हिंगोली
पोलीस दलातर्फे राबविण्यात येणारे ‘जननी अभियान’ कौतुकास्पद
- महिला आयोगाच्या सदस्या ॲड. संगीता चव्हाण
* दक्षता समित्यावर
अनुभवी व जाणकार महिलांचीच निवड करावी
हिंगोली (जिमाका), दि. 20
: हिंगोली जिल्हा पोलीस दलातर्फे महिला सुरक्षा व
अत्याचार प्रतिबंधाच्या अनुषंगाने कायदेविषयक जनजागृतीसाठी राबविण्यात येणारे ‘जननी
अभियान’ अत्यंत कौतुकास्पद असून राज्य महिला आयोगाच्या वतीने अभिनंदन करते, असे
सांगून हे अभियान मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यासाठी महिला
आयोगाच्या वतीने प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड. संगीता
चव्हाण यांनी केले.
येथील
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पोसील विभाग, आरोग्य विभागाच्या आयोजित आढावा
बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अपर जिल्हाधिकारी पांडूरंग
बोरगावकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक
डॉ. मंगेश टेहरे, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी विठ्ठल शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी
बोलतांना ॲड. चव्हाण म्हणाल्या, जननी हे अभियान अत्यंत कौतुकास्पद असून यासाठी पोलीस
अधीक्षक राकेश कलासागर यांचे अभिनंदन केले. वंचित घटकापर्यंत न्याय देण्यासाठी हा उपक्रम
चांगला आहे. ही ओळख कायम ठेवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करावेत. आपल्या या अभियानाची
शासन दरबारी देखल घेण्यासाठी सांगण्यात येऊन याबाबत शासनाच्या वतीनेही आपले कौतुक करण्यात
येईल, असे सांगितले.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता समिती तयार करतांना
यात ज्या महिला सदस्य घेतल्या जाणार आहेत त्यांची या क्षेत्रात दिलेल्या योगदानाला,
गुणवत्तेला धरुनच जाणकार महिलांचीच निवड करावी. या समितीमध्ये नवनवीन उपक्रम राबवून
नवचैतन्य आणण्याचे काम करावे. महिलांच्या प्रश्नांला ठराविक जातीच्या, धर्माच्या, पक्षाच्या
चौकटीत मोजता येत नाही. याच्या पलीकडे जाऊन संवेदनेच्या, जाणिवेच्या माध्यमातून हे
प्रश्न जागच्याजागी हाताळले तर पिडित महिलांसाठी तो तत्पर मिळालेला न्याय ठरतो. हिंगोली
जिल्ह्यात 13 पोलीस स्टेशन असून या सर्व पोलीस स्टेशनमध्ये पिडित महिलांच्या समस्या
जाणून घेऊन त्यांना योग्य न्याय देण्याचे काम करावे. पिडित महिलेंमध्ये पोलीस बांधव
माझ्या पाठीशी आहेत अशी आपलेपणाची भावना निर्माण झाली पाहिजे. महिलांच्या संरक्षणासाठी
हेल्पलाईन नंबर 112, संबंधित तालुक्याचे संरक्षण अधिकारी, ग्रामीण भागात ग्रामपंचायत
पातळीवरील ग्रामसेवक यांचे दूरध्वनी क्रमांक महिलांना सहज उपलब्ध होतील याचे नियोजन
करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
पोलीस प्रशासन व आरोग्य विभाग यांनी योग्य समन्वय
ठेवून पिडित महिलांची वैद्यकीय तपासणी कोणासमोरही होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच
तपासणीचे वैद्यकीय प्रमाणपत्र तात्काळ उपलब्ध करुन दिल्यास त्या पिडित महिलेच्या बाबतीत
तात्काळ कार्यवाही करुन योग्य न्याय देता येईल. रुग्णालयातील प्रसूती विभागामध्ये स्वच्छता
ठेवावी. महिला गार्डची नेमणूक करावी, मुलींच्या हॉस्टेलमध्ये योग्य व्यवस्था करावी,
अशा सूचना दिल्या.
महिला पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी
समर्थपणे पेलवून महिलांवरील अत्याचाराला आळा घालण्यात यश मिळविले आहे. एका बाजुला जनतेच्या
सुरक्षिततेची जबाबदारी तर दुसऱ्या बाजुला आपले कर्तव्य बजावून संसारिक जबाबदाऱ्या समर्थपणे
पेलवून कुटूंबालाही न्याय देण्याचे काम करतात. त्यांना पोलीस प्रशासनाने सहकार्य करावे,
असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील यांनी
पोलीस प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची सविस्तरपणे माहिती
दिली. तसेच जननी अभियानात वापरण्यात येत असलेल्या व्हिडिओ क्लीपचे व माहिती पत्रकाचे
सादरीकरण करण्यात आले.
याप्रसंगी
जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, सर्व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक,
सर्व संरक्षण अधिकारी, आरोग्य परिचारिका, महिला समुपदेशक, विविध विभागाचे अधिकारी,
कर्मचारी उपस्थित होते.
********
No comments:
Post a Comment