31 October, 2023

 

महास्वयंम वेबपोर्टलवरील नोंदणी असलेल्या आस्थापनांनी

प्रोफाईल अद्यावत करण्याचे आवाहन

 

        हिंगोली, (जिमाका) दि. 31 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत www.mahaswayam.gov.in या महास्वयंम् वेबपोर्टलवर मान्यता प्राप्त नोंदणीकृत खाजगी आस्थापनांची आयुक्तालयाच्या रोजगार पोर्टलचे एनसीएस पोर्टलशी इंटिग्रेशन करण्याची कार्यवारी सुरु आहे. उद्योजक, नियोक्ते यांचा डाटा एनसीएस पोर्टलवर पोर्ट करत असताना उद्योजक, नियोक्ते यांचा डाटा एनसीएस पोर्टलवर पोर्ट करत असतांना उद्योजक, नियोक्ते यांच्या डाटामध्ये इंडस्ट्री सेक्टर, फर्स्ट नेम, नेचर ऑफ वर्क आयडी, ऑर्ग्नायझेशन पॅन/टॅन, सीटी आयडी, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, कॉन्टॅक्ट नंबर इत्यादी माहिती उपलब्ध नसल्याबाबत तांत्रिक तंत्रज्ञ, महास्वयम वेबपोर्टल यांनी कळविले आहे. याबाबतची  बहुतांश उद्योजक, नियोक्ते यांची अपूर्ण माहिती असल्याने एनसीएस पोर्टलवर पोर्ट करत असताना अडचण येत आहे.

            आपणास कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयाने दिलेल्या युझर आयडी व पासवर्डचा वापर करुन आपल्या आस्थापनाची माहिती अद्यावत, असे आवाहन डॉ. रा. म. कोल्हे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांनी केले आहे.

            या वेबपोर्टलबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, हिंगोली यांच्या मो. क्र. 7385924589 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

*****

 

जिल्हाधिकारी कार्यालयात सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांना अभिवादन

 



        हिंगोली, (जिमाका) दि. 31 : सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि इंदिरा गांधी यांची पुण्यतिथीनिमित्त आज त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच यावेळी  राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना एकात्मतेची शपथ देण्यात आली.  

            येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित या कार्यक्रमास  जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण धरमकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संतोष राऊत, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक नागेश बोलके, नायब तहसीलदार डी. एस. जोशी यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख व कर्मचारी यांनी सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

****

28 October, 2023

 जिल्हाधिकारी कार्यालयात महर्षी वाल्मिकी यांना अभिवादन



हिंगोली (जिमाका), दि. 28 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महर्षी वाल्मिकी यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी नायब तहसिलदार डी. एस. जोशी, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक नागेश बोलके, मिलिंद वाकळे, निमजे यांच्यासह मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील कार्यालय प्रमुख व कर्मचारी यांनीही महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

*****

27 October, 2023

 

निवृत्ती/कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी

हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन

 

 

              हिंगोली (जिमाका), दि. 27 : महाराष्ट्र कोषागार नियम, 1968 च्या नियम 335 नुसार निवृत्ती/ कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना दरवर्षी दि. 1 नोव्हेंबर रोजीचा हयातीचा दाखला सादर करणे आवश्यक आहे. हा हयातीचा दाखला मुख्यत: संबंधित निवृत्ती/कुटुंब निवृत्तीवेतन धारक ज्या बँकेतून निवृत्ती वेतन घेतात, त्या बँकेमार्फत जिल्हा कोषागारात सादर केला जातो.

             निवृत्ती, कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी हयातीचा दाखला सादर करण्यासाठी संबंधितांच्या बँकेशी संपर्क करावा, असे आवाहन कोषागार अधिकारी, हिंगोली यांनी सर्व राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारकांना केले आहे.

तसेच राज्य शासनाच्या धोरनानुसार अधिकाधिक निवृत्ती वेतन / कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांनी ‘जिवणप्रमाणपत्र प्रणालीमार्फत’ डिजीटल लाईफ सर्टिफिकेट देण्यात यावे. डिजीटल लाईफ  सर्टिफिकेट देताना निवृत्ती वेतन/कुटुंब निवृत्ती धारक यांनी बँक खाते, पीपीओ क्रमांक व Sactioning Authority-State Government of Maharashtra, Disbursing Authority-Maharahstra state Tresury मध्ये हिंगोली या कोषागाराचे नाव अचूक निवडण्याचे आवाहनही प्रसिध्दीपत्रकान्वये करण्यात आले आहे.

 

*****

 हिंगोली पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या

गोळीबार सरावासाठी मौजे वगरवाडी येथील क्षेत्र उपलब्ध

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 27 : महाराष्ट्र जमीन  महसूल  अधिनियम 1966 चे कलम 22 अन्वये व मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील  कलम 33 (1) (ख) व (प)  नुसार मौजे  वगरवाडी  ता. औंढा, जि. हिंगोली  येथील फायरींग रेंज सर्वे नं. 25 व 29 या परिसरात  दि. 29 ऑक्टोबर, 2023 रोजी हिंगोली पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना एक दिवसाचा गोळीबार सराव घेण्यासाठी  परवानगी  देण्यात येत आहे.

            या कालावधीत पुढील अटीवर गोळीबार  सरावासाठी  मैदान उपलब्ध  करुन देण्यात येत आहे. हे ठिकाण  धोकादायक  क्षेत्र म्हणून  घोषित करण्यात आले आहे. परिसरात  गुरांना न सोडणे व कोणत्याही व्यक्तीने त्या क्षेत्रात प्रवेश करु नये, अशा सूचना  पोलीस अधिकारी यांनी  दवंडीद्वारे  व ध्वनीक्षेपकाद्वारे  संबंधित  गावी सर्व संबंधितांना  द्याव्यात. तसेच तहसीलदार औंढा नागनाथ व पोलीस  स्टेशन हट्टा यांनी मौ. वगरवाडी  फायरींग बट परिसरात  दवंडीद्वारे व ध्वनीक्षेपकाद्वारे  या आदेशाची  प्रसिध्दी  करावी, असे जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

****

26 October, 2023

 

जिल्हा परिषद आस्थापनेवरील गट-क संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी

1 व 2 नोव्हेंबर रोजी ऑनलाईन परीक्षा

  • सर्व संबंधित उमेदवारांनी संकेतस्थळावर जाऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेण्याचे आवाहन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 26 : येथील जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गामधील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात क्र. 01/2023, दि. 5 ऑगस्ट, 2023 अन्वये प्रसिध्द करण्यात आली होती. या जाहिरातीमध्ये दर्शविलेल्या पदाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परिक्षेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

कनिष्ठ आरेखक या पदाची ऑनलाईन परीक्षा दि. 01 नोव्हेंबर, 2023 रोजी शिफ्ट क्र. 3 मध्ये ऑयन डिजिटल झोन, आयडीझेड विष्णुपुरी, एसएसएस इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाजी, विष्णुपुरी गेट क्र. 18 व 22, नांदेड येथे होणार असून रिपोर्टींग टाईम दुपारी 3.00 वाजता आहे.

हिंगोली जिल्हा परिषदेचे पदभरती जाहिरातीमध्ये नमूद नसलेले परंतु दिनांक 01 नोव्हेंबर, 2023 व  दि. 02 नोव्हेंबर, 2023 रोजी घेण्यात येणाऱ्या परिक्षेकरिता हिंगोली परीक्षा केंद्र निवड केलेल्या उमेदवारांना इतर जिल्ह्यामध्ये परीक्षा केंद्र देण्यात आलेल्या परिक्षेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

कनिष्ठ यांत्रिकी या पदाची ऑनलाईन परीक्षा दि. 01 नोव्हेंबर, 2023 रोजी ऑयन डिजिटल झोन, आयडीझेड विष्णुपुरी, एसएसएस इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाजी, विष्णुपुरी गेट क्र. 18 व 22, नांदेड येथे शिफ्ट क्र. 1 मध्ये होणार असून रिपोर्टींग टाईम सकाळी 7.00 वाजता आहे.

विस्तार अधिकारी (शिक्षण) व प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांच्या परीक्षा दि. 2 नोव्हेंबर, 2023 रोजी गिरीराज एंटरप्रायजेस अमरावती, तिसरा मजला, बी-3 विंग, ड्रिमलँड बिझनेस पार्क, पंजाब नॅशनल बँकेच्या वर, नागपूर रोड, अमरावती या केंद्रावर होणार आहे. यामध्ये विस्तार अधिकारी (शिक्षण) या पदाची परीक्षा शिफ्ट क्र. 1 मध्ये होणार असून या परिक्षेचे रिपोर्टींग टाईम सकाळी 7.00 वाजता आहे. तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाची परीक्षा शिफ्ट क्र. 2 मध्ये होणार असून रिपोर्टींग टाईम सकाळी 11.00 वाजता आहे.

 वरील सर्व पदाच्या ऑनलाईन परीक्षेकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांना प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी ऑनलाईन लिंक जिल्हा परिषद हिंगोलीच्या www.zphingoli.in व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.hingoli.nic.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. उमेदवारांना या लिंकद्वारे प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेता येतील. तसेच उमेदवारांच्या माहितीसाठी मराठी व इंग्रजी भाषेतील माहिती पुस्तिका www.zphingoli.inwww.hingoli.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. उमेदवारांनी या संकेतस्थळावर जाऊन आपले प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घ्यावेत. तसेच ऑनलाईन परिक्षेकरिता उमेदवारांनी त्यांच्या परिक्षेच्या रिपोर्टींग वेळेच्या अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे.

उमेदवारांनी त्यांच्या प्रवेशपत्रामध्ये दिलेल्या सूचनांचे सक्त पालन करणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांनी कोणतेही इलेक्ट्रॉनिक्स अथवा डिजिटल उपकरणे सोबत आणण्यास सक्त मनाई आहे. या परिक्षेदरम्यान उमेदवारांने कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार केल्यास त्यांना त्याच क्षणी जिल्हा परिषदेच्या सर्व परीक्षांसाठी अपात्र ठरवून त्यांचे विरुध्द पोलीस गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याचे सूचित केले आहे. जाहिरातीतील नमूद केलेल्या उर्वरित इतर पदाच्या ऑनलाईन परिक्षेचे वेळापत्रक नंतर कळविण्यात येईल.

उपरोक्त सर्व नमूद बाबींची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर व जिल्हा परिषद हिंगोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

****** 

 

ग्रामीण भागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लॅपटॉप खरेदीसाठी अर्थसहाय्य

लाभार्थ्यांची अंतिम यादी हिंगोली जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिध्द

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 26 :   जिल्हा परिषद सेस योजना सन 2023-24 मधून 20 टक्के मागासवर्गीय कल्याण निधी अंतर्गत ग्रामीण भागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लॅपटॉप खरेदीसाठी अर्थसहाय्य  पुरविण्यासाठी लाभार्थ्यांची निवड करावयाची आहे. लाभार्थी निवडीसाठी पंचायत समिती स्तरावरुन लाभार्थीचे अर्ज प्राप्त झाले आहेत.

प्राप्त अर्जाची छाननी करुन पात्र-अपात्र झालेल्या अर्जाची अंतिम यादी पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयातील नोटीस बोर्डावर लावण्यात आलेली आहे. तसेच ही यादी जिल्ह्याच्या www.hingoli.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द (अपलोड) करण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्यामधून ईश्वर चिठ्ठीद्वारे लाभार्थ्यांची निवड करावयाची आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके यांनी कळविले आहे.

*****

 

'माझी माती,माझा देश' अभियानांतर्गत

हिंगोली जिल्ह्यातील अमृत कलश मुंबईकडे रवाना

 



 

हिंगोली (जिमाका), दि. 26 :   ‘मेरी माटी, मेरा देश-माझी माती, माझा देश’ अभियान अंतर्गत जिल्ह्यातून ग्रामपंचायत ते नगरपरिषद क्षेत्रातून एकत्र केलेले मातीचे अमृत कलश आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून मुंबईकडे रवाना करण्यात आले.

         यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संतोष राऊत, जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी माडे, पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी विष्णू भोजे, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत, जिल्हा समन्वयक सुनिल अंभूरे, नगर परिषदेचे उप मुख्याधिकारी उमेश हेंबाडे, 12 स्वयंसेवक व इतर मान्यवर उपस्थित होते.

            जिल्ह्यातील ग्रामीण भागातून प्रत्येक पंचायत समितीमधून एक असे 05, जिल्ह्यातील 5  नगरपालिका व नगर पंचायतकडून एक अमृत कलश असे एकूण 06 अमृत कलश घेऊन दि. 25 ऑक्टोबर, 2023 रोजी 12 स्वयंसेवक व एक जिल्हा समन्वयक अधिकारी असे 13 जण जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथून रवाना झाले आहेत. हे अमृत कलश घेऊन गेलेले स्वयंसेवक व समन्वयक दि. 27 ऑक्टोबर रोजी मुंबई येथे आयोजित राज्याच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यानंतर मुंबई येथून 27 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विशेष रेल्वेने दिल्लीकडे रवाना होतील. दिल्ली येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 31 ऑक्टोबर रोजी भव्य कार्यक्रम होणार आहे. देशभरातून दिल्ली येथे पोहचलेल्या अमृत कलशातून अमृत वाटिका तयार केली जाणार आहे.

*****

 

25 October, 2023

 

जिल्ह्यात कलम 37 (1)(3) चे आदेश लागू

 

 

                हिंगोली (जिमाका), दि. 25 :  जिल्ह्यात सार्वजनिक नवरात्र उत्सव सुरु असून दि. 28 ऑक्टोबर, 2023 रोजी कोजागिरी पोर्णिमा आहे. तसेच नवरात्र उत्सवादरम्यान हिंगोली, कळमनुरी, वसमत या ठिकाणी दसरा प्रदर्शनाचे अयोजन करण्यात आले आहे. तसेच या काळात हिंगोली जिल्ह्यात विविध धार्मिक तथा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच सध्या घडणाऱ्या राजकीय घडामोडी, नागरिकांच्या वतीने विविध संघटना, पक्ष यांच्यातर्फे हिंगोली जिल्ह्यात त्यांच्या मागणी संदर्भात मोर्चे, धरणे आंदोलने, रास्ता रोको, उपोषणे करीत असतात. अशा विविध घटनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विविध प्रश्न हाताळण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था आबाधित  राखण्यासाठी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात  दिनांक 21 ऑक्टोबर, 2023 रोजीचे 06.00 वाजल्यापासून ते दिनांक 04 नोव्हेंबर, 2023 रोजीचे 24.00 वाजेपावेतो मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) चे आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.

            त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तु जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करुन ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणुन बुजुन दुखावतील या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तीं रस्त्यावर जमण्यास  सक्त मनाई करण्यात आले आहे. हा आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी दिलीप कच्छवे  यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.     

****

 

1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित प्रारुप मतदार यादीचे

27 ऑक्टोबर रोजी विशेष ग्रामसभेत वाचन करण्याचे आवाहन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 25 :  भारत निवडणूक आयोगाने दि. 01 जानेवारी, 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्याचा विशेष संक्षिप्त  पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी, 94-हिंगोली विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रावर प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. तसेच दि. 27 ऑक्टोबर, 2023 रोजी सकाळी 8.00 वाजता जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये व विशेष ग्रामसभा आयोजित करुन दि. 01 जानेवारी, 2024 या अर्हता दिनांकावर आधारित प्रारुप मतदार यादीचे वाचन करण्यात येणार आहे.

विशेष ग्रामसभेमध्ये मतदार यादीचे वाचन करण्यात येणार आहे. तसेच सर्व नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आता वर्षभरात चार वेळा (01 जानेवारी, 01 एप्रिल, 01 जुलै, 01 ऑक्टोबर) या अर्हता दिनांकावर मतदार नोंदणी करता येणार आहे. गावातील दिव्यांग मतदारांचा शोध घेऊन मतदार यादीत फ्लॅगींग करणे, गावातील तृतीय पंथी मतदारांचा शोध घेऊन त्यांची मतदार नोंदणी करुन घेण्यात येणार आहे. नव्याने लग्न होऊन आलेल्या नव विवाहित महिलांची मतदार नोंदणीसाठी नमुना-6 चे अर्ज भरुन घेण्यात येणार आहेत. तसेच मतदार यादीमध्ये मतदारांच्या तपशीलात काही त्रुटी असल्यास त्याच ठिकाणी विहित नमुन्यातील नमुना 8 मध्ये अर्ज भरुन घेण्यात येणार आहेत. तसेच दि. 01 जानेवारी, 2024 रोजी 18 वर्ष पूर्ण झालेल्या पात्र मतदारांचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ठ करुन विहित नमुना नं.6 मध्ये अर्ज भरुन घेण्यात येणार आहेत. मतदार यादीमधील मयत मतदारांचे नमुना 7 मध्ये अर्ज भरुन संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे जमा करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

 

*******

23 October, 2023

 

इसापूर धरणातून पाणी मागणीचे अर्ज 31 ऑक्टोबर पूर्वी सादर करावेत

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 23 :  प्रतिवर्षी उर्ध्व पेनगंगा प्रकल्पावरील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये प्रकल्पावरील सिंचनासाठी पाण्याचे नियोजन करण्यात येते. यावर्षी प्रकल्पावरील कालवा सल्लागार समितीची बैठक अद्याप झाली नसल्याने आगामी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत होणाऱ्या निर्णयाच्या अधीन राहून दि. 15 ऑक्टोबर, 2023 रोजीच्या इसापूर धरणातील 809.38 दलघमी (83.85) इतक्या जिवंत पाणीसाठ्यावर आधारित उपलब्ध पाणीसाठ्यातून पिण्यासाठीचे पाणी राखीव ठेवून रब्बी हंगामात चार पाणी पाळी देण्याचे नियोजन आहे.

प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील धारकांना व इसापूर धरण जलाशय, अधिसूचित नदी-नाल्यावरील तसेच मुख्य कालव्यावरील प्रवासी व मंजूर उपसा सिंचन योजना धारकांनी रब्बी हंगामातील हंगामी, दुहंगामी तसेच दुहंगामातील इतर उभी पिके या पिकांसाठी कालव्याचे प्रवाही/कालव्यावरील उपसा, नदी नाल्यावरील मंजूर उपसा सिंचन योजनेद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यावयाचे असल्यास मागणी अर्ज नमुना नं. 7, 7 अ मध्ये भरुन दि. 31 ऑक्टोबर, 2023 पूर्वी संबंधित शाखा कार्यालयात सादर करणे बंधनकारक राहील. हंगामी व दुहंगामी पिकांसाठी स्वतंत्र अर्ज सादर करावेत.

सिंचनासाठी पाण्याची गरज तसेच विहित नमुन्यात प्राप्त मागणी अर्ज संख्या विचारात‍ घेऊनच प्रत्यक्ष सिंचनासाठी पहिली पाणी पाळी दि. 5 नोव्हेंबर, 2023 रोजी सुरु करण्याचे अपेक्षित नियोजन आहे.

उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर डावा कालवा व इसापूर उजवा कालवा व त्याअंतर्गत असलेल्या वितरण व्यवस्थेद्वारे प्रत्येक पाणी पाळीच्या कालवा संचलनाच्या प्रस्तावित कार्यक्रमानुसार प्राप्त मागणीनुसार सिंचनासाठी पाणी सोडण्यात येईल. रब्बी हंगाम सन 2023-24 मध्ये चार आवर्तनामध्ये पाणी पाळी देण्यात येणार आहे. या पाणी पाळीचा प्रस्तावित कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.

पहिल्या आवर्तनामध्ये दि. 5 नाव्हेंबर ते दि. 25 नोव्हेंबर, 2023 या 20 दिवसाच्या कालावधीसाठी पाणी पाळी देण्यात येणार आहे. दुसऱ्या आवर्तनामध्ये दि. 5 डिसेंबर ते दि. 25 डिसेंबर, 2023 या 20 दिवसाच्या कालावधीसाठी पाणी पाळी देण्यात येणार आहे. तिसऱ्या अवर्तनामध्ये दि. 5 जानेवारी ते दि. 25 जानेवारी, 2024 या 20 दिवसाच्या कालावधीसाठी पाणी पाळी देण्यात येणार आहे. चौथ्या अवर्तनामध्ये दि. 5 फेब्रुवारी ते दि. 25 फेब्रुवारी, 2024 या 20 दिवसाच्या कालावधीसाठी पाणी पाळी देण्यात येणार आहे.

पाऊस व आकस्मिक कारणामुळे पाणी पाळी संख्या, कालावधी व तारखांमध्ये बदल होऊ शकतो. प्रकल्प क्षेत्रातील सर्व जनता, लाभधारकांनी पाणी अर्ज विहित कालावधीत करुन जलसंपदा विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता, उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1, नांदेड यांनी केले आहे.

 

*******

20 October, 2023

 

हृदय शस्त्रक्रियेसाठी संदर्भीत 14 बालकांना घेऊन जाणाऱ्या बसला

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी हिरवा झेंडा दाखवून केली रवाना

 

हिंगोली (जिमाका), दि. 20 : राष्ट्रीय आरोग्य अभियांनातर्गत व केंद्र शासनाचा अतिशय महत्वपूर्ण आयुष्यमान भव कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या वैद्यकीय पथकाकडून 7 ते 18 वर्ष वयोगटातील संदर्भीत संशयित हृदय रुग्णासाठी दि. 13 ऑक्टोबर, 2023 रोजी जिल्हा रुग्णालय, हिंगोली येथे टू-डी इको तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या बालकाची तपासणी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) वर्धा येथील तज्ञ कार्डियालॉजीस्ट डॉ. शंतनु गोमासे यांच्यामार्फत करण्यात आली. या 2-डी-इको तपासणीमधून 30 बालकांना पुढील हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी संदर्भीत करण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा रुग्णालयाकडून आज दि. 20 ऑक्टोबर, 2023 रोजी हृदय शस्त्रक्रियेसाठी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावगी (मेघे) वर्धा येथे 14 बालकांना घेऊन जाणाऱ्या रुग्णालयाच्या बसला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केले आहे.

यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिपक मोरे, बालरोग तज्ञ डॉ. गोपाल कदम, बालरोग तज्ञ डॉ.स्नेहल नगरे, फिजीशियन डॉ.भालेराव, निवासी वैद्यकीय अधिकारी (बा.सं.) डॉ. किरण कुऱ्हाडे, वैद्यकीय अधिकारी  डॉ. बालाजी भाकरे, दंतरोग सर्जन डॉ. फैसल खान, ज्ञानेश्वर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक लक्ष्मण गाभणे, डॉ. शिवाजी विसलकर, डॉ. नितीन बोरकर, डॉ. शिवाजी पंतगे, डॉ. कैलास पवार, डॉ. अमोल दरगु, डॉ. कुहिरे, डॉ. पेरके, डॉ. डुकरे, डॉ हिंगोले, डॉ. टाक, डॉ. संतोष नांदूरकर (डिईआयसी मॅनेजर), ज्ञानोबा चव्हाण व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील व डिईआयसी कार्यक्रमातील वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता, ए. एन. एम. व कार्यालयीन कर्मचारी व रुग्णालयीन अधिपरिचारिका इत्यादींनी परिश्रम घेतले. या शस्त्रक्रियेसाठी संदर्भीत विद्यार्थ्यांच्या शस्त्रक्रिया या महात्मा ज्योतीबा फुले जीवनदायी जन आरोग्य योजनेंतर्गत व आरबीएसके कार्यक्रमांतर्गत करण्यात येणार आहेत.

तसेच हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांना या आरबीएसके कार्यक्रमामार्फत अहवान करण्यात येते. की दैनदिन जीवनात वावरतांना हृदयाच्या आजारासंदर्भात वेळोवेळी 2D- Echo तपासणी करावी व वेळेत आजाराचे निदान करुन घ्यावे, असे आवाहन डॉ. नितीन तडस, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, हिंगोली यांनी केले आहे.

 

******

 

 

येलकी येथील दिव्यांग प्रवर्गातील लाभार्थींच्या घरकुलाचे भूमीपूजन

 



            हिंगोली (जिमाका), दि. 20 : कळमनुरी तालुक्यातील येलकी ग्रामपंचायत येथील दिव्यांग बांधव हे दि. 05 ऑक्टोंबर 2023 रोजी आयोजित केलेल्या दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानांतर्गत दिव्यांग मेळाव्यामध्ये उपस्थित होते. यावेळी दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक ओमप्रकाश ऊर्फ बच्चु कडु यांच्याकडे त्यांनी दिव्यांगासाठी घरकुलाची मागणी केली. त्यांची नोंद घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने व प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांच्या सुचनेनुसार गट विकास अधिकारी प्रदीप बोंढारे यांनी ग्रामपंचायत येलकी ता. कळमनुरी येथे दि. 06 ऑक्टोबर, 2023 रोजी दिव्यांगाच्या घरी जावून गृहभेट घेतली व तेथेच घरकुलाचा प्रस्ताव तयार करुन सहाय्यक आयुक्त यांना सादर केला. त्यानुसार राजू ऐडके यांनी रमाई आवास योजने अंतर्गत तात्काळ मान्यता देऊन घरकुलास मंजुरी दिली.

            त्यानुसार आज दि. 20 ऑक्टोंबर 2023 रोजी प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे व सहायक आयुक्त राजू एडके यांच्या हस्ते दिव्यांगांच्या घरकुलाचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी प्रदीप बोंढारे, विस्तार अधिकारी शारदा बेलुरे, ऑपरेटर गंगाधर शेळके, ग्रामीण अभियंता मनिषा लिंगायत, सागर पवार, सरपंच पतंगे, ग्रामसेवक नंदकिशोर घळे, लाभार्थी व गावकरी नागरिक उपस्थित होते.

*****

 

कु. दुर्गा नामदेव खंडारे यांच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

 


हिंगोली (जिमाका), दि. 20 : कु. दुर्गा नामदेव खंडारे जन्म दि. 8 ऑगस्ट, 2009 वय 14 वर्षे 02 महिने असून ही रंगाने सावळी आहे. चेहरा गोलाकार असून शरीराने मध्यम आहे. तिच्या नाकाच्या खाली मस व ओठाच्या वरच्या भागात तीळ आहे. या मुलीला बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार दि. 4 डिसेंबर, 2018 रोजी बळीराम नाईक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सरस्वती मुलींचे निरीक्षण गृह/बालगृह, सावरकर नगर, हिंगोली येथे दाखल करण्यात आलेले आहे.

कु. दुर्गा नामदेव खंडारे हिच्या वरती हक्क दाखवणारे माता, पिता, पालक व इतर नातेवाईक यांनी 1) सुधाकर इंगोले, अध्यक्ष, बाल कल्याण समिती, हिंगोली (मो. 9404504594), 2) सरस्वती कोरडे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, हिंगोली (मो. 7083389899), 3) रेखा भुरके, अधीक्षक, बळीराम नाईक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सरस्वती मुलींचे निरीक्षणगृह, बालगृह, सावरकर नगर, हिंगोली (मो. 8421036985) या संपर्क क्रमांकावर बातमी प्रसिध्द झाल्यापासून 30 दिवसाच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

*****

 

जिल्हाधिकारी यांनी घेतला राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा

 


हिंगोली (जिमाका), दि. 20 : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समिती यांची आढावा बैठक जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अधयक्षतेखाली दि. 18 ऑक्टोबर, 2023 रोजी जिल्हाधिकारी यांच्या दालनात पार पडली. या बैठकीत सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय प्रमुख, अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत प्रत्येक कार्यालय प्रमुखांना प्रत्यक्ष तंबाखू नियंत्रणाबाबत आपल्या स्तरावर काय कार्यवाही केली याबाबत विचारणा केली. आरोग्य व पोलिस विभाग वगळता कोणत्याही विभाग प्रमुखांनी कार्यवाही केली नसल्याने जिल्हाधिकारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शिक्षण विभागांनी लवकरात लवकर तंबाखू मुक्त शाळा कराव्यात अशा सक्त सूचना देण्यात आल्या. त्याच बरोबर नगर परिषद, राज्य परिवहन विभाग, कृषी विभाग, बांधकाम विभाग, समाजकल्याण विभाग आदी विभागांनी आपल्या स्तरावर तंबाखू विरोधी कायद्याचे उल्लंघन होत असल्यास 200 रुपये पर्यंत दंड आकरावा व आपले कार्यालय तंबाखूमुक्त असल्याबाबतचे घोषणापत्र तयार करुन आरोग्य विभागास महितीस्तव द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी उपस्थितांना दिल्या. नगर परिषद व पोलीस विभाग यांनी शाळांच्या आवारातील तंबाखूची विक्री हटविण्याबाबत कार्यवाही करावी, त्याचरोबर पोलिस विभागाने तंबाखू नियंत्रणासाठी केलेल्या कार्यवाहीचा मासिक अहवाल जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षास पाठवावा. जेणेकरुन जिल्ह्याचा एकत्रित अहवाल राज्य कार्यालयासाठी पाठविता येईल. तसेच या बैठकीस अनुपस्थित अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस काढण्यासंबधी सूचना जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी दिल्या.

या आढावा बैठकीस सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय प्रमुख तसेच आरोग्य विभागाचे डॉ. मयूर निंबाळकर, डॉ. कुणाल देशमुख, कुलदीप केळकर, आनंद साळवे, दिलीप धामणे, धम्मदीप नरवाडे, मराठवाडा ग्रामीण विकास संस्था संभाजीनगरचे अभिजीत संघई उपस्थित होते.

*****

19 October, 2023

 मोडी लिपी वाचता येणाऱ्या व्यक्तींनी संपर्क साधण्याचे आवाहन



हिंगोली (जिमाका), दि. 19 : हिंगोली जिल्हयातील मोडी लिपीतील जुन्या अभिलेखांचे वाचन करुन मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीच्या नोंदी तपासून माहिती तयार करण्यासाठी मोडी लिपी वाचता येणाऱ्या व्यक्तींनी जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली व तहसील कार्यालय, हिंगोली येथील 1) श्री.हिमालय घोरपडे, अपर तहसिलदार हिंगोली मो.नं.9766568188, 2) श्री. बी. बी. खडसे, अभिलेखपाल तहसील कार्यालय हिंगोली मो.नं.9175096434 या अधिकारी / कर्मचारी यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. 

.******

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे साधला राज्यातील युवकांशी संवाद

 

• हिंगोली जिल्ह्यातील आठ प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यात हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन

  • प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्‍य विकास केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्याच्या कौशल्य विकासाची तूट भरुन निघण्यास मदत होणार- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 



हिंगोली (जिमाका), दि. 19 : ग्रामीण भागात स्वयंरोजगार निर्मितीला चालना देण्याच्या उद्देशाने राज्यातील 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्‍य विकास केंद्राचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज करण्यात आले. यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील 8 कौशल्य विकास केंद्राचा समावेश आहे. यावेळी प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील युवकांशी संवाद साधला.

ग्रामीण भागात स्वयंरोजगार निर्मितीला चालना देण्याच्या उद्देशाने आज हिंगोली जिल्ह्यातील आठ कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. यावेळी हिंगोली तालुक्यातील संतुक पिंपरी येथील स्वामी विवेकानंद गुरुकुल येथे असलेल्या कौशल्य विकास केंद्रावर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त राजपाल कोल्हे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी विशाल रांगणे, गटविकास अधिकारी गणेश बोथीकर, पप्पू चव्हाण विविध पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, युवक, युवती उपस्थित होते.

ग्रामीण भागात स्वयंरोजगार निर्मितीला चालना देण्याच्या उद्देशाने परंपरागत चालत आलेल्या कौशल्य व्यवसायासमवेत नवीन तंत्रकुशलतेची जोड देऊन प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्‍य विकास केंद्र राज्यातील 511 गावात सुरु होत आहेत. या महत्त्वाकांक्षी कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. राज्यातील या 511 केंद्रामध्ये हिंगोली जिल्ह्यातील आठ प्रशिक्षण केंद्राचा समावेश आहे. या सर्व आठ प्रशिक्षण केंद्राचेही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दृकश्राव्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर म्हणाले, राज्य शासनाने आपल्या जिल्ह्यात आठ कौशल्य विकास केंद्र सुरु केले आहे. या केंद्रावर कौशल्य विकास प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त युवक व युवतींनी नोंदणी करावी, असे आवाहन केले. या कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून आपल्या स्वयंरोजगाराच्या जीवनातील पहिले पाऊल टाकण्यास निश्चितच मदत होणार आहे. या कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्याच्या कौशल्य विकासाची तूट भरुन निघण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रासाठी हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी, लाख, गोरेगाव, नर्सी नामदेव, कुरुंदा, आखाड़ा बाळापूर, कन्हेरगाव नाका, जवळा बाजार अशा एकूण 8 गावांची निवड करण्यात आलेली आहे. या प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राकडे डोमेस्टीक डाटा एंट्री ऑपरेटर, सोलार ॲन्ड एईडी टेक्नीशियन, टू-व्हीलर सर्व्हिस टेक्नीशियन, ड्रायव्हर ट्रेनर एलएमव्ही/ ड्रायव्हर ट्रेनर, जनरल ड्यूटी असिस्टंट ॲडव्हॉन्स्ड इत्यादी अभ्यासक्रमामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मुंबई कार्यालयामार्फत स्वारस्याची अभिव्यक्ती (EOI) प्रक्रिया पूर्ण करुन गठीत समितीमार्फत हिंगोली जिल्ह्यातील आठ गावांसाठी युवा विकास सोसायटी (संपर्क व्यक्ती-आशिष बाजपेयी-मो.नं. 9511226235) या प्रशिक्षण संस्थामार्फत कौशल्य विकास प्रशिक्षण राबविले जाणार आहे.

*****