04 October, 2023

 

जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाची हिंगोली शहरात धडक कार्यवाही

17 लोकांकडून 3 हजार 500 रुपयांचा दंड वसूल

 


हिंगोली, (जिमाका) दि. 04  :  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या निर्देशानुसार सर्व शासकीय कार्यालये व शाळांचा परिसर तसेच सार्वजनिक ठिकाणे तंबाखू मुक्त करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आज दि. 4 ऑक्टोबर, 2023 रोजी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या सुचनेनुसार जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाद्वारे हिंगोली शहरातील बस स्टँड परिसरातील व गांधी चौक येथील सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाऊन उल्लंघन करणाऱ्या आणि धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती व तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली.

तंबाखू विरोधी कायदा (कोटपा-2003) नुसार सर्व सार्वजनिक परिसरात तंबाखूयुक्त पदार्थ खाणे, थुंकणे, बाळगणे व विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. हिंगोली शहरातील बस स्टँड व गांधी चौक येथे ह्या कायद्याचे उल्लंघन होतांना सर्रास दिसते. हिंगोली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास पाटील आणि सहा. पोलीस निरीक्षक मांजरमकर, अशोक धामणे (पो.ह), संतोष कऱ्हे (पो. कॉ.), अझहर पठाण (पो. कॉ.) धनंजय श्रीरसागर (पो. कॉ.) गणेश लेकुळे (पो. कॉ.) यांच्या सहकार्याने मराठवाडा ग्रामीण संस्था, छ. संभाजीनगरचे अभिजित संघई, व जिल्हा रुग्णालयातर्फे डॉ. मयूर निंबाळकर, कुलदीप केळकर, आनंद साळवे व इतर कर्मचारी ह्यांच्या पथकाने  परिसरातील ठिक-ठिकाणी उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती व पान टपऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही केली. या कार्यवाहीत एकूण 17 लोकांकडून 3 हजार पाचशे रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.

कोटपा 2003 च्या नुसार कलम 4 - सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान बंदी आहे. कलम 5 - तंबाखूयुक्त पदार्थ जाहिरात बंदी, कलम 6 - 'अ'  18 वर्षा खालील मुलांना तंबाखूयुक्त पदार्थ विकण्यास सक्त मनाई. कलम 6 'ब'  शैक्षणिक संस्थांच्या 100 मी. परिसरात तंबाखूयुक्त पदार्थ विक्री, सेवन बंदी, कलम 7 - कोणत्याही तंबाखूयुक्त पदार्थावर (पाकिटावर) कर्करोगविषयी चेतावणी पाकिटाच्या 85 टक्के भागावर असावी.

*******

No comments: