14 March, 2024
जागतिक महिला दिनानिमित्त आर्थिक गुंतवणूक व साक्षरता विषयावर कार्यशाळा कुटुंबाची आवक पाहून खर्चाचे नियोजन करणे आवश्यक - जिल्हाधिकारी श्री. पापळकर
हिंगोली (जिमाका), दि. 14: महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी कुटुंबाची आवक पाहून खर्चाचे नियोजन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आर्थिक बचत व गुंतवणूक या विषयावरील कार्यशाळेत केले.
जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, बार्टीच्या समतादूत सुनिता आवटे, जिल्हा संरक्षण अधिकारी माया सूर्यवंशी, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सामाजिक कार्यकर्ते रामप्रसाद मुडे, लेखापाल शितल भंडारे तसेच चाईल्ड हेल्प लाइनचे प्रकल्प समन्वयक संदिप कोल्हे व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. पापळकर पुढे म्हणाले, कुटुंबाचे आर्थिक नियोजन करून बचत करण्याची करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक महिलांना बँकेचे आर्थिक व्यवहार करता आले पाहिजे, यासाठी बचतगटाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना बँकेचे व्यवहार करण्याबाबत मार्गदर्शन करावे, असे सांगितले.
या कार्यशाळेत प्रमुख वक्त्या बार्टीच्या समतादूत सुनिता आवटे यांनी महिलांचे सक्षमीकरण तर झालेच आहे, परंतु महिलांचे सबलीकरण होणे गरजेचे आहे. तसेच महिलांनी छोट्या-छोट्या आर्थिक व्यवहारामध्ये देखील बारकाईने आर्थिक नियोजन केले पाहिजे. स्वत: कडे विशेष लक्ष देऊन सक्षम होण्यासाठी केलेला संघर्ष न विसरता आयुष्यात पुढे गेले पाहिजे, असे सांगितले.
जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव यांनी कार्यशाळेत उपस्थित महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर जिल्हा महिला व बाल विकास विभागातील सहाय्यक लेखाधिकारी कमल शातलवार यांनी आर्थिक नियोजनात महिला महत्वपूर्ण भूमिका पार पाडत असतात याविषयी मार्गदर्शन करून उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले. तर जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे कायदा तथा परीविक्षा अधिकारी अॅड. अनुराधा पंडित यांनी सूत्रसंचालन केले.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment