वाचन संस्कृती वृध्दींगत होण्यासाठी सर्व कार्यालये व शाळा
महाविद्यालयांनी
जिल्हा ग्रंथालयाचे सभासद व्हावेत
- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 12 : माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर
हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य
साधून हा दिवस चिरकाल स्मरणात रहावा या उदेशाने व वाचन संस्कृती वृध्दींगत होण्यासाठी
तसेच वाचनाने मनुष्याच्या जीवनात सुसंगती येऊन आपले व्यक्तिमत्व परिपक्व होण्यास मदत
होते. जीवनाला उत्तम दिशा प्राप्त होते. वाचनाचे महत्व या ठिकाणी लागण्याचा हेतू हाच
की आपण कामाच्या धावपळीमध्ये वाचन करीत नसाल तर पुन्हा एकदा वाचनाकडे वळावे.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय हे हिंगोली शहराच्या
मध्यवर्ती ठिकाणी नेहरु नगर, रिसाला नाका, हिंगोली येथे आहे. या ग्रंथालयामध्ये एकूण
47 हजार एवढी ग्रंथसंपदा आहे. त्यामध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषेतील चरित्र,
आरोग्य, उद्योग, कथा-कादंबरी, काव्य, नाटक, व्यक्तीमत्व विकास, स्पर्धा परिक्षा, धार्मिक,
इतिहास, भुगोल, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, ज्ञान, कृषि, संदर्भ गंभ, शब्दकोश, माहिती
तंत्रज्ञान, पत्रकारिता, इत्यादी विभिन्न विषयावरील प्रसिध्द व वाचनीय ग्रंथ वाचकांसाठी
उपलब्ध आहेत. या ग्रंथाबरोबरच विभिन्न विषयावरची मासिके, साप्ताहिक, दिवाळी अंक तसेच
बाल व महिला वाचकांसाठीसुध्दा मोठ्या प्रमाणावर वाचन साहित्य उपलब्ध आहे.
या ग्रंथालयात दोन प्रकारे सभासद होता येते. 1) वैयक्तिक
सभासद : वैयक्तिक सभासद होण्यासाठी विहित नमुन्यातील अर्जासोबत 500 अनामत रक्कम व 100
रुपये द्विवार्षिक प्रवेश शुल्क व 10 रुपये अर्ज शुल्क असे फक्त 610 रुपये भरावे लागतील. 2) संस्था सभासद : संस्था सभासद
होण्यासाठी विहित नमुन्यातील अर्जासोबत 2 हजार 500 रुपये अनामत रक्कम व 750 रुपये द्विवार्षिक
प्रवेश शुल्क व 25 रुपये शुल्क असे एकूण 3 हजार 275 रुपये भरावे लागतील. यामध्ये आपल्या
संस्थेत 25 ग्रंथांचा एक संच एका महिन्यासाठी देण्यात येईल. तो परत केल्यानंतर दुसरा
संच देण्यात येईल. ग्रंथ देवाण घेवाणची वेळ शासकीय सुट्या वगळून सोमवार ते
शुक्रवार सकाळी 10.00 ते सांय. 5.00 अशी आहे.
कार्यालयाचा पत्ता : जिल्हा ग्रंथालय अधिकारी
कार्यालय, नेहरु नगर, रिसाला नाका, हिंगोली-431513 असा असून संपर्क क्र.
02456-220013, भ्रमणध्वनी क्रमांक 9403067267 व 9860987169 असा आहे.
वाचन संस्कृती वृध्दींगत होण्यासाठी सर्व
कार्यालय प्रमुख तसेच शाळा महाविद्यालयांनी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे सभासद
व्हावे आणि आपल्या कार्यालयातील सहकारी, अधिकारी, कर्मचारी व आपल्या कुटूंबातील प्रत्येक
व्यक्तीला वाचक होण्यास प्रवृत्त करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
यांनी केले आहे.
******
No comments:
Post a Comment