16 October, 2023

 

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या मोफत पूर्वप्रशिक्षणाची सुवर्णसंधी

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात 15 नोव्हेंबर रोजी मुलाखतीचे आयोजन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 16  : भारतीय सशस्त्र सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या परीक्षेची पूर्वतयारी करुन घेण्यासाठी नाशिक येथील नाशिक रोडच्या छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये राज्य शासनातर्फे राज्यातील नवयुवक व नवयुवतींसाठी 20 नोव्हेंबर, 2023 ते 29 नोव्हेंबर, 2023 या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. 55 आयोजित करण्यात येत आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात येणार आहे.

हिंगोली जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी हिंगोली जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात 15 नोव्हेंबर, 2023 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी, हिंगोली यांनी केले आहे. मुलाखतीस येताना डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेलफेअर पुणे (डीएसडब्ल्यू) यांच्या संकेतस्थळावर सर्च करुन त्यामधील एसएसबी-55 कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावेत. छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये एस.एस.बी वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेवून यावेत.

उमेदवार कंम्बाइंड डिफेंस सर्व्हिसेस एक्झामिनेशन (सीडीएसई-युपीएससी) अथवा नॅशनल डिफेंस अॅकडमी एक्झामिनेशन (एनडीए-युपीएससी) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेला असावा. एनसीसी 'सी' सर्टिफिकेट 'ए' किंवा 'बी' ग्रेडमध्ये पास झालेले आणि एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस. एस. बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. विद्यापीठ प्रवेश प्रणाली (युनिवर्सिटी एन्ट्री स्कीम) साठी एस.एस.बी कॉल लेटर असावे. शिफारस केलेल्या यादीत नांव असावे.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आयडी :  training.pctcnashik@gmail.com अथवा 0253-2451032 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा 9156073306 या भ्रमणध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

*****

No comments: