20 March, 2024
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनावर पक्ष प्रचाराचे कापडी फलक, झेंडे लावणे इत्यादी बाबीसाठी निर्बंध
हिंगोली (जिमाका), दि. 20 :भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 साठी कार्यक्रम 16 मार्च, 2024 रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. या निवडणुकीच्या प्रचार मोहिमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक हे निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर पक्ष प्रचाराचे फलक लावणे, झेंडे लावणे, इत्यादी बाबीसाठी बंधन घालणे आवश्यक आहे.
त्यासाठी जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी फौजदारी प्रक्रीया संहीता 1973 चे कलम 144 अन्वये पुढील प्रमाणे आदेशाद्वारे निर्बंध घातले आहेत. यामध्ये फिरत्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजुला विंड स्क्रिन ग्लासच्या पुढे राहणार नाही. तसेच तो त्या वाहनाच्या टपापासुन 2 फूट उंचीपेक्षा जास्त राहणार नाही. प्रचाराच्या फिरत्या वाहनांवर कापडी फलक वाहन चालकाच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजूने लावण्यात यावा, इतर कोणत्याही बाजूस तो लावता येणार नाही. फिरत्या वाहनांवर लावावयाचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधित पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेदवार व उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी निवडणूक प्रचारासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहनाव्यतिरीक्त इतर कोणत्याही वाहनांवर लावता येणार नाही. हे आदेश निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत (दि. 6 जून 2024 पर्यंत) लागू राहणार असल्याचे आदेशीत केले आहेत.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment