील दाटेगाव या गावास जाहीर झाला आहे. या गावास प्रथम क्रमांकासाठी निवड करण्यात आल्याने प्रथम पुरस्काराची एकूण रक्कम 10 लाख रुपये असून पुरस्कार, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्राप्त होणार आहे. तसेच कळमनुरी तालुक्यातील मौजे बोल्डावाडी या गावास सांडपाणी व्यवस्थापनासाठी स्व.वसंतराव नाईक या  विशेष पुरस्कारासाठी निवड केलेली आहे. त्यासाठी विभागस्तरावर 30 हजार रुपये बक्षीस रक्कम, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र मिळणार आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामस्पर्धेअंतर्गत निवडीस पात्र होण्यासाठी संपूर्ण गावात वैयक्तीक शौचालयाचा शंभर टक्के वापर, गावातील शाळा, अंगणवाडी, शासकीय कार्यालय, तसेच सर्व सार्वजनिक ठिकाण यांची स्वच्छता राखणे या निकषचा विचार केला जातो. ही सर्व कामे लोकसहभागातून केली जातात. या निकषात ही गावे पात्र झाल्याने त्यांची पुरस्कारासाठी निवड झालेली आहे.

शासनस्तरावरील संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत गावास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा पुरस्कारासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने,  अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगूलवार,  स्वच्छ भारत मिशनचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पावस्व) आत्माराम बोंद्रे,   उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) डॉ. विशाल राठोड व सर्व विभाग प्रमुख, गट विकास अधिकारी तसेच जिल्हास्तरावरील स्वच्छ भारत मिशन व जलजीवन मिशन तज्ञ  यांच्या मार्गदर्शनाखाली  मौजे दाटेगाव व मौजे बोल्डावाडी येथील सरपंच, ग्राम सेवक, ग्राम पंचायतीची कार्यकारिणी, महिला बचत गट, अंगणवाडी ताई, प्राथमिक शाळेतील शिक्षक वृंद, आशाताई, आरोग्य सेवक, पाणी पुरवठा कर्मचारी, युवक मंडळ व सर्व ग्रामस्थ यांनी स्पर्धेमध्ये हिरीरिने सहभाग नोंदवून पुरस्कार मिळण्यासाठी  विशेष प्रयत्न केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र व राज्य शासनाच्या स्वच्छ भारत मिशन या महत्वकांक्षी प्रकल्पातंर्गत संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत दाटेगाव व बोल्डावाडी या गावांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे. हे यश उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) व सर्व विभाग प्रमुख, जिल्हास्तरावरील स्वच्छ भारत मिशन व जलजीवन मिशन तज्ञ, गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी (पं) तसेच विशेष करुन सरपंच, ग्राम पंचायतीची कार्यकारणी व ग्रामस्थांच्या सहभागामुळे व त्यांच्या प्रयत्नामुळे मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे यांनी दिली आहे.

*****

No comments: