19 March, 2024

हिंगोली लोकसभा मतदारसंघातील 1 हजार 003 मतदान केंद्रांवर होणार वेब कास्टींग

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर हिंगोली, (जिमाका) दि.19: हिंगोली लोकसभा मतदार संघासाठी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यात 26 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे. मतदारसंघात एकूण 2 हजार 006 मतदान केंद्र असून, त्यापैकी निम्मे म्हणजेच 1 हजार 003 मतदान केंद्रांवर वेब कास्टींगद्वारे करडी नजर राहणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले. अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, उपजिल्हाधिकारी समाधान घुटुकडे आदी यावेळी उपस्थित होते. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, हिंगोली, परभणी, नांदेड, यवतमाळ-वाशीम, बुलडाणा, अकोला, अमरावती आणि वर्धा मतदारसंघाचे मतदान दुसऱ्या टप्प्यात होणार आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 ही भयमुक्त, खुल्या वातावरणात आणि पारदर्शी पद्धतीने पार पडावी, यासाठी जिल्हा आणि पोलीस प्रशासन काम करत आहे. त्यासाठी पोलीस आणि महसूल प्रशासनात योग्य पद्धतीने समन्वय ठेवत काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. दि. 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गंत 23 जानेवारी 2024 रोजी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मतदार यादीनुसार 19-हिंगोली लोकसभा मतदारसंघात 2006 मतदान केंद्र असून, यामध्ये 18 लक्ष 2 हजार 592 मतदारांची नोंद झाली आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघातील 82-उमरखेड 342, 83-किनवट 330, 84-हदगाव 319, 92-वसमत 327, 93-कळमनुरी 345 आणि 94-हिंगोली 343 अशा एकूण सहा विधानसभा मतदारसंघामध्ये 2 हजार 006 मतदान केंद्र आहेत. या केंद्रांमध्ये अनुक्रमे उमरखेड 3 लक्ष 2 हजार 623, किनवट 2 लक्ष 65 हजार 723, हदगाव 2 लक्ष 88 हजार 79, वसमत 3 लक्ष 8 हजार 631, कळमनुरी 3 लक्ष 16 हजार 538 मतदारांचा समावेश आहे. या 2 हजार 6 मतदान केंद्रांपैकी 1 हजार 3 मतदान केंद्रांवरील निवडणूक वेब कास्ट केली जाणार असल्याचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले. एकूण मतदार 18 लाख 2 हजार 592 आहेत. यामध्ये पुरुष 9 लाख 27 हजार 587 तर महिला 8 लक्ष 77 हजार 682 आणि इतर 23 मतदारांचा या मतदारसंघात समावेश आहे. यामध्ये संवेदनशील मतदान केंद्र 15 असून, किनवट 7 तर उमरखेड विधानसभा मतदारसंघात 6, हदगाव, वसमत प्रत्येकी एका मतदान केंद्राचा समावेश आहे. प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी 8 हजार 323 कर्मचारी मतदान केंद्रावर आवश्यक असून, 1896 कर्मचारी (20 टक्के) वर्ग राखीव ठेवण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने या लोकसभा मतदारसंघामध्ये 75 टक्के पेक्षा अधिक मतदानाचे ध्येय ठेवले असून, जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे केले. भारत निवडणूक आयोगाने देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 च्या कार्यक्रमाची घोषणा केली असून महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघासहित देशातील सर्व 543 लोकसभा मतदारसंघासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर 15 - हिंगोली लोकसभा मतदार संघासाठी घेण्यात येणाऱ्या निवडणुकीसंदर्भात प्रशासनाच्या सज्जतेसह विस्तृत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात आढावा बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. तसेच 40 टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग मतदार, वयोवृद्ध (85 वय वर्षे) मतदार, अत्यावश्यक सेवावरील कर्मचारी-अधिकारी, निवडणुकीसाठी कर्तव्यावर असलेले अधिकारी-कर्मचारी, पोल पर्सोनेल, पोलीस पर्सोनेल अशा मतदारांना पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाची सुविधा असेल. यासाठी 12/12अ, 12ड क्रमांकाचा अर्ज भरणे आवश्यक राहील, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले. *****

No comments: