15 October, 2023

 

वाचन संस्कृती  वृध्दींगत होण्यासाठी वाचनाकडे वळावे

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 

* शासकीय ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

* जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन

                                               


                   

                हिंगोली (जिमाका), दि. 15 :  वाचन संस्कृतीमुळे जीवनाला उत्तम दिशा प्राप्त होते. ग्रंथ हे आपणाला दिशा दाखवितात. त्यामुळे ग्रंथ वाचन संस्कृती वाचविण्यासाठी बालवाचक तयार करावेत आणि वाचन संस्कृती  वृध्दींगत होण्यासाठी वाचनाकडे वळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

  भारताचे माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा साजरा केला जातो. त्यानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय हिंगोली येथे  ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते दि. 13 ऑक्टोबर रोजी करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी जेष्ठ साहित्यिक अशोक अर्धापूरकर हे होते.

यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, जिल्हा सांख्यिकी अधिकारी एस.एम. रचावाड, सहायक सांख्यिकी अधिकारी अतिवीर करेवार, मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष खंडेराव सरनाईक, मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह संतोष ससे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, कलानंद जाधव, गजानन शिंदे व इतर ग्रंथालय कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

            वाचन संस्कृती लहान मुलांमध्ये रुजविण्यासाठी सर्व शाळांनी ग्रंथालयाचे सभासद होऊन वाचन संस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ग्रंथ वाचनामुळे माणसाला दिशा मिळते म्हणून ग्रंथ वाचन करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी यावेळी केली.

            कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक अर्धापूरकर यांनी ग्रंथाला मानवी जीवनात महत्वाचे स्थान असून ग्रंथ हेच आपल्याला खरी दिशा दाखवतात. यामुळे प्रत्येकांने आपले वाचन वाढविले पाहिजे, असे आवाहन केले.  

वाचन संस्कृती वृध्दींगत होण्यासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नेहरु नगर, रिसाला नाका, हिंगोली-431513 संपर्क क्र. 02456-220013, भ्रमणध्वनी क्रमांक 9403067267 व 9860987169 येथे संपर्क साधून जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे सभासद व्हावे.  तसेच आपल्या कार्यालयातील सहकारी, अधिकारी, कर्मचारी व आपल्या कुटूंबातील प्रत्येक व्यक्तीला वाचक होण्यास प्रवृत्त करावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात केले. 

यावेळी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच फीत कापून व दीप प्रज्वलन करुन ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

 

******

 

No comments: