07 March, 2024
औद्योगिकदृष्ट्या विकसित जिल्हा म्हणून नावारुपास येण्यासाठी काम करावेत - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
* जिल्ह्याच्या विकासामध्ये महत्वपूर्ण योगदान द्यावे-आ.संतोष बांगर
हिंगोली (जिमाका), दि 07 : जिल्ह्यातील सर्व नवीन गुंतवणूकदारांचे अभिनंदन करुन जिल्ह्याच्या औद्योगिक विकासात वाढ केल्यामुळे समाधान व्यक्त केले. तसेच उद्योजक निर्यातदार, यांनी उद्योग संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम / मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम इत्यादी योजनेच्या माध्यमातून आपले नवउद्योग सुरु करावेत. तसेच एक जिल्हा उत्पादन अंतर्गत हळदीवर जास्तीत जास्त प्रक्रिया उद्योग सुरु करुन फार्मर प्रोड्यूसर कंपन्यांनी आणि उद्योजकांनी निर्यातक्षम उत्पादने तयार करावीत. जेणेकरुन हिंगोली जिल्ह्याचा औद्योगिक विकास होऊन विनाउद्योग जिल्ह्यातून औद्योगिकदृष्टया विकसित जिल्हा म्हणून नावारुपास येण्यासाठी काम करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.
येथील जिल्हा उद्योग केंद्रामार्फत गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आज साई रिसॉर्ट, अकोला बायपास रोड, हिंगोली येथे करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या परिषदेस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मैत्री कक्षाचे नोडल अधिकारी सागर आवटी , निर्यात सल्लागार सत्यकुमार राठी, नांदेड उपविभागीय कार्यालयाचे व्यवस्थापक जितेंद्र देशमुख, ज्ञानेश्वर मामडे, प्रविण सोनी, कैलासचंद कावरा, राजु खुराणा, निर्यातदार उद्योजक, औद्योगिक समुह, बँकर्स, फार्मर प्रोड्युसर कपंनी आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार संतोष बांगर यांनी सर्व नवोदीत उद्योजकांचे महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्ह्यामध्ये 400.10 कोटीचे गुंतवणूक करुन 1 हजार 824 जणांना रोजगार उपलब्ध करुन दिल्याबाबत अभिनंदन केले व जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राज्यशासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेउन स्वतःचा व्यवसाय उभारावा व जिल्ह्याच्या विकासामध्ये आपले महत्वपूर्ण योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या गुंतवणूक परिषदेत मंत्री कक्षाचे नोडल अधिकारी सागर आवटे यांनी शासनाकडून उद्योजकांसाठी पुरवविण्यात येणाऱ्या परवान्याबाबत अंमलात आलेल्या नवीन कायद्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. जालना येथील निर्यात सल्लागार सत्यकुमार राठी यांनी जिल्ह्यातील उद्योजकांना आयात-निर्यात प्रक्रिया बाबत सविस्तर मार्गदर्शन केले,
प्रास्ताविकात जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक शोएब अ.कादरी यांनी जिल्ह्यातील गुंतवणूक वाढविणे व नवउद्योजकांना आकर्षित करणे, जिल्ह्यातील गुंतवणूकदार आणि व्यवसायिकांना एकत्र आणून हिंगोली जिल्हा हा विकासासाठी केंद्रबिंदु मानून जिल्ह्याच्या व राज्याच्या विकासाला चालना देणे, हा जिल्हा गुंतवणूक परिषदेचा उद्देश असल्याचे सांगितले. तसेच या परिषदेत झालेल्या सामंजस्य करारामुळे जिल्ह्यात 22 उद्योग स्थापन होणार असून यामध्ये सुमारे 400.10 कोटी रुपये गुंतवणूक होणार आहे. या मधून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरुपात 1 हजार 824 जणांना रोजगार मिळणार असल्याचे सांगितले.
या सभेस नांदेड विभागीय कार्यालयाचे व्यवस्थापक जितेंद्र देशमुख, मिटकॉन हिंगोलीचे प्रकल्प अधिकारी सुभाष जाधव, खादी व ग्रामोद्योग अधिकारी वाघमारे, जिल्हा उद्योग केंद्राचे पी. व्ही. मेंढे, उद्योग निरीक्षक कु. सुदेशना सवराते, एम.बी. कांदे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वर्षा लांडगे यांनी केले व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र हिंगोलीचे प्रकल्प अधिकारी सुधीर आठवले यांनी आभार प्रदर्शन केले.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment