19 March, 2024
आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास तात्काळ गुन्हे दाखल करा - जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर
हिंगोली, (जिमाका) दि. 19 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन केले जाईल, याची सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी. मतदार संघात कुठेही कोणत्याही व्यक्तीने आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी श्री. पापळकर बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी नामदेव केंद्रे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, उपजिल्हाधिकारी समाधान घुटुकडे उपस्थित होते.
भरारी पथकांतील अधिकारी -कर्मचारी नियुक्ती करण्यात आली असून त्यानुसार लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता काळात नियुक्त भरारी पथकाकडून 24 तास पाहणी करण्यात यावी. निवडणूक कालावधीत कोणत्याही प्रकारे हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घ्यावी. रोकड, सोने, आदी बाबींची कोणत्याही ठिकाणाहून नियंत्रण पथकांनी टेहळणी करावी. पोलीस विभाग व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी एकत्रित मतदान केंद्राच्या ठिकाणी जावून पाहणी करावी. पाहणी वेळी काही गैरप्रकार आढळून आल्यास त्यानुसार कार्यवाही करत तात्काळ गुन्हे दाखल करावेत, असे आदेश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी उपस्थितांना दिले.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हद्दपारीची, दारुबंदीची प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत. पोलीस विभागाकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये उपविभागीय अधिकारी यांनी लक्ष घालून, योग्य समन्वयातून ही प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत. याबाबत निवडणूक निरीक्षकांच्या आढावा बैठकीमध्ये पोलीस, उपविभागीय अधिकारी यांनी संयुक्तपणे कार्यवाही करुन अद्यायावत माहिती सादर करावी, असे आदेश जिल्हा दंडाधिकारी श्री. पापळकर यांनी दिले.
आदर्श आचारसंहिता कालावधीमध्ये निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व पथक प्रमुखांनी नियमांचे पालन करावे. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची प्रत्येक अधिकारी, पथक प्रमुखाने खबरदारी घ्यावी. निवडणूक कालावधीतील प्रत्येक कामकाजातील जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यासोबत तंत्रज्ञानस्नेही सहायक द्यावा. याकामी संबंधित अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष घालण्याचे निर्देश श्री. पापळकर यांनी दिले.
प्रलंबित प्रकरणाची प्रकरणनिहाय अहवाल सादर करताना पोलीस व महसूल विभागाने अचूक माहिती तयार ठेवावी. निवडणूक कालावधीत सर्व अधिकाऱ्यांनी योग्य समन्वय ठेवणे महत्त्वाचे आहे. याला प्रथम प्राधान्य देण्याच्या सूचना केल्या. आता ही कार्यवाही वेगाने करावी. निवडणूक कामात कोणतीही हयगय होता कामा नये, या कामात दिरंगाई केल्यास दोषीविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असे निर्देश पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दिले.
कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. ज्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना टपाली मतदान करायचे आहे, त्यांनी 12-डी फॉर्म भरुन देण्याबाबत अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी माहिती दिली.
जिल्हास्तरावर लोकसभा निवडणुकीशी संबंधित विविध प्रकारच्या परवानग्या देण्यासाठी एकल खिडकी परवानगी कक्ष स्थापन करण्यात येणार असून यात पोलीस विभागाकडून देण्यात येणाऱ्या परवानगीसाठी पोलीस विभागाचा कर्मचारी असणार आहे, सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी निवडणूक भयमूक्त, पारदर्शी आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी आपणास दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी, अशा सूचना उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे यांनी दिली.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment