28 March, 2024
जाहिरात प्रमाणीकरणासह सोशल मिडीयाच्या वापरावर लक्ष ठेवा -जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
• जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीची सभा
• इलेक्ट्रॉनिक माध्यमासह सर्व जाहिरातींचे पूर्व-प्रमाणीकरण बंधनकारक
हिंगोली (जिमाका), दि. 28 : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून त्या अनुषंगाने जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समिती (एमसीएमसी) कार्यान्वित करण्यात आली आहे. या समितीने इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसारित होणाऱ्या जाहिरातींच्या प्रमाणीकरणासह सोशल मिडीयाच्या वापरावरही लक्ष ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात एमसीएमसी समितीच्या बैठकीत श्री. पापळकर बोलत होते. समिती सदस्य तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उमाकांत पारधी, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, समिती सदस्य सायबर सेलचे सहायक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, आकाशवाणीचे प्रतिनिधी रमेश कदम, समर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश कोल्हे, सहायक माहिती अधिकारी चंद्रकांत कारभारी यांची यावेळी उपस्थिती होती.
निवडणूक काळात माध्यम प्रमाणीकरण आणि माध्यम सनियंत्रण समितीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून सोशल माध्यमांद्वारे होणाऱ्या प्रचारावरही या समितीने काळजीपूर्वक लक्ष ठेवावे. तसेच या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार आणि अनुषंगिक अधिनियमानुसार कार्यवाही करावी. पेडन्यूज, जाहिरात खर्च याविषयी काटेकोरपणे कार्यवाही करुन त्याबाबतचा अहवाल सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी दिल्या.
समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते यांनी समितीची रचना, कार्य आणि जबाबदाऱ्या याविषयी सादरीकरण केले.
या जाहिरातींचे पूर्व-प्रमाणीकरण आवश्यक
दूरचित्रवाणी वाहिनी, केबल नेटवर्क, केबल वृत्तवाहिन्या, सिनेमा हॉल, रेडिओ, सार्वजनिक तसेच खासगी एफएम चॅनेल्स, सार्वजनिक ठिकाणी दाखविण्याच्या दृक-श्राव्य जाहिराती, ई-वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती, बल्क एसएमएस, रेकॉर्ड केलेले व्हाईस मेसेजेस, सोशल मीडिया, इंटरनेट संकेतस्थळे यावर दर्शविण्याच्या जाहिराती तसेच मतदानाच्या आणि त्याच्या एक दिवस आधी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या जाहिरातींचे पूर्व-प्रमाणीकरण एमसीएमसी समितीकडून करुन घेणे बंधनकारक आहे. खासगी व्यक्ती, उमेदवार यांच्या जाहिरातींचे प्रमाणीकरण जिल्हास्तरीय एमसीएमसी समितीकडून करण्यात येते, तसेच राजकीय पक्ष, संघटना, समूह यांच्या जाहिरातींचे प्रमाणीकरण राज्यस्तरीय समितीमार्फत केले जाते. जाहिरात प्रसारित अथवा प्रसिद्ध करण्याच्या नियोजित दिवसाच्या तीन दिवस अगोदर जिल्हास्तरीय समितीकडे पूर्ण भरलेला विहित नमुन्यातील अर्ज, जाहिरातीची अर्जदाराने स्वाक्षरीत केलेली दोन प्रतीतील मुद्रित स्क्रिप्ट, जाहिरातीच्या दोन सीडी समितीकडे सादर करणे बंधनकारक आहे.
उमेदवाराने राजकीय सर्व जाहिरातींचे प्रमाणीकरण करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment