26 May, 2022

 

महाजीविका अभियान यशस्वी करण्यासाठी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी

- मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार



 

हिंगोली (जिमाका), दि. 26 : ग्रामीण भागातील गरिबी निर्मूलन करुन महिलाच्या सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत निर्माण करण्यात आलेले स्वयंसहाय्यता समूह, ग्राम संघ, प्रभाग संघ, उत्पादक गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यामार्फत महिलांचे शाश्वत उपजिविकेचे स्त्रोत निर्माण करणे, महिलांनी तयार केलेल्या वस्तू व उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी तसेच शाश्वत समुदाय स्तरीय संस्था निर्माण करण्यासाठी राज्यात महाजीविका अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांनी बैठकीत दिले.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सन 2022-23 हे वर्ष उपजिविका वर्ष म्हणून साजरे करण्यासाठी जागतिक महिला दिनापासून ते स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट या कालावधीत महाजीविका अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा आढावा घेण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक आज प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात घेण्यात आली. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, कार्यकारी अभियंता एल. पी. तांबे, जिल्हा अभियान व्यवस्थापक जयराम मोडके, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.आर.डी. कदम, कृषि विकास अधिकारी निलेश कानवडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी आर. एच. एडके, जिल्हा जलसंधारण अधिकारी ए. टी. भंगिरे, किरण गुरमे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हिंगोली जिल्ह्यात सुरु आहे. या अभियानांतर्गत 01 एप्रिल, 2018 पासून हिंगोली इन्टेन्सिव्हमध्ये आला आहे. या अभियानांतर्गत ग्रामीण भागातील गरीब, अनुसूचित जाती, जमाती, विधवा, परितक्त्या , अपंग, अल्पसंख्यांक, शेतमजूर, भूमिहीन , जोखीम प्रवण कुटुंबासाठी कार्य केले जात आहे. या अभियानाअंतर्गत जिल्ह्यात 8 हजार 576 स्वयंसहाय्यता समूह कार्यरत असून त्यामध्ये 80 हजार 671 कुटुंब समाविष्ट आहेत.

या अभियानांतर्गत जिल्ह्यातील 5 हजार 737 बचत गटांना फिरता निधी म्हणून 858.27 लक्ष रुपयाचा निधी वितरीत केला आहे. मार्च, 2022 पर्यंत 1548 बचत गटांना बँकामार्फत 2664.26 लक्ष रुपयांचा कॅश क्रेडिट वितरीत करण्यात आलेला आहे. बचत गटांना फिरता निधीसाठी भौतिक उद्दिष्ट 2591 व आर्थिक उद्दिष्ट 388.65 लक्ष रुपये असून त्यापैकी 1054 बचत गटांना 167.94 लक्ष रुपये वाटप करण्यात आलेले आहे. उर्वरित निधी उपलब्ध नसल्यामुळे वाटप करण्यात आलेला नाही.

या अभियानामार्फत 42 हजार 420 महिलांनी उपजिविका सुरु केलेली आहे. त्याचबरोबर सन 2021-22 मध्ये 5136 परसबागा तयार करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. अभियानातील बचत गटांनी बँकांकडून कर्ज घेऊन शिवणकाम, शेळीपालन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, कापड दुकान, कटलरी, पिठाची गिरणी, किराणा दुकान इत्यादी स्वरुपाचे छोटे व्यवसाय ग्रामीण महिलांनी सुरु केलेले आहेत.

मोठे व्यवसाय सुरु करण्यासाठी बँकांकडून बचतगटांना त्यांनी तयार केलेल्या प्रकल्प अहवालाप्रमाणे 5 ते 10 लाखापर्यंत कर्ज मंजूर करण्याची गरज आहे. सन 2022-23 साठी 2300 बचत गटांना 50 कोटी रुपये बँकेकडून कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.

जिल्ह्यात स्वयंसहायता समूह-8595, ग्राम संघ-459, प्रभाग संघ-36, सीएलएफ नोंदणीकृत-14, उत्पादक गट-70 या संस्थाच्या माध्यमातून बचतगटांच्या महिलांची उपजीविका वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा अभियान व्यवस्थापक जयराम मोडके यांनी बैठकीत दिली.

******

No comments: