जिल्हा कुष्ठरोग धोरणात्मक कृती आराखड्याचे विमोचन
हिंगोली (जिमाका), दि. 03 : जिल्हा प्रशिक्षण संघ
हिंगोली येथे राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत जिल्हा कुष्ठरोग
धोरणात्मक कृती आराखड्याचे विमोचन आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व मुख्य
कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या हस्ते करण्यात आले.
केंद्र शासनाने 20230 पर्यंत कुष्ठरोगाचा संसर्ग
शुन्यावर आणण्याचे ध्येय ठेवलेले आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा या कामी
प्रभावीपणे राबवून जिल्हा शून्य कुष्ठरोग संसर्ग करण्याचे ध्येय साध्य करण्यात
येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली. देशातून देवी,
नारु, पोलिओ यासारख्या रोगांचे समूळ उच्चाटन झालेले आहे. कुष्ठरोग हा जुनाट आजार
असून प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. पूर्वी या रोगावर कोणताही उपचार उपलब्ध
नसल्यामुळे रुग्णांना शारीरिक विकृती येत होती म्हणून त्यांना वाळीत टाकले जायचे.
सुरुवातीला एकच डॅप्सोन औषध होते. पण ते प्रभावी ठरत नव्हते. नंतर सन 1982-83 साली
बहुविध औषधोपचार सुरु झाल्यामुळे कुष्ठरुग्ण बरे होऊन उपचार मुक्त होत आहेत. बहुविध
औषधोपचारामुळे कुष्ठरुग्ण विनाविकृती बरे होतात. या कामी आरोग्य विभागातील
कर्मचाऱ्यांचे प्रयत्न सफल होत आहेत. सन 2001 पूर्वी जिल्ह्याचे दर दहा हजारी
प्रमाण 3.1 एवढे होते. आज रोजी जिल्ह्यात
98 क्रियाशील रुग्ण असून त्याचे दर दहा हजारी प्रमाण 0.74 एवढे आहे.
सर्व स्तरावरील प्रयत्नामुळे देशात
कुष्ठरुग्णांचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे. म्हणूनच केंद्र शासनातर्फे शाश्वत
विकास ध्येय अंतर्गत 2030 पर्यंत शून्य कुष्ठरोग संसर्ग ही संकल्पना राबविण्यात
येणार आहे. राज्य हे आवाहन गाव पातळीवर शून्य कुष्ठरोग संसर्ग ही संकल्पना
प्रत्यक्ष अमलात आणणार आहोत. यासाठी जिल्ह्यात कालबध्द कार्यक्रम राबविण्यात येणार
आहे. माहे नोव्हेंबर, 2023 मध्ये कुष्ठरोग शोध मोहिम राबविण्यात येणार आहे. तसेच
मार्च,2023 पर्यंत मागील पाच वर्षात शून्य कुष्ठरोग शोध मोहिम राबविण्यात येणार
आहे. तसेच मार्च, 2023 पर्यंत मागील पाच वर्षात शून्य कुष्ठरुग्ण असलेल्या गावांचे
सर्वेक्षण होणार आहे. 2027 पर्यंत हिंगोली जिल्हा निश्चितच शून्य कुष्ठरोग संसर्ग
होईल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुष्ठरोगचे सहायक
संचालक डॉ. सुनिल देशमुख यांनी केले. तर सूत्रसंचालन अ.पर्यवेक्षक मंचक पवार यांनी
केले.
या कार्यक्रमास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास
शेळके, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतीष रुणवाल, वैद्यकीय अधिकारी डॉ.मंगेश टेहरे,
जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, वैद्यकीय अधिकारी डॉ.सुवर्णा महाले,
जिल्हा माध्यम विस्तार अधिकारी प्रशांत तुपकरी उपस्थित होते. तसेच यावेळी सी. एस.
पाटील, रवि भालेराव, शेषराव जाधव, पंढरीनाथ जटाळे, आकाश मुळे, संजय भोकरे,
डॉ.करिष्मा जाधव, नाझीया शेख तसेच मोठ्या संख्येने जिल्ह्यातील आशा वर्कर उपस्थित
होत्या.
*****
No comments:
Post a Comment