18 October, 2023

 

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्जाबाबत कार्यवाही करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 18 : हिंगोली जिल्ह्यातील सर्व शासन मान्यता प्राप्त अनुदानित, विना अनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयाचे प्राचार्य, अनुसूचित जाती तसेच विजाभज, विमाप्र, इमाव या प्रवर्गातील विद्यार्थी, त्यांचे पालक तसेच विद्यार्थी पालक संघटना यांनी सन 2023-24 या वर्षासाठी महाडिबीटी पोर्टलवरुन नवीन (Fresh) व नुतनीकरण (Renewal) च्या अर्जाची ऑनलाईन स्वीकृती दि. 11 ऑक्टोबर, 2023 पासून सुरु करण्यात आलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती तसेच राज्य शासनाची शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत प्रतिवर्षाची अर्ज संख्या लक्षात घेता तसेच या योजनेबाबत केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार नोंदणीकृत होणाऱ्या अर्जावर तात्काळ ऑनलाईन प्रक्रिया करुन सदरहू अर्ज विहीत वेळेत निकाली काढण्याच्या केंद्र तसेच राज्य शासनाने सूचना निर्गमित केलेल्या आहेत.

महाविद्यालय स्तरावरील ऑनलाईन अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांच्याकडे विहीत वेळेत सादर करावेत. यासाठी आपल्या महाविद्यालयातील स्थापन करण्यात आलेल्या समान संधी केंद्राद्वारे विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यास योग्य ती मदत घ्यावी. तसेच महाविद्यालयाच्या आवारात शिष्यवृत्तीच्या बाबतीत फ्लेक्स होर्डींग लावावेत.

तसेच दि. 8 जानेवारी, 2019 च्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार संबंधित महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांची शिक्षण शुल्क मंजुरी, विद्यापीठाद्वारे मंजूर होणारे इतर शुल्क इत्यादी बाबीची मान्यता संबंधित सक्षम शैक्षणिक विभाग, शासकीय यंत्रणेकडून करावयाची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांचीच असल्याने त्याबाबत विहीत वेळेत योग्य ती कार्यवाही करुन घ्यावी.

शासनाकडून विहीत मुदतीत अर्ज नोंदणी करणे, नुतनीकरण करणे व पात्र अर्जास मंजुरी देण्याची कार्यवाही होणार असल्याने कुठलाही मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेऊन तात्काळ महाडिबीटी ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्जाबाबत कार्यवाही करण्याचे आवाहन राजु एडके, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली  यांनी केले आहे.

******

No comments: