जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी घेतला जिल्हा सामान्य
रुग्णालयाचा आढावा
• विविध वार्ड, स्वच्छतागृहांची केली पाहणी
• रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक यांच्याशी सुसंवाद ठेवण्याच्या दिल्या
सूचना
हिंगोली (जिमाका), दि. 07 : येथील जिल्हा सामान्य
रुग्णालयातील आरोग्य सुविधेचा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज आढावा घेतला.
रुग्णालयातील प्रत्येक वार्ड, विभागाची त्यांनी पाहणी केली. सर्व वैद्यकीय
अधिकारी, कर्मचारी यांनी रुग्णालयात येणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्याशी
सुसंवाद ठेवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. तसेच रुग्णालयातील आवश्यक
सुविधा, उपलब्ध औषध साठ्याची माहिती घेतली.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, अतिरिक्त जिल्हा शल्य
चिकित्सक डॉ. दीपक मोरे, रुग्णालय प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश
टेहरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम, जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर
चौधरी यांच्यासह विविध वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी रुग्णालयातील सर्व
स्वच्छतागृहांची पाहणी केली. तसेच ही स्वच्छतागृहे नियमितपणे स्वच्छ करण्याच्या
सूचना केल्या. यावेळी त्यांनी रुग्णालयातील विविध वार्डांची पाहणी केली. तसेच रुग्णालयात
उपलब्ध औषधी साठ्याची माहिती घेतली. याठिकाणी उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांशी, त्यांच्या
नातेवाईकांशी संवाद साधून त्यांनी रुग्णालयातील सुविधांबाबत त्यांच्या प्रतिक्रिया
जाणून घेतल्या.
रुग्णांना देण्यात येणारी जीवरक्षक औषधे (व्हाईटल) मुबलक प्रमाणात
उपलब्ध आहेत. एआरटीच्या रुग्णांसाठीही औषध साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. चार
महिने पुरेल एवढे ऑक्सिजन उपलब्ध आहे. तसेच सलाईन मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.
तसेच कुत्रा व साप चावलेल्या रुग्णावर उपचार करण्यासाठी इंजेक्शन मुबलक प्रमाणात
उपलब्ध आहेत. रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये दररोज 500 ते 700 रुग्णांची तपासणी केली
जाते. रुग्णालयाची दोनशे बेडची क्षमता असताना सद्यस्थितीत 340 रुग्ण दाखल आहेत.
त्यामुळे कोविडसाठी तयार करण्यात आलेले वार्ड खुले करुन तेथे रुग्णांची व्यवस्था
केलेली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात मोठ्या प्रमाणात शस्त्रक्रिया होत आहेत.
त्यामुळे रुग्ण रेफर करण्याचे प्रमाण कमी झालेले आहे. तसेच जिल्हा रुग्णालयात
मोठ्या प्रमाणात प्रसूती होतात. यामध्ये सीझरचे प्रमाण फार कमी असून केवळ 20 टक्के
एवढेच आहे. कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयातही सिझरेयिन (शस्त्रक्रिया) सुरु करण्यात
आल्या आहेत. सीटी स्कॅनची सुविधा सुरु करण्यात आली आहे. येथे महिन्याला सरासरी
1250 एक्सरे, 8 ते 10 स्टीस्कॅन होतात तर दररोज 60 ते 70 सोनोग्राफी होतात. तसेच डायलेसीस
विभागात अतिरिक्त दोन डालयेसीस उपलब्ध करुन घेण्याची कार्यवाही सुरु आहे. रुग्णालय
परिसरातील रोड, पार्कींगची व्यवस्था, परिसर स्वच्छता याबाबत कार्यवाही सुरु आहे.
सध्या रुग्णालयात पदाची कमतरता आहे. लवकरच पदे भरण्यात येणार असून वरिष्ठ
कार्यालयाशी समन्वय साधून ही पदे भरण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती जिल्हा
शल्य चिकित्सक डॉ.नितीन तडस यांनी यावेळी दिली.
*******
No comments:
Post a Comment