प्रत्येक दिव्यांगाला लाभ मिळवून देणे हाच अभियानाचा मुख्य उद्देश
-- आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू
- हिंगोली येथे दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान
- दिव्यांग बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती
- विविध प्रमाणपत्रांचे वाटप
हिंगोली, (जिमाका) दि. 05 : दिव्यांग बांधवांचे प्रशन
सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे सेवा देण्याच्या हेतूने "दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी
" हे अभियान राबविले जात आहे. जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांगाला लाभ मिळवून देणे
हाच या अभियानाचा मुख्य उद्देश आहे, असे प्रतिपादन दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष
ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले.
येथील मधुरदिप
पॅलेसमध्ये आज दिव्यांग कल्याण विभागांतर्गत " दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या
दारी" या अभियानानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार तानाजी
मुटकुळे, आमदार राजू नवघरे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी संजय दैने, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव
केंद्रे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उपमुख्य कार्यकारी
अधिकारी अनंत कुंभार, आत्माराम बोंद्रे, लातूर येथील समाज कल्याण विभागाचे विभागीय
उपायुक्त अविनाश देवसटवार, जिल्हा समाज कल्याण
अधिकारी राजू एडके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक
डॉ.नितीन तडस, जयाजी पाईकराव, डॉ.संजय नाकाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
दिव्यांग कल्याण
विभागाचे अध्यक्ष श्री. कडू बोलताना पुढे म्हणाले, दिव्यांगाच्या वेदना, त्यांचे
दु:ख दूर करण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत मी दिव्यांगासाठी कार्य करत राहणार
आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांच्या सहकार्यामुळे दिव्यांगासाठी स्वतंत्र विभाग निर्माण करण्यात आले आहे.
त्यामुळे आता दिव्यांगाचे प्रश्न सोडविण्यासाठी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.
तसेच दिव्यांगासाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांच्याकडे विनंती करणार आहे. शासनाच्या सर्व योजना दिव्यांगापर्यंत पोहोचल्या
पाहिजेत. प्रशासनाने जिल्ह्यातील प्रत्येक गावात घरोघरी जाऊन सर्वे करावा. यासाठी
ग्रामपातळीवर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा घेऊन त्यांना शासनाच्या योजनाची
माहिती द्यावी आणि त्या सर्व योजनेचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांगापर्यंत
पोहोचविण्याचे काम करावेत. तसेच सर्व दिव्यांगाना येत्या दोन महिन्यात प्रशासनाने
दिव्यांगाच्या दारी पोहोचून युडीआयडी ओळखपत्र उपलब्ध करणे तसेच दिव्यांगाना
अत्योंदय योजनेचा लाभ मिळवून देणे, स्वस्त धान्य दिव्यांगासाठी उपलब्ध देण्याच्यात
सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
श्री. कडू पुढे म्हणाले, दिव्यांग बांधवाकडे
आत्मविश्वास आहे. त्यामुळे ते आयुष्यभर आत्मविश्वासाने जगत आहेत. दिव्यांगांना
चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य
दिव्यांगाच्या सोबत आहे. दिव्यांगासाठी मार्केटींगची व्यवस्था उपलब्ध करुन त्यांना
उद्योग करण्यासाठी गाळे उपलब्ध करुन देणे, व्यवसायाठी कर्ज उपलब्ध करुन देण्याचे
काम दिव्यांग मंत्रालयामार्फत करण्यात येणार असल्याचे सांगून दिव्यांगांच्या बचतगटांना
उद्योग, शाळा, सहकारी संस्थांच्या माध्यमातून दिव्यांगांचा विकास साधत हा विभाग अधिक
गतिशील बनवण्यासाठी सर्व विभागांनी सहकार्य करावे,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
आमदार राजू नवघरे यांनी दिव्यांग बांधवांना
मुख्य प्रवाहात आणण्याचे मोलाचे काम आमदार बच्चू कडू यांनी केले आहेत, असे सांगून
जिल्ह्यातील दिव्यांगासाठी आमदार निधीतून विविध उपकरणे उपलब्ध करुन देण्याचे काम
करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार तानाजी
मुटकुळे यांनी दिव्यांगाचा एवढा मोठा मेळावा हिंगोली जिल्ह्यात पहिल्यांदाच होत
आहे. दिव्यांगाचे आधारस्तंभ बच्चू कडू यांनी संपूर्ण महाराष्ट्र भर दिव्यांगासाठी
काम करत आहेत. त्यांनी दिव्यांगाच्या हक्कासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात
त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून दिव्यांगाना
शासनाकडून जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे
सांगितले.
जिल्हाधिकारी
जितेंद्र पापळकर म्हणाले, दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग सुरु करणारे महाराष्ट्र हे
देशातील एकमेव राज्य आहे.आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नातून दिव्यांगांच्या कल्याणासाठी
हा स्वतंत्र विभाग सुरु झाला आहे. शासन आपल्या
दारी अभियानाच्या धर्तीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात "दिव्यांग कल्याण विभाग
दिव्यांगांच्या दारी " हे अभियान राबवण्यात येत आहे. या विभागाच्या माध्यमातून
दिव्यांगांचे प्रश्न व अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच
दिव्यांगासाठी हिंगोली येथे स्वतंत्र इमारत तयार करण्यात येत आहे. याचे लवकरच
लोकार्पण होणार आहे. या अभियानामुळे सर्व दिव्यांगांना मूख्य प्रवाहात आणण्याचे
काम होत आहे. आमदार बच्चू कडू यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात
दिव्यांगासाठी काम करण्यात येणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे
प्रास्ताविक जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके यांनी केले. तर आभार लातूर येथील
समाज कल्याण विभागाचे विभागीय उपायुक्त अविनाश
देवसटवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते हेलन केलर व
लुई ब्रेल यांच्या प्रतिमेचे पूजन करुन दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन
करण्यात आले. यावेळी मातोश्री गंगादेवी देवडा अंध विद्यालयाचे विद्यार्थ्यांनी
राज्यगीत सादर केले.
कार्यक्रमात मान्यवरांच्या
हस्ते दिव्यांग लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात दिव्यांग बांधवासाठी आवश्यक असलेल्या
विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी मधुरदिप पॅलेस येथे सकाळी
10 वाजतापासून सुरु झालेल्या या शिबिरात नोंदणीसाठी दिव्यांगांनी मोठ्या प्रमाणात गर्दी
केली होती. या ठिकाणी दिव्यांग बांधवांसाठी विविध योजनेचा लाभ देण्यासाठी तयार केलेल्या
स्टॉल्सला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबीरासाठी उपस्थित असलेल्या दिव्यांगांसाठी
व्हिल चेअर, पाणी आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांची
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
******
No comments:
Post a Comment