19 March, 2024

हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 हिंगोली जिल्ह्यात ध्वनिक्षेपक वापरावर निर्बंध लागू

हिंगोली (जिमाका), दि. 19 : जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या आदर्श आचारसंहिता कालावधीत निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांच्या वाहनावरील ध्वनीक्षेपकामुळे ध्वनीप्रदूषण होते. परिणामी सामान्य नागरिकांच्या जीवनातील शांतता व स्वास्थ्यास बाधा पोहोचण्याची शक्यता असते. त्यामुळे मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (एन)नुसार निवडणूक आयोगाने प्रतिबंध आणले आहेत. या नियमानुसार निवडणूक काळात जिल्ह्यात ध्वनीक्षेपक वापरावर निर्बंध घालण्यात आले असून, त्याविषयीचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केला आहे. मुंबई पोलीस अधिनियमामधील प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन निवडणुका विना अडथळा व शांततेत पार पडण्यासाठी निवडणुकीच्या काळात ध्वनीक्षेपक वापरावर आयोगाने प्रतिबंध आणले आहेत. ध्वनीक्षेपकाचा वापर सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत संबंधित पोलीस अधिकारी यांची रीतसर परवानगी घेऊन करता येईल. दिवसा प्रचारासाठी फिरणाऱ्या वाहनांनी ध्वनीक्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबूनच करावा. ध्वनी क्षेपकाच्या आवाजासह फिरणाऱ्या वाहनास प्रतिबंध असेल. सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आणि इतर व्यक्तींनी निश्चित ठिकाणी ध्वनीक्षेपकाच्या वापरासंबंधित घेतलेल्या परवानगीची माहिती जिल्हादंडाधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित यंत्रणेस कळविणे बंधनकारक राहील. तसेच या आदेशाचा भंग करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र होईल. हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत दि. 6 जून, 2024 पर्यंत अंमलात राहतील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी श्री. पापळकर यांनी निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे. *******

No comments: