15 October, 2023

 

विपश्यना केंद्र विकसित करण्यासाठी योग्य ते सहकार्य करण्यात येईल

-- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

* जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण

 



            हिंगोली (जिमाका), दि. 15 :  चिंचोली येथे उभारण्यात आलेल्या विपश्यना केंद्र चांगल्या पध्दतीने विकसित करण्यासाठी परिसरात पाणी, वीज, रस्त्याची कामे प्राधान्याने करण्यासाठी योग्य ते सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले. 

            विश्व विपश्यनाचार्य पूज्य गुरुजी  श्री सत्यनारायणजी गोयंका जन्मशताब्दी वर्षानिमित्त हिंगोली जिल्हा विपश्यना समितीच्या वतीने हिंगोली तालुक्यातील चिंचोली (महादेव) येथील धम्मदेस विपश्यना केंद्रावर आनापान, विपश्यना परिचय सत्र व वृक्षारोपण कार्यक्रमानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री. पापळकर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार नवनाथ वगवाड, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे, विपश्यना आचार्य डॉ. संग्राम जोंधळे, विपश्यना वरिष्ठ सहाय आचार्य डॉ. श्रीराम राठोड, विपश्यना सहायक आचार्य डॉ. सुनिल कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

            विपश्यनामुळे स्वत:च्या आत्म्याला लीन होऊन सर्वामध्ये शांती, समाधान निर्माण करण्याचे चांगले काम होत आहे. या विपश्यनाच्या माध्यमातून शांतीचा संदेश देण्यासाठी व समृध्द गाव निर्माण करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावातील नागरिकांसाठी किमान दहा दिवसाचे शिबीर झाले पाहिजेत. याची सुरुवात आपल्या चिंचोली गावापासून करावी व आपले गाव शंभर टक्के विपश्यना झालेले गाव करावेत. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनाही विपश्यना काय आहे याची माहिती देण्यासाठी किमान अर्ध्या तासाचे मार्गदर्शन शिबिर घ्यावेत.

            अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी शांतीचा संदेश देण्यासाठी व सेवाभाव कायम मनामध्ये ठेवण्यासाठी विपश्यना हा चांगला उपक्रम आहे. चिंचोली येथील विपश्यना केंद्राची जागा एकदम चांगली असून येथे वेगवेगळ्या ठिकाणावरुन येणाऱ्या साधकासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी रस्ता, वीज, पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शासनाकडून जी काही  मदत  लागेल त्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले.

            यावेळी विपश्यना आचार्य डॉ. संग्राम जोंधळे यांनी भारत हा खेड्यांचा देश आहे. 70 टक्के लोक ग्रामीण भागात राहतात. त्यामुळे हॅप्पी व्हिलेज तयार करण्यासाठी धावपळीच्या जीवनात जगत असताना अंतरमनातून आनंद मिळण्यासाठी व आनंदी जीवन जगण्यासाठी विपश्यना आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विपश्यना केंद्राची गरज आहे, असे सांगितले.  यावेळी डॉ. सुनिल कुलकर्णी, डॉ. बगडिया, श्री. देवडा, डॉ. शिंदे यांनीही आपले अनुभव कथन केले.

            कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. रामदास धांडे यांनी हिंगोली जिल्ह्यासाठी चिंचोली येथे विपश्यना केंद्र सुरु करण्यात आले असून आतापर्यंत सहा शिबीरे घेण्यात आलेली आहेत. तसेच आता महिलांसाठी शिबीर घेण्यात येणार आहे, असे सांगून यासाठी आवश्यक पाणी, वीज, रस्ता, कंपाऊंडसाठी तरतूद उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी केली.

            कार्यक्रमाच्या सुरुवातीला आनापान, विपश्यना याविषयी परिचय करुन देण्यात आले. तसेच यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सेनगावचे वन परिक्षेत्र अधिकारी शेळके, सहायक लागवड अधिकारी टी.एम.सय्यद, हिंगोली व कळमनुरीचे वन परिमंडळ अधिकारी, वनरक्षक सारंग शिंदे, वैजनाथ शिंदे, सुनिता उबाळे, लोने, चिंचोलीच्या सरपंच अनुसयाबाई सुरेश राठोड, नांदूसाचे सरपंच विश्वनाथ कपाटे, चिंचोलीच्या पोलीस पाटील पद्मजा रविंद्र नाईक (पोले) यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, साधक, साधिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाधान इंगोले, किशोर चव्हाण, संदीप सिरामे, रामलिंग मुळे, प्रदीप हाके यांनी सहकार्य केले.

******

No comments: