दिव्यांगांना विविध योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी
सेवाभावी वृत्तीने काम करावेत
-- आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू
हिंगोली, (जिमाका) दि. 05 : सर्व विभागांनी
आपणांकडे असलेल्या विविध योजनेचा लाभ दिव्यांगांना मिळवून देण्यासाठी सेवाभावी
वृत्तीने काम करावेत व दिव्यांगाच्या कायमची समस्या दूर करुन दिव्यांगाचे बळ
वाढविण्याचे काम करावेत,अशा दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष आमदार ओमप्रकाश उर्फ
बच्चू कडू यांनी आढावा बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज जिल्ह्यातील सर्व
विभागप्रमुखाची आढावा बैठक दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू
कडू यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी
जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, निवासी
उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रविणकुमार धरमकर, जिल्हा
ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी
राजू एडके यांच्यासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष श्री. ओमप्रकाश ऊर्फ
बच्चू कडू म्हणाले, जिल्ह्यातील दिव्यांगांना शासनाच्या योजनाचा लाभ मिळवून
देण्यासाठी महसूल, आरोग्य व पंचायत विभागाने आपल्या ग्रामस्तरावर असलेल्या आशा
वर्कर, अंगणवाडी सेविका, कोतवाल, तलाठी, ग्रामसेवक यांना सूचना द्याव्यात. यासाठी
ग्रामस्तरावर सर्वे करावा, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेऊन दिव्यांगासाठी कोणत्या
योजना आहेत त्याची माहिती द्यावी व गावातील प्रत्येक दिव्यांगाला लाभ मिळवून द्यावेत.
आरोग्य
विभागानी जिल्ह्यातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांना प्रशिक्षण देऊन अपंगत्वाचे
प्रकार, त्यावरील उपाययोजना आदी माहिती
देऊन आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांच्या मदतीने प्रत्येक गावातील दिव्यांग
शोधून त्यांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यासाठी अर्ज घ्यावेत व त्या अर्जांची
छाननी करुन येत्या 15 दिवसात अभियान राबवून अपंगत्वाचे प्रमाणपत्र व युडीआयडी
प्रमाणपत्रही उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करावी.
पंचायत विभागाने
दिव्यांगाना घरकुल उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करावी. तसेच सर्व तहसीलदारांनी
कोतवाल, तलाठी यांच्यामार्फत प्रत्येक गावातील दिव्यांगाची माहिती घेऊन त्यांना
राशन कार्ड, संजय गांधी निराधार अनुदान उपलब्ध करुन द्यावेत व त्यासाठी आवश्यक
प्रमाणपत्र उपलब्ध करुन द्यावेत. तसेच जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद, नगरपालिका,
ग्रामपंचायतीचा पाच टक्के निधी त्या त्या गावातील दिव्यांगांना उपलब्ध करुन
देण्यात यावा. यासाठी सर्व यंत्रणेला सूचना देण्यात याव्यात. ज्या स्थानिक
स्वराज्य संस्थेनी निधी देण्यास हयगय केल्यास त्यांच्यावर कार्यवाही करावी. दिव्यांग
विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांची वेगळी यादी तयार
करावी, त्यांना क्रीडामध्ये संधी उपलब्ध करुन द्यावी, शिक्षणासाठी मदत करावी, अशा
सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, कोतवाल, तलाठी
यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व गावात प्रत्येक घरी जाऊन दिव्यांगाची माहिती
घेऊन त्याची नोंद करण्याचे काम करावेत. तसेच गावनिहाय सर्वे करुन गावात एकही पात्र
दिव्यांग लाभापासून वंचित राहिलेला नाही असे प्रमाणपत्र घेण्याची कार्यवाही करावी.
तसेच येत्या 3 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग
दिनापर्यंत जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा दिव्यांगासाठीचा पाच टक्के निधी शंभर
टक्के वितरीत होईल याची दक्षता घ्यावी.
आपल्या जिल्ह्यातील सर्व दिव्यांगाचे प्रश्न सोडविण्याचे काम करावे, अशा सूचना
दिल्या.
*****
No comments:
Post a Comment