26 March, 2024
अत्यावश्यक सेवेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिका उपलब्ध करुन देण्यासाठी पथक प्रमुख नेमावेत- अपर जिल्हाधिकारी श्री. परदेशी
हिंगोली (जिमाका), दि. 26 : अत्यावश्यक सेवेत कार्यरत अधिकारी-कर्मचारी यांना त्यांच्या मतदानाच्या व्यवस्थेसाठी टपाली मतपत्रिका उपलब्ध करुन देण्यासाठी संबंधित मतदारसंघासाठी पथक प्रमुख नेमावेत, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी आयोजित बैठकीत दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024साठी अत्यावश्यक सेवेतील मतदारांना टपाली मतपत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रतिनिधी डॉ. बालाजी भाकरे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील, टपाल कार्यालय अधीक्षक रमेश बगाटे, एसटी महामंडळाचे श्री. थोरवले, जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. परदेशी म्हणाले, अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचारी यांची टपाली मतपत्रिकेसाठी संबंधित सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे 12 डी फॉर्मची मागणी नोंदवावी. मतदानाच्या दिवशी मतदान करता यावे, यासाठी रुग्णालयात कार्यरत डॉक्टर, परिचारिका आणि संबंधित कर्मचारी यांच्या दैनंदिन कामकाज करता मतदान करण्यासाठी वेळेची सवलत देण्यात यावी. त्यामुळे त्यांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहणार नाहीत, याची प्रत्येक कार्यालय प्रमुखाने काळजी घ्यावी, असे निर्देशही अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी दिले आहेत. तसेच सेनादलातील जवानांना टपाली मतपत्रिका पाठविण्यासाठी पोस्टातर्फे दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment