24 March, 2024
पथकप्रमुखांनी उमेदवारांच्या खर्चाचा अचूक ताळमेळ राखावा - जिल्हा निवडणूक खर्च निरीक्षक
हिंगोली (जिमाका), दि. 24 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 ची आदर्श आचार संहिता मतदारसंघात लागू झाली असून, लवकरच नामनिर्देशन पत्रेही उमेदवारांकडून दाखल केली जातील. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा मतदारसंघातील नियुक्त प्रत्येक पथकप्रमुखाने उमेदवाराच्या दैनंदिन खर्चाचा ताळमेळ अचूक नोंदवावा, असे आवाहन खर्च पथकप्रमुख दिगंबर माडे यांनी केले आहे.
खर्च नियंत्रणाची संरचना समजावून घेण्यासाठी आज दूरदृष्यप्रणालीव्दारे घेतलेल्या सहायक खर्च निरीक्षकाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हास्तरीय निवडणूक खर्च पथकाचे सदस्य तथा जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. माधव झुंजारे, एमसीसी समितीचे पथक प्रमुख तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, जिल्हा माहिती अधिकारी तथा जिल्हा माध्यम व सनियंत्रण समितीचे पथक प्रमुख प्रभाकर बारहाते यांच्यासह हिंगोली लोकसभा मतदार संघातील सर्व सहायक खर्च निरीक्षक उपस्थित होते.
जिल्हास्तरीय समितीकडून हिंगोली लोकसभा मतदार संघातील खर्चाचे एकत्रीकरण त्याचे निवडणूक खर्च निरीक्षकांना सादरीकरण करावे लागणार आहे. यासाठी लोकसभा मतदार संघ व विधानसभा मतदार संघनिहाय सहायक निवडणूक खर्च निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व खर्च निरीक्षकांनी दैनंदिन नोंदी त्याच दिवशी अभिरुप ताळमेळ नोंदवहीत अचूकपणे नोंदवाव्यात. यामध्ये अजिबात दिरंगाई होणार नाही याची दक्षता घ्यावी.
राजकीय पक्षाचे सनियंत्रण करण्यासाठी विविध समिती व भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये व्हिडिओ सनियंत्रण समिती (व्हीएसटी), व्हिडीओ पाहणारा चमू (व्हीव्हीटी), स्थिर सनियंत्रण चमू (एसएसटी), लेखांकन करणारा चमू, भरारी पथक, माध्यम प्रमाणीकरण आणि संनियत्रण समिती यांचा समावेश आहे. या सर्व पथक प्रमुखांनी खर्चाच्या नोंदी अचूक घेऊन जिल्हास्तरीय निवडणूक खर्च नियंत्रण समितीला कळवणे आवश्यक असल्याचे श्री. माडे यांनी यावेळी सांगितले.
निवडणूक कालावधीमध्ये निवडणूक खर्च निरीक्षक किमान तीन वेळा उमेदवाराच्या खर्चाचा ताळमेळ तपासतात. त्यामुळे प्रत्येक संबंधित पथक प्रमुखाने अभिरूप नोंदवहीमध्ये अचूक आणि पृष्ठ क्रमांक टाकून नोंदी घ्याव्यात. तसेच ती नोंदवही पथकप्रमुखाकडून प्रमाणित करून ठेवावी. उमेदवाराने घेतलेल्या खर्चाचा ताळमेळ नोंदी व पथकप्रमुखाच्या नोंदी अचूक असल्याची बाब जाणीवपूर्वक तपासून घ्यावी, असेही श्री. माडे यांनी यावेळी सांगितले.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment