07 March, 2024
महसुली सेवांचा लाभ देण्यासाठी येतंय शासनच आपल्या दारी
‘शासन आपल्या दारी’विशेष लेख
राज्य शासनामार्फत सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध लोककल्याणकारी योजना राबविण्यात येतात. शासनाच्या विविध योजनांचे लाभ मिळावेत, यासाठी आता राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शासनच आता थेट जनतेच्या दारी येत आहे. राज्य शासनाच्या सर्व योजनांची माहिती जनतेला देत त्याचा पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हा महत्वाकांक्षी उपक्रम राबविण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यानुसार आतापर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात आला आहे. हा उपक्रम हिंगोली येथील रामलीला मैदानावर रविवार, दि.10 मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहचविण्यात येणार आहे.
या उपक्रमातंर्गंत वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या योजनांचा लाभ या माध्यमातून दिला जाणार आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश हा शासनाच्या योजनांचा, उपक्रमांचा लाभ सर्वसामान्यांना, नागरिकांना तात्काळ प्राप्त व्हावा हाच आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांना एकाच छताखाली लाभ मिळणार आहे. याशिवाय शासकीय निर्धारित शुल्क आकारुन 200 हून अधिक योजनांचा लाभ मिळण्यासाठी कमीत-कमी कागदपत्रे सादर करुन जलद मंजुरी मिळणार आहे. या उपक्रमाचा प्रारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील दौलतनगर येथे संपन्न झाला. त्यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्य शासनाचे कामकाज अधिक लोकाभिमुख आणि कार्यक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे. राज्यात या उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत असून, या उपक्रमांतर्गत सर्वसामान्य नागरिकांना विविध सेवा देण्यात येत आहेत.
राज्य शासनाच्या सर्व योजना एकाच छताखाली आणून, जिल्ह्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या महासंकल्पानुसार महसूल विभागांतर्गत हिंगोली जिल्हावासीयांना सेवा देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. या सेवांमध्ये संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी आवास योजना, श्रावणबाळ आदी योजनांचा दिव्यांगांना प्राधान्याने लाभ देणे, शिधापत्रिका व संबंधित सर्व योजना, तहसील कार्यालयातील अभिलेख विभागातून जनतेस आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या नक्कल प्रती उपलब्ध करुन देणे, निवडणूक विभागामार्फत मतदारांना ओळखपत्र वाटप करणे, मतदार यादीत नवीन नावे अंतर्भूत करणे, तसेच मयतांची नावे वगळणे, नाव, वय, पत्ता फोटो याबाबत दुरुस्ती करुन माहिती अद्यावत करणे, आदी बाबींचा लाभ नागरिकांना या उपक्रमाद्वारे मिळणार आहे.
तसेच सातबाराचे वितरण, तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयातून फेरफार आणि 8 अ चा उतारा व इतर प्रमाणपत्रे देणे, विविध प्रकारचे शैक्षणिक व इतर योजनांचे प्रमाणपत्र, उत्पन्न, वय, अधिवास, रहिवाशी, जात प्रमाणपत्राचे वाटप करणे, उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र, आधार अद्ययावतीकरण संदर्भातील सेवांचा देखील यामध्ये समावेश असणार आहे. महसूल विभागांतर्गत येणाऱ्या या सर्व प्रकारच्या सेवा नागरिकांना मिळणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालय व संबंधित तहसील कार्यालय यांच्यासह तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय, महा-ई-सेवा केंद्र यांच्याकडे रितसर अर्ज करुन अथवा संपर्क साधून ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमातंर्गत जास्तीत-जास्त योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
- जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment