13 March, 2024
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिंगोलीमध्ये 6 कोटी रुपयांचे वितरण, केंद्राच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यात यश - केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे
हिंगोली (जिमाका), दि. 13 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र शासनाला विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यात यश आले असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज येथे केले.
केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या विविध तीन महामंडळांमार्फत देण्यात येणा-या कर्जाच्या पीएम सूरज या वेबपोर्टलचे लोकार्पण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीव्दारे करण्यात आले. यावेळी हिंगोली येथील शिवाजीराव देशमुख सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त यादव गायकवाड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी प्रधानमंत्री सामाजिक उत्थान एवं रोजगार आधारित जनकल्याण (पीएम सूरज) पोर्टल सुरु करण्यात आले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे गरिबांना विविध योजनांच्या माध्यमातून सहज, सुलभरित्या कर्ज मिळत आहे. शेतकरी, गरीब, महिला, वंचितांसाठी प्रधानमंत्री काम करत असल्याचे श्री. दानवे यांनी सांगितले.
देशात सन 2011 ची जनगणना झाली असून, त्यापैकी कोट्यवधी जनतेला प्रती माणसी 5 किलोप्रमाणे मोफत अन्नधान्य उपलब्ध करुन दिले. नंतर प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी 100 रुपयांमध्ये उज्ज्वला योजनेतून गँस कनेक्शन दिले. देशात जी - 20 च्या बैठकांचे आयोजन केले. 175 देशातील लोकप्रतिनिधींनी देशाचे कौतुक केले. देशातील गरिब, वंचित, शेतकऱ्यांचे उत्थान करण्याचे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे, असेही केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले.
विविध योजनांचा निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत आहे. पीपीई कीट, आयुष्मान कार्डाच्या माध्यमातून मोफत उपचार होत आहेत. शासनाच्या योजना वंचितांच्या खात्यात जमा होत आहेत. आपल्या सर्वांमध्ये माझा परिवार दिसतो. 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प आहे. केंद्र शासन लाभार्थ्यांच्या घरापर्यंत पोहचले. कोट्यवधी स्वच्छतागृहे बांधली. उज्जवला गॅस कनेक्शन दिले. आर्थिक विकासाला हातभार लावण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण आहे. तसेच सावकारीच्या पाशातून मुक्त करण्यासाठी स्वनिधी ही महत्त्वाची योजना राहिली आहे. केंद्र सरकारकडून राबविलेल्या वेगवेगळ्या योजनामुळे मोठ्या प्रमाणात अनेक कुटूंब दारिद्र्य रेषेच्यावर आली आहेत. प्रधानमंत्री सुरक्षा बीमा, जीवन ज्योती, मातृत्व योजना, आयुष्यमान कार्ड, जननी सुरक्षा, गरीब कल्याण, उज्वला योजना या योजनांचा लाभ देखील यापुढे लाभार्थ्यांना मिळणार असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री श्री. दानवे यांनी सांगितले.
हिंगोली जिल्ह्यातील तीनही महामंडळाच्या लाभार्थ्यांना 6 कोटी रुपये कर्जाचे वितरण थेट बँक खात्यात यावेळी जमा करण्यात आले. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ (NBCFDC), राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ (NSFDC) आणि राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळ (NSKFDC) या तीन राष्ट्रीय महामंडळामार्फत देशातील सर्व राज्यातील अनुसूचित जाती, इतर मागास वर्ग व सफाई कर्मचारी यांना अर्थसहाय्य करण्यासाठी पीएम सूरज पोर्टल सुरू करण्यात आले आहे. समाजातील सर्वात उपेक्षित घटकांचे उत्थान करणे हे या पोर्टलचे उद्दिष्ट आहे.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment