05 March, 2024

हिंगोली येथे 7 मार्च रोजी नवीन गुंतवणूकदारांचे संमेलन औद्योगिक संघटना व नवीन गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 05 : येथील जिल्हा उद्योग केंद्रामार्फत दि. 7 मार्च, 2024 रोजी हिंगोली जिल्ह्यांतर्गत नवीन गुंतवणुकदारांचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार हे राहणार आहेत. तसेच यावेळी खासदार हेमंत पाटील, आमदार प्रज्ञाताई सातव, विप्लव बाजोरिया, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, आमदार राजू नवघरे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची उपस्थिती राहणार आहे. या संमेलनात हिंगोली जिल्ह्यातील नवीन गुंतवणुकदारांचे 400 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात येणार आहेत. तसेच या कार्यक्रमात विभागीय कार्यालयाचे उद्योग सहसंचालक बी. टी. यशवंते, उपविभागीय कार्यालयातील अधीक्षकीय उद्योग अधिकारी श्रीमती करुणा खरात यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. तर शासनाकडून उद्योजकांसाठी पुरविण्यात येणाऱ्या परवान्याबाबत अंमलात आलेल्या नवीन कायद्याविषयी मैत्री पोर्टलचे नोडल अधिकारी पी. बी. हजारे यांनी तर हिंगोली जिल्ह्यातील नवीन उद्योजकांना आयात निर्यातीबाबत जालना येथील निर्यात सल्लागार सत्यकुमार राठी हे सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. हिंगोली जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटना व नवीन गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांनी मोठ्या संख्येने संमेलनास उपस्थित राहावेत, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक शोएब कादरी यांनी केले आहे. ******

No comments: