राष्ट्रीय टपाल सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. 09 : राष्ट्रीय टपाल सप्ताहानिमित्त परभणी डाक विभागातर्फे दि. 10 ऑक्टोबर ते 13
ऑक्टोबर, 2023 या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये मंगळवार, दि. 10 ऑक्टोबर रोजी वित्तीय
सशक्तीकरण दिवस साजरा करण्यात येणार असून त्यात डाक समुदाय विकास कार्यक्रम (डाक
चौपाल) अंतर्गत विविध बचत योजना तसेच विमा योजना यांची माहिती देण्यासाठी परभणी
विभागांतर्गत सोनपेठ, लिखित पिंपरी आणि हिंगोली टपाल कार्यालय या तीन ठिकाणी विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले
आहे. त्यात केंद्र, राज्य आणि स्थानिक आस्थापनांतील कर्मचारी, अधिकारी आणि स्थानिक
लोकप्रतिनिधींचा सक्रीय सहभाग घेण्यात येणार आहे.
बुधवार, दि. 11 ऑक्टोबर रोजी फिलाटेली दिवस साजरा
करण्यात येणार असून परभणी डाक विभागातर्फे गांधी विद्यालय, एकता कॉलनी शाखा, परभणी
येथे विद्यार्थ्यांसाठी फिलाटेली कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली असून त्यामध्ये
विद्यार्थ्याना पोस्टाच्या तिकिटांची माहिती आणि संग्रह याबाबत मार्गदर्शन करण्यात
येणार आहे. तसेच ढाई अखर पत्रलेखन मोहिम स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे.
ज्यात डिजिटल भारतातून नवीन भारत निर्माण याविषयी विद्यार्थ्यांना पत्र लेखन
करावयाचे आहे.
गुरुवार, दि. 12 ऑक्टोबर रोजी मेल आणि पार्सल दिवस
साजरा करण्यात येणार असून त्यादिवशी पोस्टमास्तर व वितरण कर्मचारी यांच्यासाठी
विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात येईल. तसेच ग्राहक मेळाव्याचे आयोजन करुन त्यांना
वितरण प्रणालीविषयी माहिती देऊन त्यांचे अभिप्राय नोंदविले जातील.
शुक्रवार, दि. 13 ऑक्टोबर रोजी अंत्योदय दिवस
साजरा करण्यात येणार असून या दिवशी परभणी डाक विभागातर्फे दुर्गम, ग्रामीण आणि
शहरी झोपडपट्ट्यांमध्ये जनजागृतीसह आधार नोंदणी आणि अद्ययावतीकरण शिबिराचे आयोजन
केले जाणार आहे. तसेच ग्राहकांना थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी), जन सुरक्षा योजना,
सुकन्या समृध्दी योजना, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना आणि पोस्ट खात्याची इतर
सेवा आणि उत्पादने यांच्या उपलब्धतेबद्दल जागरुकतेचा प्रसार करण्यात येणार आहे.
तसेच परभणी प्रधान डाकघर, शनिवार बाजार येथे डाक सप्ताहानिमित्त दि. 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते
दुपारी 3 या दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे
आयोजन करण्यात आलेले आहे.
या राष्ट्रीय डाक सप्ताहाचा परभणी जिल्ह्यातील
सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन परभणी डाक विभागाचे डाक अधीक्षक मोहम्मद
खदीर यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment