18 October, 2023

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन

 

• हिंगोली जिल्ह्यात आठ केंद्राचे होणार दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन

 

हिंगोली (जिमाका), दि. 18 : ग्रामीण भागात स्वयंरोजगार निर्मितीला चालना देण्याच्या उद्देशाने परंपरागत चालत आलेल्या कौशल्याल्यासमवेत नवीन तंत्रकुशलतेची जोड देऊन प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्‍य विकास केंद्र राज्यातील 511 गावात सुरु होत आहेत. या महत्त्वाकांक्षी कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 ऑक्टोबर रोजी सायं. 4 वा. दूरदृश्य प्रणालीद्वारे केला जाणार आहे. राज्यातील या 511 केंद्रामध्ये हिंगोली जिल्ह्यातील आठ प्रशिक्षण केंद्राचा समावेश आहे. या सर्व आठ प्रशिक्षण केंद्राचेही उद्घाटन दृकश्राव्य प्रणालीद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रासाठी हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी, लाख, गोरेगाव, नर्सी नामदेव, कुरुंदा, आखाड़ा बाळापूर, कन्हेरगाव नाका, जवळा बाजार अशा एकूण 8 गावांची निवड करण्यात आलेली आहे. या प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राकडे डोमेस्टीक डाटा एंट्री ऑपरेटर, सोलार ॲन्ड एईडी टेक्नीशियन, टू-व्हीलर सर्व्हिस टेक्नीशियन, ड्रायव्हर ट्रेनर एलएमव्ही/ ड्रायव्हर ट्रेनर, जनरल ड्यूटी असिस्टंट ॲडव्हॉन्स्ड इत्यादी अभ्यासक्रमामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मुंबई कार्यालयामार्फत स्वारस्याची अभिव्यक्ती (EOI) प्रक्रिया पूर्ण करुन गठीत समितीमार्फत हिंगोली जिल्ह्यातील आठ गावांसाठी युवा विकास सोसायटी (संपर्क व्यक्ती-आशिष बाजपेयी-मो.नं. 9511226235) या प्रशिक्षण संस्थामार्फत कौशल्य विकास प्रशिक्षण राबविले जाणार आहे.

हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 18 ते 45 वयोगटातील जास्तीत जास्त इच्छूक युवक-युवतींनी रोजगार व स्वयंरोजगाराभिमुख अभ्यासक्रमांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी आपला प्रवेश नोंदवावा आणि  दि. 19 ऑक्टोबर, 2023 रोजी दुपारी 4.00 वा वरीलप्रमाणे जवळील व सोयीच्या प्रशिक्षण स्थळी उपस्थित रहावे, असे आवाहन सहायक आयुक्त , जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांनी केले आहे.

*****

No comments: