30 March, 2024
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 - मतदान करण्यासाठी शालेय विद्यार्थी देणार आई-बाबांना ‘संकल्प पत्र’, 'स्वीप'अंतर्गत मतदार जनजागृतीसाठी अभिनव उपक्रम
हिंगोली (जिमाका),दि.30 : मागील लोकसभा निवडणुकीत मतदानाचे प्रमाण लक्षात घेता 75 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान व्हावे या उद्देशाने स्वीप अंतर्गत #MissionDistinction75% हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत शालेय मुले आता आई-बाबांना संकल्प पत्राद्वारे मतदान करण्याचे आवाहन करणार आहेत. हे 'संकल्प पत्र' मुले पालकांकडून भरुन घेणार आहेत.
अधिकाधिक मतदारांनी मतदान करावे, जिल्ह्याचे मिशन डिस्टिंक्शन हे ध्येय पूर्णत्वास यावे, मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी स्वीप अंतर्गत हा उपक्रम आम्ही राबविण्याचा निर्णय घेतला. मुलांच्या आवाहनाला आई-बाबा सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्वाधिक संख्येने मतदान करतील, असा विश्वास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक गाव, शहर, वाडी, वस्ती या ठिकाणच्या मतदारांमध्ये मतदानाची जनजागृती व्हावी यासाठी सर्व महाविद्यालये, शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांचे मी व माझे कुटुंबीय मतदान करणारच असे संकल्पपत्र दि. 01 एप्रिल, 2024 रोजी एकाच दिवशी भरुन घेण्यात येणार आहेत.
हिंगोली लोकसभा मतदार संघासाठी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. जिल्हा प्रशासनाने या लोकसभा मतदारसंघामध्ये 75 टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाचे ध्येय ठेवले आहे.
आई-बाबासाठी मुलांचे संकल्प पत्र
माझे प्रिय आई-बाबा, मला खात्री आहे की, तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता. माझे भविष्य घडविण्यासाठी आपण दिवसरात्र कष्ट करत आहात. माझे उज्वल भविष्य हे उद्याच्या उज्वल भारतावर अवलंबून आहे. त्यामुळे मी आपल्याकडून एक संकल्प करुन घेऊ इच्छितो की, दि. 26 एप्रिल, 2024 रोजी होणाऱ्या हिंगोली लोकसभा मतदार संघातील निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी आपण आवश्य जाल आणि आपला मतदानाचा हक्क बजावाल. कराल ना येवढं माझ्यासाठी ….. असे मुलांच्या संकल्पपत्रात नमूद केले आहे.
आई-बाबांचे संकल्प
आम्ही हा संकल्प करतो की, दि. 26 एप्रिल, 2024 रोजी हिंगोली लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी आम्ही आवश्य जाऊ आणि आमचा मतदानाचा हक्क बजावू. तसेच परिवारातील सर्व मतदारांना, शेजाऱ्यांना, मित्रांना मतदान करण्यासाठी प्रेरित करु, असे या संकल्प पत्रात नमूद करण्यात आले आहे. ही संकल्पपत्रे संबंधित शाळेत विद्यार्थी जमा करणार आहेत.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment