17 March, 2024

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 लोकशाहीच्या महोत्सवात जास्तीत-जास्त मतदारांनी सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

• हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी 26 एप्रिल रोजी मतदान • प्रशासनाची सज्जता; मतदार संघात आदर्श आचार संहिता लागू हिंगोली (जिमाका), दि.17 : हिंगोली लोकसभा मतदार संघासाठी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार असून प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हा प्रशासनाने या लोकसभा मतदारसंघामध्ये 75 टक्के पेक्षा अधिक मतदानाचे ध्येय ठेवले असून, जास्तीत जास्त मतदारांनी मदतानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे केले. भारत निवडणूक आयोगाने देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 च्या कार्यक्रमाची घोषणा केली असून महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघासहित देशातील सर्व 543 लोकसभा मतदारसंघासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर 15 - हिंगोली लोकसभा मतदार संघासाठी घेण्यात येणाऱ्या निवडणुकीसंदर्भात प्रशासनाच्या सज्जतेसह विस्तृत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, उपजिल्हाधिकारी समाधान घुटुकडे आदी यावेळी उपस्थित होते. सर्व मतदारांच्या सहभागातून ही लोकसभा निवडणूक यशस्वीपणे राबविण्यात येणार असून, जिल्हा प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघ निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाची संपूर्ण सज्जता झाली असून सर्वांनीच आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी केले. यामध्ये 40 टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग मतदार व वयोवृद्ध (85 वर्षापेक्षा जास्त) मतदार, अत्यावश्यक सेवावरील कर्मचारी-अधिकारी, निवडणुकीसाठी कर्तव्यावर असलेले अधिकारी-कर्मचारी, पोल पर्सोनेल, पोलीस पर्सोनेल अशा मतदारांना पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाची सुविधा असेल. यासाठी 12/12अ, 12ड क्रमांकाचा अर्ज भरणे आवश्यक राहील, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी आदर्श आचारसंहिता काळात काय करावे आणि काय करु नये, याबाबत भारत निवडणूक आयोगाने सुस्पष्ट निर्देश दिलेले आहेत. या निर्देशांप्रमाणे सर्वांनी कार्यवाही करणे आवश्यक आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होता कामा नये. निवडणूक विषयक कामकाज हे प्राधान्याने आणि अचूकपणे होईल, याची दक्षता घेतली जाणार आहे. पेडन्यूजबाबत प्रसारमाध्यमांनी घ्यावयाची काळजी आणि माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीशी संपर्क साधून या संदर्भातील नियम समजून घेत चुका टाळण्याचे आवाहन केले. सी –व्हिजील ॲपवर नागरिकांकडून प्राप्त तक्रारींचा 100 मिनिटांच्या आत निपटारा करण्यात येणार आहे. तसेच एखाद्या उमेदवारास ऑनलाईन नामनिर्देशन अर्ज भरावयाचा असल्यास सुविधा व इनकोअर ॲपच्या माध्यमातून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन अर्ज भरता येईल व त्याची एक प्रत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर करणे बंधनकारक आहे. तसेच विहीत परवानगीसाठी सुविधा हे ॲप तयार करण्यात आले असून, त्यचाही उमेदवारांना लाभ घेता येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी सांगितले. दिव्यांग व 85 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांना 12 डी अर्ज भरुन सादर केल्यानंतर निवडणूक यंत्रणेकडून त्यांच्या घरी मतदान करण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. असा असेल निवडणूक कार्यक्रम हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी 28 मार्च रोजी अधिसूचना जारी होणार आहे. 4 एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल तर 5 एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. 8 एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 26 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. तर 4 जून रोजी मतमोजणी होवून निकाल जाहीर होणार आहे. 6 जूनपर्यंत जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू राहणार आहे. हिंगोली मतदार संघात 2 हजार 006 मतदान केंद्र हिंगोली लोकसभा मतदारसंघाअंतर्गत 6 विधानसभा मतदार संघात एकूण 2 हजार 006 मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. या मतदारसंघासाठी स्ट्राँग रुम आणि मतमोजणीची व्यवस्था शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, लिंबाळा (मक्ता) येथे करण्यात येणार आहे. ही सर्व निवडणूक यंत्रणा पार पाडण्यासाठी 15-हिंगोली मतदार संघात 249 क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदार शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस विभागात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. एकूण मतदार 18 लाख 2 हजार 592 आहेत. यामध्ये पुरुष 9 लाख 27 हजार 587 तर महिला 8 लक्ष 77 हजार 682 आणि इतर 23 मतदारांचा या मतदारसंघात समावेश आहे. यामध्ये संवेदनशील मतदान केंद्र 15 असून, किनवट 7 तर उमरखेड विधानसभा मतदारसंघात 6, हदगाव, वसमत प्रत्येकी एका मतदान केंद्राचा समावेश आहे. प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी 8 हजार 323 कर्मचारी मतदान केंद्रावर आवश्यक असून, 1896 कर्मचारी (20 टक्के) वर्ग राखीव ठेवण्यात आला आहे. हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 मध्ये मतदरसंघात 66.50 टक्के मतदान झाले होते. सन 2019 मध्ये 17 लाख 32 हजार 540 इतकी एकूण मतदारसंख्या होती. त्यापैकी 9 लाख 5 हजार 193 पुरुष तर 8 लक्ष 27 हजार 334 महिला आणि 13 इतर मतदारांच्या समावेशाची नोंद झाली होती. यापैकी 6 लक्ष 17 हजार 376 पुरुषांनी, तर 5 लक्ष 34 हजार 836 महिला आणि इतर 2 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यात पुरुष 68.20, महिला 64.65आणि इतरांच्या मतदानाची टक्केवारी ही 15.38 होती. तर एकूण 66.50 टक्के मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्यात भाग घेतला होता. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था, आदर्श आचारसंहिता, मनुष्यबळ व्यवस्थापन, निवडणूक खर्च, तक्रार निर्वाण, स्वीप, माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समिती यासह विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत. तसेच 15-हिंगोली लोकसभा मतदार संघात 249 क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. भरारी पथक, स्थिर पथक, व्हिडीओ पथक आणि उमेदवारांच्या प्रचारावर निगराणी करण्यासाठी पथकांची स्थापना करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी सांगितले. गतवेळी मतदान कमी झालेल्या मतदान केंद्रावर लक्ष केंद्रित करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. तसेच निवडणूक शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. *****

No comments: