20 March, 2024

हिंगोली लोकसभा मतदारसंघात ईव्हीएमची सरमिसळ प्रक्रिया पूर्ण

हिंगोली (जिमाका), दि. 20 : लोकसभा निवडणुकीकरिता जिल्ह्यातील मतदान केंद्रावर वितरीत करावयाच्या बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट या मतदान यंत्रांची प्रथम सरमिसळीकरणाची (फर्स्ट रॅण्डमायझेशन) प्रक्रिया जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीसमोर आज पूर्ण करण्यात आली. यातून कोणते ईव्हीएम मशीन कोणत्या मतदारसंघात जाणार, हे निश्चित करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राष्ट्रीय सूचना केंद्रात ईव्हीएम सरमिसळ प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे पूर्ण करण्यात आली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, उपजिल्हाधिकारी समाधान घुटुकडे, मतदान यंत्र व्यवस्थापन समितीचे नोडल अधिकारी सखाराम मांडवगडे, जिल्हा विज्ञान व सूचना अधिकारी बारी सिद्दीकी तसेच राजकीय पक्षाचे प्रतिनिधी सर्वश्री उमेश नागरे, गोपाल ढोणे, बाबुराव गाडे, विशाल काळे आदी उपस्थित होते. भारत निवडणूक आयोगातर्फे विकसित संगणक प्रणालीमध्ये सर्व प्रकारच्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट्सची नोंद घेऊन मतदारसंघनिहाय वितरित करण्यात येते. जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्राच्या संख्येपेक्षा बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट यंत्रे हे 20 व 30 टक्के अधिक प्रमाणात संबंधित मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना वितरित करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील एकूण तीन विधानसभा मतदारसंघ हिंगोली येथे 343, कळमनुरी येथे 346 व वसमत येथे 328 मतदान केंद्र आहेत. या एकूण 1017 मतदान केंद्रांकरिता बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट यंत्र उपलब्ध करण्यात आले आहेत. निवडणूक मतदान यंत्र वितरीत करताना 20 टक्के कंट्रोल युनिट व 30 टक्के व्हीव्हीपॅट मशीन अतिरिक्त देण्यात आल्या आहेत. यानंतर संबंधीत विधानसभा मतदार क्षेत्रात कोणत्या मतदान केंद्रावर कोणते मतदान यंत्र जाईल, हे निश्चित करण्यासाठी पुन्हा एकदा मतदान यंत्रांच्या सरमिसळीची प्रक्रिया पार पाडेल, अशी माहिती यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना दिली. मनुष्यबळाचीही सरमिसळ प्रक्रिया पूर्ण 15-हिंगोली लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राष्ट्रीय सूचना व विज्ञान केंद्रामध्ये मनुष्यबळाचीही सरमिसळ प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, पथक प्रमुख बारी सिद्दीकी यावेळी उपस्थित होते. ******

No comments: