22 March, 2024

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून निवडणूक कामकाजाचा आढावा

• अधिकारी –कर्मचारी यांच्याकडून कामात दिरंगाई नको – जितेंद्र पापळकर हिंगोली, (जिमाका) दि.22: हिंगोली लोकसभा मतदार संघातील सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, पथक प्रमुखांनी निवडणूकविषयक कामाकाजाची आतापर्यंत केलेली तयारी, प्रत्यक्ष कामात येणाऱ्या अडचणी आणि त्यासाठी लागणारी मदत, मार्गदर्शन याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज ऑनलाईन बैठकीमध्ये आढावा घेतला. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे प्रत्यक्ष तर इतर सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सर्व पथक प्रमुख दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. हिंगोली लोकसभा मतदारसंघात निवडणुकीबाबत करण्यात आलेली तयारी, ती करताना आतापर्यंत प्रत्यक्ष कामकाज करताना येणाऱ्या अडचणी आणि त्यासाठी लागणारी मदत याचा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दूरदृष्यप्रणालीद्वारे आढावा घेतला. तसेच मतदारसंघातील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील माध्यम कक्ष स्थापन करणे आणि येथून चालणाऱ्या कामकाजाबाबत त्यांनी माहिती घेतली. निवडणूकविषयक कामकाज करताना आवश्यक तेवढे मनुष्यबळ सोबत असल्याची खात्री करून घ्यावी. मनुष्यबळाअभावी कोणतीही कामे प्रलंबित राहू नयेत, असे सांगून या सर्वांना वेळोवेळी प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवडणूक कर्तव्यावर प्रत्येकजण प्रशिक्षित असणे आवश्यक असून, कोणीही प्रशिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी दिले. दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून देणे, आदर्श मतदान केंद्रांची निर्मिती करणे, 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर नवमतदारांमध्ये झालेली वाढ, त्याची नोंद, ईव्हीएमच्या अनुषंगाने माहिती देणे, कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना आवश्यकता असल्यास पुन्हा प्रशिक्षण देणे, शिघ्र कृती दलाची नियुक्ती आदी विविध विषयांबाबत संबंधित पथक प्रमुखांना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्देश दिले. महसूल विभागाच्या सर्व चारचाकी वाहने अधिग्रहीत करण्याचे आदेश काढावेत. त्यामुळे इंधन भरणे आणि इतर अनुषंगीक बाबींना अडचणी येणार नाहीत. त्याबाबतची कार्यवाही तात्काळ करण्याचे आदेशही त्यांनी दिले. निवडणूक काळात लागणारे सर्व निवडणूकविषयक साहित्य वेळेत आणि मुबलक प्रमाणात मिळाले आणि सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी. हे सर्व साहित्य हाताळताना किंवा वाहतूक करताना सांभाळून व्यवस्थितपणे हाताळावे. स्वीपअंतर्गंत मतदारांमध्ये जनजागृती करण्याविषयी कामगिरी योग्यरित्या पार पाडावी. टपाली मतदानासाठी 12 ड अर्जांचे वितरणाची माहिती अचूक नोंदीद्वारे अद्ययावत ठेवावी, असे श्री. पापळकर यांनी सांगितले. भरारी पथक आणि पोलीस यंत्रणा यांच्या योग्य समन्वयातून निवडणूक कालावधीमध्ये रोकड, मद्य, सोने यांच्या तपासणी नाक्यांवर करडी नजर ठेवून चोख भूमिका पार पाडावी. उमेदवारांचे निवडणूक कालावधीतील खर्च अचूकपणे नोंदवून त्याचा अहवाल वेळोवेळी निवडणूक खर्च निरीक्षकांकडे सादर करावा. उमेदवार अथवा त्यांचे प्रतिनिधी यांनी जिल्हा माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीकडून प्रचार साहित्य, मजकूर, ऑडिओ, व्हिडीओ आणि त्याची संहिता तपासून घेऊन त्याचे प्रमाणपत्र वेळेत वितरीत करण्याबाबतच्या सूचना दिल्या. या कालावधीत विविध ॲपद्वारे सर्वसामान्य नागरिक, उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींकडून येणाऱ्या ऑनलाईन तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले. यावेळी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी टपाली मतदानाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. ****

No comments: